व्हेंटीलेटर्स, ऑक्सीजनअभावी जीव जात असताना पालकमंत्र्यांनी बीडला वाऱ्यावर सोडला - Ventilators, the Guardian left the district to the winds while the oxygen-deprived creatures were dying | Politics Marathi News - Sarkarnama

व्हेंटीलेटर्स, ऑक्सीजनअभावी जीव जात असताना पालकमंत्र्यांनी बीडला वाऱ्यावर सोडला

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 एप्रिल 2021

पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा वाऱ्यावर सोडून फक्त परळीत ठाण मांडल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष अशोक हिंगे यांनी केला.

बीड : बेड, ऑक्सीजन, व्हेंटीलेटर्स उपलब्ध नाहीत, रेमडेसिव्हीरचा तुटवडा आणि काळाबाजार सुरु आहे. अशा परिस्थितीत पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा वाऱ्यावर सोडल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष अशोक हिंगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला. 

जिल्ह्यात कोरोनाचा कहर माजलेला असताना जिल्ह्याचे पालकमंत्री धंनजय मुंडे हे फक्त परळी येथे ठाण मांडून बसले आहेत. बाकीचा संपूर्ण जिल्हा वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहेत. लाॅकडाऊन झाले तरी बीड जिल्ह्यात कोरोना रूग्णाची संख्या कमी होत नाही. शासकीय आणि खाजगी रूग्णालयातही ऑक्सीजन, बेड, व्हेंटीलेटर्स नसल्याने रुग्णांचे जीव जात आहेत.

गेल्या तीन दिवसांत एक हजारांच्यावर रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सची गरज असताना फक्त दोनशे चाळीस इंजेक्शन उपलब्ध झाले. आज इंजेक्शन अभावी अनेक रूग्णांना जिव गमवावा लागणार आहे.  जिल्हा प्रशासन नवीन पाचशे खाटांचे अद्यावत रूग्णालय उभारण्याची घोषणा करत असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी काहीच नाही. जिल्हा रुग्णालयात कर्मचारी संख्या कमी पडत आहे. साफसफाई, स्वच्छतेकडे पुर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील हिंगे यांनी केला.

जिल्ह्यात अशी परिस्थिती असतांना पालकमंत्री  धनंजय मुंडे यांनी प्रत्येक तालुक्याला भेटी देऊन पाहणी केली असती तर त्यांना हे ढिसाळ नियोजन दिसुन आले असते. पालकमंत्र्यांनी लक्ष घातले तर रेमडीसिवीर ईंजक्शनचा कोटा वाढवून मिळेल.

वेळ अजूनही गेलेली नाही, धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेऊन रेमडीसिवीर इंजेक्शन,आॅक्सीजन पुरवठा नवीन रुग्णालयाची उभारणी, लस उपलब्धता यात जातीने लक्ष घातले, तर रुग्णांचे जीव वाचतील आणि जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण कमी होईल.
अन्यथा  बिघडलेल्या परिस्थितीला पालकमंत्री आणि जिल्हाप्रशासन जबाबदार, राहील असेही, हिंगे म्हणाले. 

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख