औरंगाबादः शहरात आणखी दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती घाटीचे समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली. शहरातील संजयनगर भागातील ४७ वर्षीय, तर बहादुरपुरा भागातील ७० वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना मृतांचा आकडा ४४ वर गेला आहे. तर २६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाल्यामुळे बाधितांचा आकडा देखील १२१२ इतका झाला आहे.
शहरातील कोरोना रुग्ण आणि मृतांची संख्या काही केल्या कमी होत नाहीये. गुरुवारी दुपारी आणि शुक्रवारी पहाटे शहरातील आणखी दोन कोरोनाबाधित महिलांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. संजयनगर भागातील ४१ वर्षीय महिलेला १६ मे रोजी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १९ मे रोजी सदर महिलेचा स्वॅब अहवाल पॉझीटीव्ह आला होता. न्युमोनिया, श्वास घ्यायला त्रास, मधुमहे आणि उच्चरक्तदाबाचा देखील या महिलेस त्रास होता. त्यातच कोरोनाची लागण झाल्यामुळे गुरुवारी दुपारी एक वाजता या महिलेचा मृत्यू झाला.
दुसरी मृत महिला ही ७० वर्षीय बहादुरपुरा भागातील असून त्यांना १४ मे रोजी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांचा अहवाल १५ रोजी प्राप्त झाला, त्यात कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. या सोबतच न्यूमोनिया, मधुमहे, श्वसनाचा विकार आणि उच्चरक्तदाब असल्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. शुक्रवारी पहाटे या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
या शिवाय आज सकाळी २६ नव्या रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा १२१२ वर गेला. आज आढळलेल्या २६ रुग्णांपैकी जयभीमनगर-५, गरमपाणी-२, रहेमानिया कॉलनी-२, कुवारफल्ली, राजाबाजार-१, सुराणानगर-१, मिलकॉर्नर-१, न्यायनगर-४, भवानीनगर, मोंढा-२, रहीमनगर-जसवंतपुरा-१, पुंडलीकनगर-१, सातारा परिसर, जवाहर कॉलनी प्रत्येकी एक, टाईम्स कॉलनी, कटकटगेट-३, एन-२, सिडको-१ यांचा समावेश आहे.

