रावसाहेब दानवेंच्या बंगल्यात ‘तुरी़'च्या नावाखाली कोणती डाळ शिजली?

माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपकडून विधान परिषदेवर पाठवले जाण्याची दाट शक्यता आहे. विधान परिषदेची निवडणूक जाहीर होणे आणि नेमक त्याच दिवशी धनंजय मुंडे भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे यांच्या भेटीला येणे हा काही निव्वळ योगायोग असेल असे वाटत नाही. मग नेमकी या तिघांमध्ये काय चर्चा झाली असेल, असा प्रश्न पडतो.
danve-mundhe-pandit news
danve-mundhe-pandit news

औरंगाबादः राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडीत हे शुक्रवारी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन येथील बंगल्यावर येऊन गेले. राज्यात सध्या कापूस, तूर, हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत, मात्र यामध्ये काही त्रुटी असल्यामुळे मुंडे, पंडीत यांनी दानवेंची खास भेट घेतल्याची चर्चा आहे. आता तुरीच्या नावाखाली या तीन नेत्यांमध्ये नेमकी कुठली डाळ शिजली याची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राजकारणात कुणीच कुणाचे कधी कायम शत्रू किंवा मित्र नसतं असं नेहमीच बोलले जाते. ऐरवी निवडणुकीच्या आखाड्यात एकमेकांना आव्हान देणारे विविध राजकीय पक्षांचे नेते नंतर मात्र एकमेकांच्या गळ्यात हात घालून फिरतांना दिसतात. अशीच काहीशी प्रचिती या लॉकडाऊनमध्ये देखील पहायला मिळाली.

रावसाहेब दानवे हे महाराष्ट्रातील भाजमधले वजनदार नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रदेशाध्यक्ष काळाताच राज्यात भाजपची भरभराट झाल्याचा दावा केला जातो. ३५-४० वर्ष राजकारणात असून सातत्याने निवडणूका जिंकण्याचा त्यांचा दांडगा अनुभव म्हणूनच केंद्रातील मोदी सरकारमध्ये दानवे यांना दोनदा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

सध्या राज्यात कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन सुरू आहे,  अशावेळी धनंजय मुंडे आणि अमरसिंह पंडीत रावसाहेब दानवे यांच्याकडे खरंच तूर किंवा धान्य खरेदीतील त्रुटीवर चर्चा करण्यासाठी आले होते हा केला जाणार दावा फारसा पटत नाही. विशेष म्हणजे मुंडे, पंडीत येणार असल्यामुळे दानवेंनी या दोघांच्या पाहुणचाराची चांगलीच तयारी आपल्या बंगल्यात केल्याचे दिसून आले.

निवडणूक जाहीर आणि दानवे-मुंडे भेट

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी दानवेंच्या भोकरदनमध्ये येऊनच भाजप व त्यांच्या नेत्यांवर चांगले तोंडसुख घेतल्याचे सगळ्यांनी पाहिले होते. एकीकडे राज्यातील महाविकास आघाडी सरकार व केंद्रातील मोदी सरकार यांच्यांतील संबंध फारसे चांगले नाहीत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या राज्यपाल नियुक्त सदस्यपदाला भाजपने केलेला विरोध, त्यावरून राज्यपालांवर झालेली टिका याची चांगलीच चर्चा राज्यात झाली होती. हा वाद जास्त चिघळतो की काय? असे वाटत असतांनाच निवडणूक आयोगाने राज्यातील विधान परिषदेच्या ९ जांगावर निवडणूक घेण्याला परवानगी दिली आहे. भाजपच्या कोट्यातून तीन सदस्य नव्याने निवडूण दिले जाणार आहेत.

या पैकी मराठवाड्यातून माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपकडून विधान परिषदेवर पाठवले जाण्याची दाट शक्यता आहे. विधान परिषदेची निवडणूक जाहीर होणे आणि नेमक त्याच दिवशी धनंजय मुंडे भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे यांच्या भेटीला येणे हा काही निव्वळ योगायोग असेल असे वाटत नाही. मग नेमकी या तिघांमध्ये काय चर्चा झाली असेल असा प्रश्न पडतो. परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांचा त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांनी पराभव केला. त्यानंतर पंकजा मुंडे आणि त्यांच्या समर्थकांकडून आपल्या पराभवाला भाजपच्या काही नेत्यांकडूनच रसद पुरवली गेल्याचा आरोप करण्यात आला होता.

नाराज पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जंयती निमित्त गोपीनाथ गडावर घेतलेल्या मेळाव्याला राज्यातील बरेच नेते उपस्थित असतांना रावसाहेब दानवे यांची अनुपस्थिती त्यावेळी चर्चेचा विषय ठरली होती. त्यामुळे निवडणुकीनंतरची दानवे- धनंजय मुंडे यांची ही पहिली भेट महत्वाची समजली जाते. विधान परिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच, तुरीचा प्रश्न घेऊन थेट दानवे यांचा बंगला गाठणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या मनात नेमके काय सुरू आहे? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ही भेट सदिच्छा आणि राज्यातील धान्य खरेदीतील त्रुटींवर चर्चा करून ती सोडवण्यासाठी होती असा दावा या नेत्यांकडून केला जातोय, खरा पण या भेटीमागे वेगळेच राजकारण शिजत असल्याचे बोलले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com