पुतण्यामुळे काकांची वाट चुकली?

पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्याकडून झालेला पराभव त्यांच्या मनावर घाव करून गेला.
पुतण्यामुळे काकांची वाट चुकली?
Shivsena Leader Jaydatta Kshirsagar News Beed

बीड ः बीड विधानसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर शिवसेनेत दाखल झालेले, पण अजूनही तिथे फारसे न रमलेले माजी मंत्री व शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर भविष्यात काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राजकारणात मोठे पराभव पचवून पुन्हा उभारी घेणाऱ्या नेत्यांमध्ये जयदत्त क्षीरसागर यांचे नाव घेतले जाते. पण विद्यमान आमदार व पुतणे संदीप क्षीरसागर यांच्याकडून झालेल्या पराभवामुळे काकांची वाट चुकल्याची चर्चा  या निमित्ताने राजकीय वर्तुळात सुरू आहे.

जिल्ह्याच्या राजकारणावर एकेकाळी दिवंगत केशरबाई क्षीरसागर व त्यानंतर त्यांचे चिरंजवी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची मजबुत पकड होती. आपल्या विरोधकांना त्यांनी कधीच डोके वर काढू दिले नाही. दांडगा लोकसंपर्क, कार्यकर्त्यांची मजबुत फळी ही त्यांची बलस्थाने राहिली आहेत. केशरकाकूंनतर जयदत्त क्षीरसागर यांनीही त्यांचा राजकीय वारसा भक्कमपणे पुढे नेला. पंचायत समितीचे सभापती ते कॅबीनेट मंत्री त्यांचा राजकीय प्रवास राहिला.  

बीड, चौसाळा मतदार संघातून त्यांनी अनेक विजय मिळवले आणि पराभवही पचवले. पण, अडचणीतही त्यांनी कधी लोकांशी असलेला संपर्क तुटू दिला नव्हता.  २००४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा चौसाळा मतदार संघातून केशव आंधळे यांच्याकडून अनपेक्षित पराभव झाला. पण, त्यानंतर जिद्दीने लढून त्यांनी बीडमधून  ७० हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यामुळे एखाद्या निवडणुकीतील पराभव जिव्हारी लावून गप्प बसणे हा जयदत्त क्षीरसागर यांचा स्वभाव नाही.

पण २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्याकडून झालेला पराभव त्यांच्या मनावर घाव करून गेला. या पराभवामुळे ते मनाने देखील हरले की काय? अशी चर्चा त्यांच्या विरोधकांसह समर्थकांमध्ये देखील होत आहे. कोरोना, लॉकडाऊनमुळे लोकसंपर्कात अचडणी असतांना त्यांनी सामान्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला होता.  तरी त्यांची वाटचाल म्हणावी तशी वेगवान नव्हती. जयदत्त क्षीरसागर यांनी राजकारण करतांना मतदारपलिकडे जिल्ह्यात आपला संपर्क आणि कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे जयार केले होते.  त्या जोरावच लोकसभा, विधानसभांच्या निवडणुकांध्ये जयदत्त क्षीरसांगराचा कायम वरचष्मा राहिला.

बीडसह गेवराई,  माजलगाव, आष्टीतील राजकीय गणिते आणि निकाल बदलण्याची ताकद त्यांच्यात होती. अशोक पाटील लोकसभेचे उमेदवार असताना शरद पवार यांच्या तोंडाव `बोथट हत्यार दिले, लढाई कशी जिंकणार`, असा थेट सवाल करण्याची धमकही जयदत्त यांनी दाखवल्याचे सर्वश्रुत आहे. २०१४ च्या मोदी लाटेत राष्ट्रवादीकडून जिल्ह्यात विजयी होणारे ते एकमेव आमदार होते. परंतु राज्यात सत्ता भाजपची आली आणि त्यांची पक्षांतर्गत कोंडीही सुरु झाली.

त्यामुळे जिल्हाभरात वावर असलेल्या जयदत्त अण्णांनी बीड शहरावर लक्ष केंद्रीत केले आणि तिथेच ते चुकले. घरातूनच त्यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकल्यामुळे ते अधिकच अडचणीत सापडले. निवडणुकीत पराभवही झाला. या पराभवाने त्यांचा राजकारणातील प्रभावही काहीसा कमी झाल्याचे दिसून येत आहे.

शिवसेनेपासून दुरावा का?

क्षीरसागर घराण्याचा राजकीय सुरुवात आणि बहुतांशी काळ काँग्रेस विचारसणीतच गेला. काँग्रेसमध्येही दिवंगत केशरबाई क्षीरसागर निव्वळ शरद पवार गटाच्याच होत्या असे नाही. पण, पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केल्यानंतर क्षीरसागरांनी पवारांची साथ दिली. राष्ट्रवादीत २० वर्षे घालविलेल्या क्षीरसागरांना पक्षाने राज्यमंत्री, कॅबीनेट मंत्रीपदे दिली. पक्षातील प्रमुख ओबीसी नेत्यांमध्ये त्यांची ओळख होती. पण, २०१४ च्या निवडणुकीतील सत्तांतरानंतर त्यांची भाजप नेत्यांशी जवळीक अधिकच वाढली.

मात्र, एका म्यानात दोन तलवारी नको आणि त्यावेळी युतीत बीडची जागाही शिवसेनेला होती म्हणून त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर भाजप ऐवजी शिवबंधन हाती बांधले. पक्षाने त्यांना सहा महिन्यांसाठी कॅबीनेट मंत्रीपदही दिले. पण, शिवसेना पक्ष सत्तेत आल्यापासून क्षीरसागर पक्षापासून दुरावलेत का, असे चित्र आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा पक्षातील प्रमुख कोण्या मंत्र्यांचे त्यांच्या पुढाकाराने अद्याप एकही मोठा कार्यक्रम झालेला नाही.

भाजप मंत्री रावसाहेब दानवे यांची ते औरंबादला भेट घेतात. पण, त्याच दिवशी बीडमध्ये आलेल्या पक्षातील मंत्री संदीपान भुमरेंच्या कार्यक्रमापासून दुर राहतात. त्यामुळे नगर पालिका निवडणुक आणि शहरातील जातीय समिकरणे पाहता क्षीरसागर शिवसेनेपासून सुरक्षित अंतर तर पाळत नाहीत ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. जर सेनेपासून डिस्टन्स तर मग वाट कुणीकडे असाही प्रश्नही उरतोच.

Edited By : Jagdish Pansare
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in