वाळू माफियांची दहशत, संरक्षण मात्र चोरांना; कारवाई करा, मुख्यमंत्र्यांना पत्र - Terror of sand mafia, protection but thieves; Take action, letter to CM | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

वाळू माफियांची दहशत, संरक्षण मात्र चोरांना; कारवाई करा, मुख्यमंत्र्यांना पत्र

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 15 एप्रिल 2021

पोलिस व महसूल प्रशासनाच्या डोळ्यादेखत हा सर्व प्रकार होत आहे. हा वाळू उपसा थांबवावा यासाठी संबंधित ग्रामस्थांनी अनेकवेळा तक्रारी, उपोषणही केले.

बीडः जिल्हयातील विविध ठिकाणच्या गंगा पात्रातून वाळूचा अवैध उपसा सध्या मोठया प्रमाणावर सुरू आहे, हा उपसा तात्काळ थांबवून वाळू माफियांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे. जिल्हयात आता माफियांची सत्ता असून दहशत जनतेला आणि संरक्षण मात्र चोरांना अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झाल्याची टिका त्यांनी केली आहे.

 परळी तालुक्यातील मौजे पोहनेर येथील गोदावरी गंगा पात्रातील वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कडक कारवाई करून बुडवलेला महसूल वसूल करावा, या मागणीसाठी पोहनेरसह डिग्रस, तेलसमुख, बोरखेड या गावांतील ग्रामस्थ परळी येथील उप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषणास बसले आहेत.  मस्थांनी पोहनेर येथील वाळू उपशाचा प्रकार पंकजा मुंडे यांना सांगताच त्यांनी मुख्यमंत्री, महसूल मंत्री व विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी केली.

 गेवराई, माजलगाव, परळी या तालुक्यातील गंगा पात्रातून सध्या वाळूचा अवैध उपसा व वाहतूक मोठया प्रमाणावर होत असून शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडवला जात आहे.  पोलिस व महसूल प्रशासनाच्या डोळ्यादेखत हा सर्व प्रकार होत आहे. हा वाळू उपसा थांबवावा यासाठी संबंधित ग्रामस्थांनी अनेकवेळा तक्रारी, उपोषणही केले, पण पोलिस व महसूल प्रशासन कारवाई करण्याचे धाडस दाखवत नाहीत. 

परजिल्हयातील अधिकाऱ्यांचे पथक नेमा

गोदावरी गंगा पात्रातील उपसा केलेल्या वाळूचे तात्काळ पंचनामे करावेत, बाहेरील जिल्हयाच्या अधिकाऱ्यांची टीम नियुक्त करून अवैध वाळू साठयांवर छापे मारून त्याचे ऑडिट करावे तसेच  वाळू माफियाला सहकार्य करणाऱ्या शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी आणि सध्या सुरू असलेला अवैध वाळू उपसा तातडीने थांबविणेसाठी संबंधित यंत्रणेला लगेचच सूचना द्याव्यात अशी मागणी पंकजा मुंडे यांनी पत्रात केली आहे.

जिल्हयात सध्या माफियांचीच सत्ता असल्याचे दिसून येत आहे. अवैध वाळू उपसा विरोधात आंदोलन, उपोषण करणारांना माफियांपासून सुरक्षा व संरक्षण देण्याची गरज आहे. सत्ताधाऱ्यांनी प्रशासनावर दरारा ठेवून जनतेला न्याय देणे अपेक्षित असताना जनतेच्या वाटयाला दहशत आणि हप्तेखोर व चोरांना मात्र मोकळे रान दिले जात आहे. मुख्यमंत्री ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, महसूल मंत्र्यांनी यात लक्ष घालून बीडवरील अन्याय दूर करावा, अशी मागणीही पत्रात करण्यात आली आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख