शिवाजी महाराज व गड-किल्ल्यांच्या नावाचा वापर बार, ढाब्यावर करण्यास बंदी आणणार. - The use of the names of Shivaji Maharaj and his forts will be banned on bars and dhabas | Politics Marathi News - Sarkarnama

शिवाजी महाराज व गड-किल्ल्यांच्या नावाचा वापर बार, ढाब्यावर करण्यास बंदी आणणार.

युवराज धोतरे
सोमवार, 15 फेब्रुवारी 2021

राज्यामध्ये अनेक ठिकाणी बियर बार, वाईन शाप व धाब्याना छत्रपती, मराठा, रायगड, राजगड अशी अनेक राजघराण्याशी संबंधित नावे देण्यात आलेली आहेत.

उदगीर : राज्यातील अनेक बियरबार, ढाबे, रेस्टाॅरंट, वाईन शाॅपला छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्यांच्या गड किल्ल्यांची नावे दिली जातात. खरतर हा अपमान आहे, यापुढे महाराजांचे किंवा त्यांच्या गड किल्ल्यांचे नाव कुठल्याही वाईन शाॅप, बार, ढाब्याला देण्यावर बंदी आणावी, असा प्रस्ताव आपण विधीमंडळात आणणार असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितले.

रविवारी नगरपालिकेच्या व्यापारी संकुला समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित शिवचरित्र व्याख्यानात मिटकरी बोलत होते. यावेळी. राज्याचे संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे अध्यक्षस्थानी होते.

आमदार अमोल मिटकरी हे शिवचरित्र वक्ते म्हणून ओळखले जातात. छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि त्यांनी अनेक लढाया करून जिकलेले गड-किल्ले आणि स्थापिलेले स्वराज्य याची महती ते आपल्या व्याख्यानातून देत असतात. उदगीर येथील व्याख्यानात बोलतांना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्यभरात सुरू असलेले बार, वाईन शाॅप, ढाबे याबद्दल नाराजी व्यक्त केली.

शिवाजी महाराजांसारख्या थोर पराक्रमी, योध्याचे आणि शत्रूशी लढून हस्तगत केलेल्या ऐतिहासिक किल्ल्यांची नावे अशी बार आणि दारूच्या दुकानांना दिली जात असल्याबद्दल खंत व्यक्त केली. छत्रपतींचे आपण वारसदार आहोत. राज्यामध्ये अनेक ठिकाणी बियर बार, वाईन शाप व धाब्याना छत्रपती, मराठा, रायगड, राजगड अशी अनेक राजघराण्याशी संबंधित नावे देण्यात आलेली आहेत.

हे  चुकीचे असून छत्रपती शिवराय हे निर्व्यसनी होते. त्यांचा मान राखण्यासाठी मद्य, मंदिरा, हॉटेलवर टाकण्यात आलेली नावे काढणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी मी येत्या विधिमंडळात ठराव मांडणार असून तो मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मिटकरी यांनी यावेळी सांगितले.  त्यानंतरही जर ही नावं  धाबे, हाॅटेल, बार, वाईन शाॅपवर दिसली तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल. यासाठी राज्यमंत्री बनसोडे मला मदत करतील असेही मिटकरी म्हणाले. 

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख