विश्वास बसणार नाही, ६४ वर्षानंतर औरंगाबादला केंद्रात मंत्रीपद.. - Unbelievable, after 64 years, Aurangabad has a ministerial post at the Center. | Politics Marathi News - Sarkarnama

विश्वास बसणार नाही, ६४ वर्षानंतर औरंगाबादला केंद्रात मंत्रीपद..

जगदीश पानसरे
गुरुवार, 8 जुलै 2021

डाॅ. भागवत कराड हे मुळचे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्याची चिखली गावचे मुळ रहिवाशी असले तरी त्यांची राजकीय जडणघडण ही औरंगाबादेतच झाली.

औरंगाबाद ः भाजपच्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये राज्यसभेचे खासदार डाॅ. भागवत कराड यांना स्थान देण्यात आले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली. ही घटना औरंगाबादच्या आतापर्यंतच्या राजकारणासाठी ऐतिहासिक ठरली आहे. विशेष म्हणजे स्वांतत्र्यांनतर सर्वाधिक काळ देशावर राज्य करणाऱ्या काॅंग्रेस पक्षाला औरंगाबाद जिल्ह्याने एक नव्हे तर तब्बल सातवेळा यश दिले. (Unbelievable, after 64 years, Aurangabad has a ministerial post at the Center.) परंतु त्या काॅंग्रेसने देखील केंद्रात मंत्रीपदासाठी कधी औरंगाबादचा विचार केला नाही.

काॅंग्रेस नंतर या मतदारसंघावर शिवसेनेचा कायम वरचष्मा राहिला. पण केंद्रातील एनडीए सरकारमध्येही औरंगाबादला मंत्रीपदाच्या बाबतीत दुर्लक्षितच ठेवण्यात आले. शिवसेनेनेही या मतदारसंघात सातवेळा विजय मिळाला. चारवेळा सलग निवडून आलेले शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना देखील मंत्रीपद मिळू शकले नव्हते. (Aurangabad Bjp Center Minister Dr. Bhagwat Karad) या उलट युतीमध्ये कायम शिवसेनेकडे असलेल्या या मतदारसंघात भाजपला एकदाही निवडणूक लढवता आली नाही. त्यामुळे भाजपला इथे प्रतिनिधित्व करण्याची संधी कधी मिळालीच नाही. 

असे असले तरी स्वातंत्र्यांचा ६४ वर्षानंतर जेव्हा केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बहुमताचे सरकार आले, तेव्हा राज्यसभेवर औरंगाबादला प्रतिनिधित्वही मिळाले आणि केंद्रात पहिल्यांदा मंत्रीपदही. औरंगाबादच्या राजकारणासाठी ही मोठी उपलब्धी आहे.औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याला आतापर्यंत मंत्रीपद मिळाले नसले तरी मराठवाड्यातील अनेक नेत्यांना केंद्रात काम करण्याची संधी मिळाली आहे. 

मराठवाड्याला संधी,पण राजधानी वंचितच..

यात प्रामुख्याने नांदेड जिल्ह्यातील काॅंग्रेसचे दिवगंत नेते शंकराव चव्हाण, लातूर विलासराव देशमुख, बीडमधून गोपीनाथ मुंडे यांचा समावेश होता. याशिवाय शिवराज पाटील चाकूरकर, सुर्यकांता पाटील, रावसाहेब दानवे यांना देखील केंद्रात काम करण्याची संधी मिळाली. पण औरंगाबाद जिल्ह्याला मात्र तब्बल ६४ वर्ष केंद्रातील मंत्रीपदासाठी वाट पहावी लागली. डाॅ. भागवत कराड हे मुळचे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्याची चिखली गावचे मुळ रहिवाशी असले तरी त्यांची राजकीय जडणघडण ही औरंगाबादेतच झाली. 

अगदी अपक्ष नगरेसवक, उपमहापौर, दोनवेळा महापौर, मराठावाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष, राज्यसभेवर खासदार आणि आता केंद्रा राज्यमंत्रीपर्यंतचा त्यांचा प्रवास याच शहरातून झाला. त्यामुळे खऱ्या अर्थाने औरंगाबादला त्यांच्या रुपाने पहिले केंद्रातील मंत्रीपद मिळाले आहे.

१९५७ ते २०२१ या काळातील औरंगाबादच्या खासदारांवर नजर टाकली तर सर्वाधिक यश हे काॅंग्रेस आणि शिवसेनेच्या वाट्याला आलेले आहे. काॅंग्रेसकडून स्वामी रामानंद तीर्थ, बी.डी. देशमुख, माणिकराव पालोदकर,  काझी सलीम, रामकृष्ण बाबा पाटील आणि एस काॅंग्रेसकडून साहेबराव पाटील यांनी केंद्रात जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केलेले आहे. पंरतु यातील एकालाही केंद्रात मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली नाही.

विरोधी पक्षाचे कायम वर्चस्व..

हीच स्थिती शिवसेनेच्या बाबतीतही होती.  मोरेश्वर सावे, प्रदीप जैस्वाल, चंद्रकांत खैरे यांनी देखील सातवेळा औरंगाबाद मतदारसंघातून विजय मिळवला. खैरे तर सलग चारवेळा निवडून आले, परंतु केंद्रातील मंत्रीपदाने त्यांना हुलकावणीच दिली. जनता पक्षाकडून बापूसाहेब काळदाते हे देखील औरंगाबादेतून विजयी झाले होते, मात्र त्यांनाही केंद्रात मंत्रीपद मिळाले नव्हते. त्यामुळे ६४ वर्षानंतर औरंगाबादला मिळालेले हे केंद्रीय राज्यमंत्री पद महत्वाचे समजले जाते. 

१९५७ ते ९० या काळात काॅंग्रेसची केंद्रात सत्ता असूनही औरंगाबादकडे दुर्लक्ष झाले. अन्यथा त्याकाळात जिल्ह्याला मंत्रीपद मिळणे कठीण नव्हते. कारण त्यापुढच्या काळात ९८-९९ हा एक वर्षाचा काॅंग्रेसचे खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांचा काळ सोडला तर पुढील काळात या मतदारसंघात सातत्याने शिवसेनेने विजय मिळवला होता. परंतु अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि आताच्या मोदी सरकारचा काळ सोडला तर विरोधी पक्षाचा खासदार म्हणून औरंगाबादला मंत्रीपद मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती.

एनडीएमध्ये शिवसेनेच्या वाट्याला एक-दोन मंत्रीपद यायची तर त्यावर मुंबईच्या खासदारांची वर्णी लागायची. २०१४ मधील मोदी सरकारमध्ये शिवसेना असल्यामुळे तेव्हा देखील वाट्याला आलेल्या मंत्रीपदाची झुल मुंबई, कोकणातल्या खासदारांच्या अंगावरच पांघरली गेली. गेल्यावेळी चंद्रकांत खैरे यांना मंत्रीपद मिळणार अशी चर्चा होती, मात्र तेव्हा देखील मुंबईच्या नेत्यांचीच सरशी झाली होती. त्यामुळे भागवत कराड यांच्या मंत्रीपदामुळे पहिल्यांदा औरंगाबादला खऱ्या अर्थाने  भाजपकडून न्याय मिळाला, असेच म्हणावे लागेल.

हे ही वाचा ः मुंडे भगिनींना शह आहेच, पण शिवसेनेला रोखण्याची डाॅक्टरांवर जबाबदारी..

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख