बीडमधील रेमडेसिव्हीरच्या काळ्याबाजारावर तुम्हीच लक्ष घाला; पंकजा मुंडेंचे अजित पवारांना पत्र

बीड जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तुटवड्यामुळे रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा काळाबाजारही सुरु झाला आहे.
Pankaja Munde Letter to Ajit Pawar News Beed
Pankaja Munde Letter to Ajit Pawar News Beed

बीड : बीड जिल्ह्यात रेमडेसीव्हीर इंजेक्शनचा सर्रास काळाबाजार होत आहे. या इंजेक्शनचा वापर विशिष्ट पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते स्वतःच्या कार्यालयातून करत असल्याचा गंभीर आरोप भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केला आहे. 
आता या प्रकरणात खुद्द अजित पवारांनी लक्ष घालावं, आणि हा प्रकार थांबवावा, अशी मागणीही मुंडे अजित पवार यांना पत्र पाठवून केली आहे. 

रेमडेसीव्हिर इंजेक्शन वाटपाचा गैरवापर कोणीही करू नये. कोणत्याही माणसाने केला तरी तो चुकीचा आहे असे अजित पवार यांनी नुकतेच पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितले होते. हाच मुद्दा घेऊन पंकजा मुंडे यांनी पत्र पाठविले आहे. बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पालकमंत्री आहेत. रेमडेसिवीरच्या माध्यमातून जिल्ह्यात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी, शल्यचिकित्सक यांच्याकडे या समस्यांचे उत्तर नाही.

डॉक्टरांच्या स्वाक्षर्‍या घेऊन रेमडेसिव्हिर देण्यात आल्याचे दाखविण्यात येत असले तरी सदर इंजेक्शन रुग्णांनाच काय डॉक्टरांनाही मिळाले नसल्याचा गंभीर आरोपही पंकजा मुंडे यांनी पत्रात केला आहे. डॉक्टर्सच दहशतीच्या वातावरणात असल्यामुळे ते बोलत नसले तरी हे सत्य असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या.

उपचार ही कुणाची मक्तेदारी नाही..

जिल्हा शल्यचिकीत्सक आणि जिल्हाधिकाऱ्यांवरही दबाव आहे. त्यामुळे तुम्हीच जातीने लक्ष घालावे. कोरोना  काळात जनतेला न्याय देण्याच्या संदर्भात आपण जो स्पष्टवक्तेपणा व्यक्त केला आहे त्यावर आपण पावलं उचलली तर अनेक समस्यांचे निरसन होईल. रेमडेसीवीर इंजेक्शन हे वैयक्तिक कोणाच्या घरातून वाटप होत आहे, विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होत आहे हे चूक आहे. आपण जे बोलता त्याच्या विपरीत बीडमध्ये व्यवहार होत आहे.

आपण यात लक्ष घालावे आणि याबाबतीत संबंधितांची कानउघाडणी नक्कीच करावी. कारण नागरिकांच्या जीवन-मरणाचा हा प्रश्न आहे. कोणतेही औषध, कोणतीही लस, कोणताही उपचार ही कोण्या पक्षाची, वर्गाची मक्तेदारी नाही. त्यामुळे यात सर्वांना समान न्याय मिळेल यासाठी आपण लक्ष द्याल, अशी अपेक्षा असल्याचेही पंकजा मुंडे यांनी पत्रात म्हटले आहे.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com