गुरूंनी सांगितले आणि माजी आमदारांनी नाव बदलले.. आता भीमराव नाही तर भीमसेन धोंडे

गहिनीनाथ गडावरील वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यात विठ्ठल महाराज यांनी त्यांना नाव बदलण्याची सूचना केली.
Ex.Mla Bhimrao Dhonde Beed News
Ex.Mla Bhimrao Dhonde Beed News

आष्टी: म्हणतात ना नावात काय, पण नावात काय आहे म्हणणारा शेक्सपिअर देखील आपल्या वाक्याखाली नाव लावतो. तसे नावाभोवती ओळख आणि कतृत्व लपलेलं असत. या उहापोहाच कारण म्हणजे भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यापुढे भीमसेन धोंडे असतील. कारण त्यांनी आपले रितसर गॅझेटमधून नामकरण करुन तशी स्वत: घोषणा केली आहे.

गहिनीनाथ गडावर काही दिवसांपूर्वी संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य कार्यक्रम झाला. यात मठाधिपती विठ्ठल महाराज यांनी धोंडे यांचा उल्लेख भिमराव ऐवजी भीमसेन असा केला. त्यानंतर विठ्ठल महाराजांनीच त्यांना नामकरणाची सूचना केली आणि त्यांनीही गुरुंची सुचना प्रमाण मानत तब्बल ६५ वर्षे ज्या नावाने ओळख होती ते नाव बदलण्याचे धाडसही केले.

तसे त्यांची ओळख आणि विविध क्षेत्रांतील कतृत्व आहेच. मात्र, त्याची ओळख यापुढे भीमराव नाही तर भिमसेन नावासोबत जोडली जाणार आहे. आता नव्या नावासोबत ते आपल्या कतृत्वाच्या यादीत काय काय नवे जोडतात तेही पहावे लागेल. अवलिया व्यक्तीमत्व असलेले धोंडे तसे मोकळे ढाकळे. आष्टी - पाटोदा - शिरुर कासार मतदार संघातून चार वेळा आमदारकीचा पट जिंकणाऱ्या धोंडेंनी राजकारणाबरोबरच अभियनाची आवडही जपली.

आपल्या आवडीला आणि अंगातल्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून त्यांनी संघर्ष या मराठी सिनेमाची निर्मीती करुन त्यात अभिनही केला. यासह तहान हा मराठी आणि बंदा या हिंदी सिनेमासह आई या मालिकेतही त्यांनी अभिनय साकारला. राजकारण आणि अभिनयात पारंगत असलेल्या धोंडेंचे आपल्या शरिर प्रकृतीवरही तेवढेच लक्ष आहे.

पासष्टीतही शंभर दंड बैठका

वयाची पासष्टी पार केलेले धोंडे आजही शंभरावर दंड- बैठका सहज लावतात. महाविद्यालयीन जीवनापासूनच कुस्तीची आवड असलेल्या धोंडेंनी अनेक पदकांनाही गवसणी घातलेली आहे. धोंडेंनी या घटकांसाठी तालीमही उभारलेली आहे. आजही दोन वेळा व्यायाम करतात. कुठल्या अधुनिक व यांत्रिक उपकरणांच्या सहाय्याने नाही तर मनगटातील बळाच्या जोरावर ते जोर काढतात.

सुरुवातीला काँग्रेसमधून सलग तीन वेळा आमदार झालेल्या धोंडेंनी नंतर समांतर काँग्रेस पक्षाचीही स्थापना केली. संरक्षण विभागाकडून जमिन संपादनाच्या मुद्द्यावर त्यांच्या नेतृत्वाखाली आष्टी ते दिल्ली हा तब्बल १२०० किलोमिटर अंतराचा ऐतिहासिक पायी मोर्चा यशस्वी करण्याचा विक्रमही त्यांनी केलेला आहे. तसेच कुकडी धरणाच्या पाण्यासाठी आष्टी ते मुंबई आणि आष्टी ते बीड असेही मोर्चे त्यांनी काढले.

मतदार संघात अनेक शाळा - महाविद्यालयांचे जाळे आणि माळी समाज बांधवांची साथ या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. या जोरावर आता भविष्यात त्यांनी केलेले कतृत्व भिमराव नाही तर भीमसेन धोंडे नावापुढे जोडले जाईल.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com