शिस्तीने मास्कचा वापर करा, अन् कोरोना हद्दपार करा : सुभाष देसाई

कठीण काळ सहन केला, आता नियमांचे पालन करून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करा, असे आवाहन देसाई यांनी यावेळी केले.
Minister Subhash Desai Corona news aurangabad
Minister Subhash Desai Corona news aurangabad

औरंगाबाद :कोरोना विषाणूचा प्रसार जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वांनी कोरोनाचा कठीण काळ सहन केला आहे. शासनाच्या त्रिसूत्रीची अंमलबजावणीही केली. परंतु पुन्हा आता शिस्तीने मास्कचा वापर, वारंवार हात धुणे आणि शारीरिक अंतराचा वापर करायलाच हवा. याच माध्यमातून आपण कोरोनाचा आजार पूर्णपणे हद्दपार करण्यात यशस्वी होऊ, असा विश्वास उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. 

पोलीस आयुक्त कार्यालयात कोरोना योद्धा सन्मान समारंभ कार्यक्रमात देसाई बोलत होते. कोरोना आजार जेव्हा देशात आला. जिल्ह्यात आला. तेव्हा या आजार, विषाणूबाबत, उपचार घेण्याबाबत कुणालाच कल्पना नव्हती. तरीही विकसित देशाच्या तुलनेत देशात व राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यात आपण यशस्वी झालो आहोत. जानेवारी २०२१ पर्यंत कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात असल्याचे वाटत होते. यामध्ये सर्व शासकीय यंत्रणेचे यशस्वी प्रयत्न आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वारंवार फेसबुक व सामाजिक माध्यमांचा वापर करून कोरोना विषाणूचा आजार नियंत्रणात आणण्यासाठी, प्रसार रोखण्यासाठी जनतेला आवाहन केले. जनतेनेही मोठ्याप्रमाणात सकारात्मकपणे त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. त्यातून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मदत झाली. या कोरोना काळात पोलिस यंत्रणांनी खूप मेहनतीने कर्तव्य पार पाडले. त्या कोरोना योद्ध्यांचा सन्मान होतो आहे, याचा मला आनंद असल्याचे देसाई म्हणाले. 

फेब्रुवारी महिन्यात कोरोना विषाणूचा प्रसार वाढला आहे. त्यावर नियंत्रणासाठी सर्वांनी त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहनही त्यांनी केले. त्याचबरोबर कोरोनाच्या कालावधीत मृत पावलेल्या पोलिसांना आदरांजली वाहिली.  कठीण काळ सहन केला, आता नियमांचे पालन करून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करा, असे आवाहन देसाई यांनी यावेळी केले. 

कोरोना योद्धे सन्मानित

पालकमंत्री देसाई यांच्याहस्ते पोलीस विभागातील हनुमंत भापकर, मनोज पगारे, संतोष जोशी, जगदीश बडगुजर, सचिन सानप, युसूफ पठाण, सोनाजी भोटकर, संतोष पाटील, ज्ञानेश्वर सोनार, शरद इंगळे, रवीन्द्र शिरसाठ, सचिन इंगोले, संगीता गिरी, सुजाता राजपूत, कपील खिल्लारे, अशोक जाधव, दशरथ केंद्रे, गजानन हिवाळे, विश्वनाथ आहेर, सुनील जोशी आणि सुखदेव जाधव या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com