Will not stop, will not get tired, will never bow down in front of anyone’. | Sarkarnama

‘रूकणार नाही, थकणार नाही, कोणासमोर कधी झुकणार नाही‘ तसंच वागणार..

सरकारनामा ब्युरो
रविवार, 5 जुलै 2020

माझे गुरू विचारांनी माझ्या पाठीशी आहेत, त्यांच्या नसण्याची कमी नेहमीच राहील. गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय वाटचाल करणे कठीणच असते. माझ्या गुरूनी मला शिकवले ‘थकणार नाही, रुकणार नाही, कोणासमोर कधीही झुकणार नाही‘, तसं वागण्याचा प्रयत्न करत राहीन,

औरंगाबादः माजीमंत्री भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी आज आपले राजकीय गुरू व वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढत गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या शुभेच्छा संदेशात त्यांनी माझे गुरू विचारांनी माझ्या पाठीशी आहेत, त्यांच्या नसण्याची कमी नेहमीच राहील. गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय वाटचाल करणे कठीणच असते. माझ्या गुरूनी मला शिकवले ‘थकणार नाही, रुकणार नाही, कोणासमोर कधीही झुकणार नाही‘, तसं वागण्याचा प्रयत्न करत राहीन, असे सांगत आपले इरादे स्पष्ट केले आहेत.

आज गुरूपौर्णिमे निमित्त अनेक राजकीय नेते, पुढारी आपल्या गुरूंची आठवण काढून त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करत आहेत. पंकजा मुंडे या आपले वडील दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनाच गुरू मानत आल्या आहेत. राजकारणात देखील त्यांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत वाटचाल सुरू केली आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर आलेल्या प्रत्येक परिस्थितीची सामना पंकजा मुंडे यांनी मोठ्या हिंमतीने केल्याचे पहायला मिळाले. वडीलांप्रमाणेच पंकजा यांच्या वाट्यालाही संघर्ष आला, यावरही मात करत त्यांनी गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा यशस्वीपणे पुढे सुरू ठेवला.

गेल्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे या काही दिवस राजकारणापासून दूर होत्या. त्यांनी कुणाशी संवाद साधला नव्हता, की समर्थकांच्या प्रश्नांना उत्तरे देखील दिली नव्हती. पण गोपीनाथ मुंडेंच्या जयंती दिनी गोपीनाथ गडावर त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत मनात असेल ते सगळे बोलून दाखवले.

आपल्या पराभवासाठी भाजपच्याच काही लोकांनी रसद पुरवली असा थेट आरोप पंकजा यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीतच केला होता. अर्थात त्यांची मोठी किंमत पंकजा यांना पुढे चुकवावी लागली. सत्तेसाठी किंवा पदासाठी आपण हे करत आहोत असा कुणी आरोप करू नये, म्हणून पंकजा यांनी कोअर कमिटीच्या सदस्यपदाचा राजीनामा देत एक प्रकारे पक्षाला आव्हान दिल्याची चर्चा त्यावेळी होती.

पकंजा यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पक्षाने परळीतील पराभवानंतर त्यांच्या पुनर्वसनाकडे दुर्लक्षच केले. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत देखील पंकजा यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर प्रदेश कार्यकारणीमध्येही ‘पंकजा यांना केंद्रात मोठी जबाबदारी देण्यात येणार' असल्याचे सांगत प्रदेशाध्यक्षांनी यावर अधिक भाष्य टाळले. त्यामुळे पंकजा यांना पुन्हा एकदा पक्षाने डावलल्याची भावना पंकजा समर्थकांच्या मनात निर्माण झाली आहे.

तोच बाणा कायम...

गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला भगवानगडावर न जाऊ शकलेल्या पंकजा मुंडे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून समर्थकांशी संवाद साधत ‘ मी थकणार नाही, रुकणार नाही, कुणासमोर कधी झुकणार नाही‘ हे स्पष्ट केले होते. गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने पंकजा यांनी पुन्हा एकदा आपला तोच बाणा, राजकीय गुरू व वडील गोपीनाथ मुंडे यांची शिकवण कायम ठेवू असे नमूद करत कुणाच्याही दबावाला बळी पडणार नसल्याचा संदेशच दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख