वक्फची जमीन ह़डपणाऱ्यांना तुरुंगात पाठवल्याशिवाय शांत बसणार नाही.. - Waqf land grabbers will not be silenced unless they are sent to jail.. | Politics Marathi News - Sarkarnama

वक्फची जमीन ह़डपणाऱ्यांना तुरुंगात पाठवल्याशिवाय शांत बसणार नाही..

जगदीश पानसरे
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

महाराष्ट्र वक्फ बोर्डावर मुस्लिम खासदारांची निवड केली जाते, त्यानूसार माझी निवड झाली आहे. याचा आनंद तर आहेच, पण हे पद म्हणजे काटेरी मुकूट आहे हे देखील मला माहित आहे.

औरंगाबाद ः महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या सदस्यपदी निवड झाल्यामुळे माझ्या लढ्याला अधिक बळकटी मिळणार आहे. पण हे पद म्हणजे काटेरी मुकूट आहे, याची मला जाणीव आहे. आता केवळ औरंगाबादच नाही तर मराठवाडा आणि महाराष्ट्रात जिथे कुठे वक्फ बोर्डाची जमीन बेकायदेशीररित्या विकण्यात आली आहे, अशा सगळ्या प्रकरणांमध्ये मी लक्ष घालणार नाही. गोर-गरीब- विधवा, बेरोजगारांच्या भल्यासाठी असलेल्या कोट्यावधीच्या वक्फच्या जमीनी विकणाऱ्यांना तुरूगांत पाठवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला.

महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या सदस्यपदी निवड झाल्यानंतर इम्तियाज जलील आज शहरात दाखल झाले. तेव्हा चिकलठाणा विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. वक्फ बोर्डाची जालना रोडवरील एक लाख हेक्टर जमीन मुतवल्ली, वक्फ बोर्डातील अधिकारी, महापालिका, मुद्रांक शुल्क कार्यालय, भूमीअभिलेख कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मिळून शहरातील व्यापारी, बिल्डरांना विकल्याचा खळबळजनक आरोप गेल्या महिन्यात इम्तियाज जलील यांनी केला होता.

तब्बल शंभर कोटींचा हा गैरव्यवहार असल्याचा दावा करत चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर आता इम्तियाज जलील यांचीच वक्फ बोर्डाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आज विमानतळावर प्रसार माध्यमांशी बोलतांना इम्तियाज जलील म्हणाले,  महाराष्ट्र वक्फ बोर्डावर मुस्लिम खासदारांची निवड केली जाते, त्यानूसार माझी निवड झाली आहे. याचा आनंद तर आहेच, पण हे पद म्हणजे काटेरी मुकूट आहे हे देखील मला माहित आहे.

उपोषणाच्या निर्णयावर ठाम..

शहरातील वक्फ बोर्डाची जमीन भूमाफियांच्या घशात घालणाऱ्यांच्या विरोधात मी उभारलेल्या लढ्याला या नव्या जबाबदारीने अधिक धार आली आहे. असे असले तरी बोर्डाचा सदस्य म्हणून मला किती सहकार्य तेथील अधिकारी वर्गाकडून मिळेल हे सांगणे कठीण आहे. जमीन गैरव्यवहाराची माहिती, कादपत्रे मला सहजासहजी मिळणार नाहीत. पण मी माघार घेणार नाही. ज्यांनी वक्फ बोर्डाची जमीन विकून स्वतःची घर भरली त्यांना तुरुगांत पाठवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही एवढे मात्र निश्चित.

शंभर कोटीहून अधिकच्या वक्फ बोर्डाच्या जमीन घोटाळ्यातील आरोपींची नावे, पुराव्यानिशी मी दिली आहेत. पोलिसांनी संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत ही माझी मागणी आहे. २६ फेब्रुवारी पर्यंत या प्रकरणातील दोषींवर गुन्हे दाखल झाले नाही,तर जिल्हाधिकार कार्यालयासमोर एक हजार समर्थकांसह आमरण उपोषणाला बसण्याचा माझा निर्धार पक्का आहे. आता त्याची जाेरदार तयारी सुरू केली असल्याचेही इम्तियाज जलील यांनी सांगतिले.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख