शिवसेनेत आता खैरेंना विचारतो कोण? भाजप खासदार कराडांचा टोला..

खैरे यांच्याकडे पक्षाचे नेते पद कायम होते. पण लोकसभेतील पराभव, पक्ष नेतृत्वाकडून डावलले जात असल्याची भावना असून देखील खैरे यांनी पक्ष कार्यात स्वतःला झोकून दिले.
Bjp Mp Dr. Bhagwat Karad- Shivsena Leader Chandrkant Khaire News Aurangabad
Bjp Mp Dr. Bhagwat Karad- Shivsena Leader Chandrkant Khaire News Aurangabad

औरंगाबाद ः काही दिवसांपुर्वीच भाजपचे राज्यसभेचे खासदार डाॅ. भागवत कराड यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांची त्यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन भेट घेतली होती. खैरेंनी देखील त्यांचे स्वागत करत त्यांना पेढा भरवला. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती, तर खैरे हे आमचे युतीतील जुने नेते आहेत, त्यांनी बोलावल्यावर जावेच लागणार असे म्हणत खैरेंबद्दल आदर व्यक्त केला होता. परंतु आता खैरेनां शिवसेनेत विचारतो कोण? असा चिमटा काढत कराड यांनी आपला खैरे विरोध कायम असल्याचे दाखवून दिले आहे.

राज्य व औरंगाबादेत कोरोनाचा वाढता प्रसार याला महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याची टीका करतांना  खैरे-कराड भेटीवरून त्यांना विचारले असता त्यांनी वरील विधान केले. राज्यात शिवसेना-भाजप युती होती तेव्हा देखील खैरे-कराड यांच्या फारसे चांगले संबंध नव्हते. मात्र महापालिकेत संख्याबळ कमी असतांना देखील युतीमुळे डाॅ. कराड यांना महापौर करण्यात खैरे यांचा हात होता हे कराड नाकारत नाही.

परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला, एमआयएमचे इम्तियाज जलील खासदार म्हणून निवडूण आले आणि खैरे यांच्या वर्चस्वला ग्रहण लागले अशीच काहीशी परिस्थीती निर्माण झाली. मराठवाड्यात शिवसेना म्हणजे खैरे असे चित्र एकेकाळी होते. पण लोकसभेतील एका पराभवाने त्यांच्या वर्चस्वाला धक्का लागल्याचे पहायला मिळते. त्यामुळेच राज्यसभेवर निवड झाल्यानंतर डाॅ. कराड हे देखील संधी मिळेल तेव्हा शिवसेना व चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका करत असतात.

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानतंर खैरे हे राज्यसभेवर आपल्याला संधी मिळेल ही अपेक्षा बाळगून होते. परंतु पक्षाने प्रियंका चतुर्वेदी या नव्या चेहऱ्याला संधी दिली आणि ३०-४० वर्षाच्या राजकारणात पहिल्यांदा खैरेंनी ठाकरे कुटुंबावर नाराजी व्यक्त करत टीका केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवानेते आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊन टीका केल्याने कित्येक महिने हे दोन्ही नेते खैरे यांच्याशी बोलले नव्हते. खैरे यांनी अनेकदा मातोश्रीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नव्हता.

उपऱ्यांचे वजन वाढले?

खैरे यांचे वजन घटत असल्याचा पुरेपूर फायदा त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी पुरेपर उठवला. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात नवे समीकरण उदयास आले आणि महाविकास आघाडी सत्तेवर आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि या प्रवासात अनेक नवे चेहरे समोर आले. औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला तर पाचवेळा निवडूण आलेले शिवसेनेचे पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळाले. काॅंग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेल्या अब्दुल सत्तार यांना देखील राज्यमंत्री पदाची लाॅटरी लागली.

खैरे यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे त्याआधीच विधान परिषदेवर आमदार झाले होते, तर खैरे यांच्याकडे पक्षाचे नेते पद कायम होते. पण लोकसभेतील पराभव, पक्ष नेतृत्वाकडून डावलले जात असल्याची भावना असून देखील खैरे यांनी पक्ष कार्यात स्वतःला झोकून दिले. मात्र नुकत्याच झालेल्या जिल्हा बॅंक निवडणूकीत खैरे यांना डावलून सगळी सुत्र भुमरे-सत्तार आणि दानवे यांच्या हाती सोपवण्यात आली होती.

कराड-खैरे भेटीची चर्चा..

या तिघांनी जिल्हा बॅंकेवर भगवा फडकवला, पण या यशात खैरेंचा कुठलाच सहभाग नव्हता. त्यामुळे खैरे आणि भाजपच्या कराड यांची जेव्हा भेट झाली तेव्हा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. खैरेंचे  हे दबावतंत्र आहे का? असेही बोलले गेले. या भेटीनंतर खैरे-कराड यांच्यात गट्टी जमेल आणि ते आगामी महापालिका निवडणुकीत काही वेगळी खेळी करतील असेही बोलले गेले.

पण कराड यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि रुग्ण संख्या यावरून शिवसेना व चंद्रकांत खैरे यांच्यावर निशाणा साधला. आता खैरे यांच्याकडून कराड यांच्या या टीकेला काय उत्तर मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com