When Corona was diagnosed, the mother's face came into view | Sarkarnama

कोरोनाचे निदान झाले तेव्हा, आईचा चेहरा डोळ्यासमोर आला..

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 26 जून 2020

रुग्णालयात असताना देखील मी चार ते पाच तास प्राणायम करायचो. त्यामुळे या संसर्गातून मला लवकर बाहेर पडण्यास मदत झाली. मला कोरोनाची लागण झाल्याचे कळाल्यानंतर माझ्या समर्थकांसह राज्यातील जनतेने मी लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना केल्या, मला शुभेच्छा आणि सदिच्छा दिल्या. त्या बळावरच मी आज यातून बरा झालो आहे.

औरंगाबाद:  कोरोनाची लागण झाल्याचे मला अकरा तारखेला समजले, त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर आईचा चेहरा आला. घरात एकुलता एक असल्यामुळे मला तिने खूप लाडाने आणि काळजीने वाढवले. कोरोनासारखा जीवघेणा आजार आपल्याला झाला आहे, हे तिला समजावून सांगणे माझ्यासाठी फार कठीण काम होते. पण तिच्या आणि राज्यातील १२ कोटी जनतेच्या आशीर्वादाच्या बळावरच मी कोरोनावर मात करू शकलो, अशा शब्दात राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोना काळातील आपल्या भावना व्यक्त केल्या.

कोरोना आजारातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर धनंजय मुंडे नुकतेच आपल्या परळी येथील घरी परतले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या संकटाशी आपण कसा सामना केला? याबद्दलचे अनुभव सांगितले.

यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले,  आपल्याला काही होत नाही, हा अतिआत्मविश्वास मला नडला. अकरा तारखेला मला श्वास घ्यायला त्रास होत असल्याचे जाणवले. त्याआधीच मी मुंबईला जाऊन आल्यामुळे कोरोनाची चाचणी करून घेण्याचा निर्णय घेतला. माझ्यासह इतर काही सहकार यांचीही तपासणी करून घेतली. मला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले,माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का होता.

पण त्याहीपेक्षा अधिक माझ्या कुटुंबियांसाठी हे सत्य पचवणं खूप अवघड जाणार होते. देशात आणि राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सर्वाधिक रुग्णही मुंबईत असल्याचे माझी पत्नी आणि आईला माहीत होते. त्यामुळे मी मुंबईला जाऊच नये, असा त्यांचा आग्रह होता. परंतु सामाजिक न्याय खात्याचा मंत्री म्हणून माझ्यावर असलेली जबाबदारी आणि मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय यासाठी मुला मुंबईला जाणे भाग होते. 

आपल्याला काहीही होणार नाही हा अति आत्मविश्वासही मला नडला. या संकटाला आता तोंड द्यावे लागणार, हे मनाशी ठरवून मी यातून सुखरूप बाहेर येईल असा विश्वास आधी माझी आई आणि पत्नीला दिला. त्यानंतरच मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालो.

माझे जीवन अकरा कोटी जनतेसाठी 

कोरोनाने मला बरंच काही शिकायला मिळालं. रुग्णालयात ज्या कोरोना योध्यानी माझ्यावर उपचार केले, माझी सेवा केली त्या सगळ्यांचे मी हात जोडून आभार मानतो. हा आजार जीवघेणा असला तरी मनोबलाच्या आधारावर तुम्ही त्यावर मात करू शकता हे मी अनुभवातून सांगू शकतो.

रुग्णालयात असताना देखील मी चार ते पाच तास प्राणायम करायचो. त्यामुळे या संसर्गातून मला लवकर बाहेर पडण्यास मदत झाली. मला कोरोनाची लागण झाल्याचे कळाल्यानंतर माझ्या समर्थकांसह राज्यातील जनतेने मी लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना केल्या, मला शुभेच्छा आणि सदिच्छा दिल्या. त्या बळावरच मी आज यातून बरा झालो आहे. मला मिळालेले हे नवे आयुष्य मी राज्यातील जनतेच्या कामासाठी अर्पण करणार असल्याचेही धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले.

पंकजाचे चार पाच वेळा फोन आले

गेल्या अनेक वर्षांपासून माझे आणि माझी बहीण पंकजा मुंडे यांच्या कुटुंबाशी माझा फारसा संपर्क नाही. सुखात तर नाहीच पण दुःखात मात्र आम्ही एकमेकांना धीर देण्याचे काम करत आलो आहोत. मला कोरोनाची लागण झाली हे जेव्हा पंकजला कळाले तेव्हा तिने मला फोन करून या आजारातून लवकर बरा हो, अशा सदिच्छा देत दिलासा दिला. 

एकदा नव्हे तर चार-पाच वेळा फोन करून पंकजाने माझ्या तब्येतीची विचारपूस केली. अशा आजारपणाच्या काळात आपल्या जवळच्या व्यक्तीने जिच्याशी आपला गेल्या कित्येक वर्षांपासून संवाद नाही,अशा व्यक्तीने फोन करून दिलासा देणे याचा देखील मला  आजारातून बरा होण्यासाठी खूप आधार झाला असेही धनंजय मुंडे यांनी सांगितले.

आम्ही राजकारणात एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढलो, राजकीय मतभेद असू शकतात. राज्यात अशी अनेक उदाहरणे आहेत, परंतु कुटुंब म्हणून एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी झालं पाहिजे आणि तेच आम्ही करतो, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख