औरंगाबादेत तुर्तास लाॅकडाऊन नाहीच; नियम अधिक कडक करणार

औरंगाबाद ही राज्यातील एक महत्वाची उद्योगनगरी आहे. या ठिकाणी मोठे कारखाने, कंपन्या आहेत. यावर लाखो कामगारांचे जीवन अवलंबून आहे.
gardiaun minister Subhash Desai- Meeting In Aurangabad News
gardiaun minister Subhash Desai- Meeting In Aurangabad News

औरंगाबाद : शहर आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असली तरी तुर्तास पुर्ण लाॅकडाऊनचा कुठलाही विचार प्रशासन करत नाहीये. आरोग्य विभागाकडून परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच लाॅकडाऊनचा निर्णय घ्या, अशी मागणी करण्यात आली आहे. परंतु पालकमंत्री सुभाष देसाई यांनी मात्र योग्यवेळी लाॅकडाऊनचा निर्णय घेऊ, असे सांगून तुर्तास अंशतः लाॅकडाऊन आणि कोरोना नियमांचे कठोरपणे पालन करण्यावर भर देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यातील कोरोनाच्या झपाट्याने पसरत असलेल्या संसर्गाला तातडीने रोखण्यासाठी चाचण्यांमध्ये भरीव वाढ करत सर्व यंत्रणांनी रूग्णसंख्येच्या वाढत्या प्रमाणात अतिरिक्त उपचार सुविधांसह सज्ज रहाण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. कोरोना संसर्ग व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढावा बैठकीनंतर सुभाष देसाई पत्रकारांशी बोलत होते.

मराठवाड्यातील परभणी, नांदेड आणि बीड जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता दहा ते अकरा दिवसांचा लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबाद कोरोना रुग्णांची संख्याही पाच ते सहापट आहे. तर मृत्यूचे प्रमाण देखील सर्वाधिक आहे. त्यामुळे आज पालकमंत्री सुभाष देसाई औरंगाबादेत संपुर्ण लाॅकडाऊनची घोषणा करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

परंतु गेल्या वर्षभराच्या कोरोना संकट आणि लाॅकडाऊनमुळे शहर आणि जिल्ह्याची बिघडलेली आर्थिक घडी आता कुठे रुळावर येऊ लागली आहे. लोक रोजगारासाठी, उद्योग धंद्यासाठी बाहेर पडत आहेत. अशावेळी सपुर्ण लाॅकडाऊन करणे योग्य ठरणार नाही, असा विचार आढावा बैठकीत पुढे आला. व्यापारी आणि उद्योगपतींनी यापुर्वीच आता पुन्हा लाॅकडाऊन नको, अशी भूमिका मांडली होती.

औरंगाबाद ही राज्यातील एक महत्वाची  उद्योगनगरी आहे. या ठिकाणी मोठे कारखाने, कंपन्या आहेत. यावर लाखो कामगारांचे जीवन अवलंबून आहे. कोरोनाचा धोका निश्चितच मोठा आहे, पण लाॅकडाऊनमुळे बेरोजगारी आणि उद्याेग, व्यवसाय पुन्हा संकटात सापडण्याचा धोका आहे. हे लक्षात घेता बैठकीत कोरोना रुग्णांच्या मोठ्या प्रमाणात चाचण्या आणि विलगीकरणावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

रूग्णांचे वेळेत निदान होऊन संसर्गाला जागीच रोखण्यासाठी भरीव प्रमाणात कोरोना चाचणी केंद्र ५०० पर्यंत वाढवून १० हजारांपर्यंत चाचण्यात वाढ करण्यात येणार आहे. औषधांची उपलब्धता,आवश्यक प्रमाणात ऑक्सीजन, वाढीव व्हेंटीलेटर उपलब्ध करून देण्यात येतील असे सुभाष देसाई यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत जनतेचा रोजगार, उत्पन्न बंद होऊ नये ही शासनाची भूमिका असून त्यासोबतच कोरोनाला रोखणे ही प्राथमिकताही असल्याचे देसाई म्हणाले. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com