गंगाखेडच्या गोदावरी बंधाऱ्यातील पाण्याचा वाद पेटला; आमदार गुट्टे, काॅंग्रेस आमने-सामने

९ कोटी लीटर पाणी याच बंधाऱ्यात सुरक्षीत ठेवून ऊर्वरीत पाणी खालच्या भागातील शेती आणि मुक्या जनावरांसाठी सोडण्यात यावे, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.
Gangakhed Mla Ratnakar Gutte News Parbhani
Gangakhed Mla Ratnakar Gutte News Parbhani

गंगाखेड : गंगाखेड शहरासाठी आरक्षीत असलेल्या गोदावरीतील कच्च्या बंधाऱ्यावर काल रात्री हाय होल्टेज ड्रामा घडला. रात्रीतून पाणी सोडू नये म्हणून पोलीसांनी तेथे दंगा नियंत्रण पथक तैनात केले. तर आज सकाळी त्याच ठिकाणी झालेल्या बैठकीत या पाणीसाठ्याचे ऑडीट करून शिल्लक राहणारे पाणी खालील गावांसाठी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. मी शहरासाठी पाणी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार रत्नाकर गुट्टे यांनी यावेळी दिली. तर शहरवासीयांची कोरोना काळात भटकंती होवू नये, एवढाच आपला ऊद्देश असल्याचे कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी म्हटले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून गोदापात्रातल्या कच्च्या बंधाऱ्यातील पाण्यावरून वातावरण चांगलेच तापलेले आहे.  रत्नाकर गुट्टे यांनी खालच्या भागातील गावांसाठी हे पाणी सोडण्याची आग्रही भुमिका घेतली. तर कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी हे पाणी शहरवासीयांसाठी अत्यंत महत्वाचे असल्याने ते सोडण्यास तीव्र विरोध केला. यादव यांच्या तक्रारीवरून येथे पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला आहे.

दरम्यान  गुट्टे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याची तयारी केली होती. ही बाब समजताच गोविंद यादव, नगराध्यक्ष विजयकुमार तापडिया यांनी जिल्हाधिकारी डॉ. दीपक मुगळीकर, तहसीलदार स्वरूप कंकाळ, पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांच्याशी संपर्क साधत हा प्रकार थांबवण्याची मागणी केली. पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी  बंधाऱ्याच्या ठिकाणी धाव घेत गुट्टे व त्यांच्या समर्थकांना पाणी सोडण्यापासून रोखले. 

जिल्हाधिकारी आणि गुट्टे यांच्यात दुरध्वनीवरून झालेल्या चर्चेनंतर आज नगरपालिका प्रशासनासोबत बैठक घेण्याचे ठरले. बंधारास्थळीच बैठक पार पडली. ऊपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी स्वरूप कंकाळ, ऊपमुख्याधिकारी स्वाती वाकोडे, न. प. च्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता पाटील आदी यावेळी ऊपस्थित होते.

आगामी दोन महिन्यात शहरासाठी आवश्यक असलेले अंदाजे ९ कोटी लीटर पाणी याच बंधाऱ्यात सुरक्षीत ठेवून ऊर्वरीत पाणी खालच्या भागातील शेती आणि मुक्या जनावरांसाठी सोडण्यात यावे, असा निर्णय यावेळी घेण्यात आला. खालच्या भागातील ग्रामस्थांनी प्रत्यक्ष भेटून मागणी केल्यामुळेच आपण ही भूमिका घेतली असल्याचे  रत्नाकर गुट्टे यांनी यावेळी सांगीतले. हे पाणी कमी झाले तरी शहरासाठी कुठल्याही परिस्थितीत पाणी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

शहरवासीयांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नगर परिषदेची असून ती पार पाडण्यासाठी हे पाणी आवश्यक असल्याचे नगराध्यक्ष विजयकुमार यांनी सांगीतले. तर खालच्या भागातील गावांसाठी अतिरीक्त पाणी मागून घ्यावे, अशी मागणी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी केली. ऐन ऊन्हाळा आणि कोरोना काळात शहरवासीयांची पाण्यासाठी भटकंती होवू नये, एवढीच अपेक्षा असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले.

जि. प. सदस्य प्रल्हाद झोलकर यांनी झोला, पिंप्री, मसला आदि गावांमधील शेतकऱ्यांच्या अडचणी मांडत या शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्याची मागणी आक्रमक होत मांडली. शिवसेना जिल्हा ऊपप्रमुख विष्णू मुरकुटे यांनी डिग्रस बंधाऱ्यातील पाणी सोडण्यास कोणीही विरोध न केल्याचा मुद्दा मांडत पाणी सोडण्यास विरोध केला. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com