सुशिक्षित केरळने भाजपला नाकारलं, हेच शून्य माॅडेल अन्य राज्यांनी राबवायला हवे - Well-educated Kerala rejected the BJP, the same zero model should be followed by other states | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

सुशिक्षित केरळने भाजपला नाकारलं, हेच शून्य माॅडेल अन्य राज्यांनी राबवायला हवे

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 3 मे 2021

आम्ही लोकांच्या आरोग्याला महत्व दिले आणि मतदारसंघातच थांबलो. त्यामुळे आमच्या पक्षाला किती यश मिळणार हे स्पष्ट होते.

औरंगाबाद ः पश्चिम बंगालपेक्षा मला केरळच्या सुशिक्षित जनतेंच कौतुक करावंस वाटतं. कारण या राज्यात भाजपला एकही जागा मिळाली नाही. केरळच्या लोकांनी भाजपच्या बाबतीत तयार केलेले हे शून्य माॅडेल देशातील इतर राज्यांनीही राबवायला हरकत नाही, अशी खोचक प्रतिक्रिया एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. पश्चिम बंगालमध्ये आमच्या पक्षाने सहा जागा लढवल्या होत्या. तिथे आम्हाला यश मिळाले नाही, कारण आम्ही प्रचारालाही गेलो नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने आम्ही लोकांच्या आरोग्याला प्राधान्य दिले, त्यामुळे आमच्या कामगिरीबद्दल वाईट वाटत नाही, असेही इम्तियाज जलील म्हणाले.

पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले, यात सर्वाधिक चर्चा झाली ती पश्चिम बंगाल आणि ममता बॅनर्जी यांनी मिळवलेल्या एकतर्फी विजयाची. पश्चिम बंगाल, तामिळनाडू राज्यात ओवेसी यांच्या एमआयएमने देखील काही उमेदवार दिले होते. मात्र या पक्षाला तिथे खातेही उघडता आले नाही.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी तामिळनाडूत जाऊन खास लुंगी घालून प्रचार केला होता. एकंदिरत या राज्यातील एमआयएमची कामगिरी आणि पश्चिम बंगालमध्ये ममतांनी मिळवलेला विजय यावर इम्तियाज जलील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

`सरकारनामा`शी बोलातांना इम्तियाज जलील म्हणाले, कुठल्याही नव्या राज्यात आमचा पक्ष एन्ट्री करतो तेव्हा आम्ही मर्यादित जागा लढवतो. पश्चिम बंगाल तामिळनाडूत आम्ही याच पद्धतीने उतरलो होतो. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला असतांना ज्या पद्धतीने पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा या राज्यांमध्ये प्रचार सभा घेत होते, ते पाहता यांना लोकांच्या जीवाशी काहीही घेणेदेणे नाही फक्त सत्ता हवी आहे हे स्पष्ट दिसत होते.

पश्चिम बंगालमध्ये प्रचारासाठी जायचे तेव्हा मला ओवेसी साहेबांनी फोन करून तुमच्या मतदारसंघात कोरोनाची परिस्थिती काय आहे हे विचारले. तेव्हा मी त्यांना खरी परिस्थिती सांगितली आणि त्यांनी मला प्रचाराला येऊ नका, मतदारसंघात थांबून लोकांच्या आरोग्याची काळजी घ्या, असे सांगतिले.

आम्ही लोकांच्या आरोग्याला महत्व दिले आणि मतदारसंघातच थांबलो. त्यामुळे आमच्या पक्षाला किती यश मिळणार हे स्पष्ट होते. आम्ही अजिबात निराश नाही. पण मोदी, शहा यांनी संपुर्ण शक्तीपणाला लावली, जणू क्ही देशात कोरोनाच नाही अशा पद्धतीने प्रचार केला, त्यानंतरही बंगालच्या जनतेने भाजपला जो धडा शिकवला ते वाखाणण्याजोगे आहे.

पश्चिम बंगालमधील भाजपचा पराभव म्हणजे त्यांच्या अधःपतनाची सुरूवातच आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. ममता बॅनर्जी यांनी मिळवलेला विजय निश्चितच मोठा आहेपण यापेक्षाही मला केरळच्या जनतेचे कौतुक अधिक वाटते.

पंतप्रधानांनी सभा घेऊन देखील इथल्या सुशिक्षित मतदारांनी भाजपला थारा दिला नाही. एकही जागा न मिळू देता केरळने भाजपला शून्यावरच रोखले. केरळचे हे शून्य माॅडल आता देशातील इतर राज्यांनी देखील राबवावे आणि भाजपला हद्दपार करावे, असेही इम्तियाज जलील म्हणाले.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख