आम्हाला नाव ठेवणारे आता आमचचं अनुकरण करतायेत.. मेटेंचा संभाजीराजेंना टोला. - Those who named us are now imitating us | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ८.३० वाजता आषाढी पौर्णिमा- धम्म चक्र दिवशी देशवासियांशी संबोधित करतील . मोदी यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.
चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.

आम्हाला नाव ठेवणारे आता आमचचं अनुकरण करतायेत.. मेटेंचा संभाजीराजेंना टोला.

सरकारनामा ब्युरो
रविवार, 6 जून 2021

आधी मोर्चाला विरोध केला, आणि आता तेच मोर्चाची तारीख जाहीर करत आहेत, मग आता समजाची दिशाभूल नाही का?

बीड - कोण काय म्हणतंय, याला आम्ही फार महत्व देत नाही. ज्यांनी आमच्यावर समाजाची दिशाभूल करतायेत असा आरोप केला, तेच आता आमचे अनुकरण करत आहेत. आम्ही जे निर्णय घेतले त्याच्या पाठीमागे येत आहेत. आधी मोर्चाला विरोध केला आणि आता तेच मोर्चाची तारीख जाहीर करत आहेत, अशा शब्दात शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी खासदार छत्रपती संभाजीराजे यांना नाव न घेता टोला लगावला.

मराठा आरक्षणासाठी शनिवारी विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या प्रकरणी मेटे, माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्यासह तीन हजार मोर्चेऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे देखील दाखल केले आहेत. त्यानंतर आज शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने छत्रपती संभाजीराजे यांनी देखील येत्या १६ जून रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली.

या संदर्भात मेटे यांना विचारले असता, ते म्हणाले, आमच्या मोर्चाबद्दल कोण काय म्हणतं याकडे आम्ही फारसे लक्ष देत नाही. मराठा समाजाला न्याय, सोयी-सुविधा मिळवून देण्यासाठी आम्ही काम करत राहू. ज्यांनी आमच्यावर हे समाजाची दिशाभूल करत आहेत, विश्वासघात करत आहेत, असे म्हणत आरोप केले होते, तेच आमच्या निर्णयाचे अनुकरण करत आहेत.

आधी मोर्चाला विरोध केला, आणि आता तेच मोर्चाची तारीख जाहीर करत आहेत, मग आता समजाची दिशाभूल नाही का? आता लोकांची, समाजाची दिशाभूल कोण करतयं हे जनता ठरवेल, आम्ही मात्र अशा गोष्टींकडे लक्ष देत नाही, असा टोला विनायक मेटे यांनी छत्रपती संभाजीराजे यांना नाव न घेता लगावला.

मुख्यमंत्र्यांवरही गुन्हा दाखल करा..

मराठा आरक्षण प्रश्नावर मोर्चा काढला म्हणून माझ्यासह हजारो कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. हरकत नाही, आम्ही त्याला तोंड देऊ पळ काढणार नाही, असे म्हणत हे सरकार दुजाभाव करत आहे, विशेषतः मराठा समाजाच्या बाबतीत असा आरोप देखील मेटे यांनी यावेळी केला. मोर्चा काढणार असे जाहीर केल्यापासूनच जिल्हा प्रशासनाकडून आडकाठी आणण्याचे प्रयत्न झाले. खरंतर पोलिस मला व माझ्या कार्यकर्त्याना अटक करतंय की काय? असेच मला वाटत होते.

पण हे सरकार जर खरंच न्यायाने वागत असेल तर मुंबईत मुख्यमंत्री, मंत्री व इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमावर देखील गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मेटे यांनी केली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काही मंत्री व वरिष्ठ अधिकारी जमले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यासह या सर्वांवर देखील गुन्हा दाखल करावा, तरच हे सरकार न्यायाने वागते असे म्हणता येईल, असेही मेटे म्हणाले.

हे ही वाचा ः औरंगाबाद शहर अनलाॅक, उद्यापासून सर्व निर्बंध शिथील..

Edited By : Jagdish Pansare

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख