Suryakanta Patil's phone switched off after posting 'she' last night. | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

साताऱ्यात गुरूवारी मध्यरात्रीपासून सात दिवस कडक लॉकडाउन करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्वकाही बंद राहणार आहे.

रात्री ‘ती‘ पोस्ट केल्यानंतर सुर्यकांता पाटील यांचा फोन स्विच ऑफ..

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 28 मे 2020

कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी शरद पवार यांच्यासह दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी असलेले चांगले संबंध याचा सुर्यकांता पाटील यांना राजकारणात चांगलाच फायदा झाला. दरम्यान, शरद पवार यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली आणि २००४ मध्ये सुर्यकांता पाटील राष्ट्रवादीकडून हिंगोली मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणुक लढल्या आणि विजयी होऊन चौथ्यांदा खासदार झाल्या.

औरंगाबादः माजी खासदार, केंद्रीय राज्यमंत्री आणि नांदेडमधील भाजपच्या नेत्या सुर्यकांता पाटील यांनी काल रात्री उशीरा सोशल मिडियाच्या माध्यामातून आपण राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. निवृत्ती घेण्यामागची भूमिका देखील त्यांनी सविस्तरपणे स्पष्ट केली. गेल्या चाळीस वर्षांपासून राजकारणात सक्रीय असलेल्या चारवेळा खासदार आणि केंद्रात राज्यमंत्री राहिलेल्या पाटील यांच्या या निवृत्तीची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र रात्री ‘ती‘ पोस्ट केल्यापासून सुर्यकांता पाटील यांचा मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. 

कॉंग्रेस पक्षातून १९७१ ला आपल्या राजकीय प्रवासाला सुरूवात केल्यानंतर कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप या तीन पक्षांचा अनुभव गाठीशी असलेल्या माजी खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील यांनी अचनाक राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली.

२०१३ मध्ये नांदेड विधान परिषदेची उमेदवारी राष्ट्रवादीकडून जाहीर झाल्यानंतर ऐनवेळी सुर्यकांता पाटील यांच्या ऐवजी रामराव वडकुते यांना देण्यात आली आणि नाराज झालेल्या पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत २०१४ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. हिंगोलीतून दोनवेळा, नांदेडमधून एकदा आणि राज्यसभा अशी २१ वर्ष खासदारकी आणि केंद्रातील मनमोहनसिंग सरकारमध्ये २००४ ते ०९ पर्यंत सुर्यकांता पाटील राष्ट्रवादीकडून केंद्रीय ग्रामविकास व संसदीय कार्य राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या.

१५ आॅग्स्ट १९४८ मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे जन्म झालेल्या सुर्यकांता पाटील १९७१ मध्ये सर्वप्रथम राजकारणात सक्रीय झाल्या. नांदेड जिल्हा युवक कॉंग्रेसच्या महासचिव, कॉंग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर १९८० मध्ये नांदेड नगर परिषदेत त्या नगरसेवक म्हणून निवडूण आल्या. नगरसेवक असतांनाच पक्षाने त्यांना ८० च्या विधानसभेत हदगांव मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि त्या आमदार झाल्या.

सोबतच त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या  महासचिव पदाची जबाबदारी देखील होती. आमदारकीचा कालवधी संपत नाही तोच, कॉंग्रेसने ८६ ते ९१ दरम्यान, महाराष्ट्रातून त्यांना राज्यसभेवर संधी मिळाली. प्रत्येक संधीचा पुरेपूर लाभ उठवत सुर्यकांता पाटील राजकारणात पुढे वाटचाल करत राहिल्या.

राज्यसभेचा कार्यकाळ संपत नाही तोच कॉंग्रेस पक्षाने त्यांना १९९१ च्या लोकसभा निवडणूकीत पाटील यांना नांदेड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि त्या दुसऱ्यांदा खासदार झाल्या. तो कार्यकाळ संपत नाही की १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसने त्यांना हिंगोली मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि त्यांनी खासदारकीची हॅट्रीक साधली.

कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी शरद पवार यांच्यासह दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी असलेले चांगले संबंध याचा सुर्यकांता पाटील यांना राजकारणात चांगलाच फायदा झाला. दरम्यान, शरद पवार यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली आणि २००४ मध्ये सुर्यकांता पाटील राष्ट्रवादीकडून हिंगोली मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणुक लढल्या आणि विजयी होऊन चौथ्यांदा खासदार झाल्या.

विशेष म्हणजे यावेळी त्यांना केंद्रात राष्ट्रवादीकडून राज्यमंत्रीपदावर संधी देण्यात आली. ग्रामविकास व संसदीय कार्य राज्यमंत्री म्हणून सुर्यकांता पाटील यांनी आपली छाप उठवली. दरम्यान, केंद्र सरकारच्या विविध कमिट्यावर देखील त्या अध्यक्ष आणि सदस्य म्हणून कार्यरत होत्या. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली मतदारसंघातून त्यांचा शिवसेनेचे सुभाष वानखेडे यांनी पराभव केला.

त्यांनतर २०१४ मध्ये त्यांनी पुन्हा हिंगोलीमधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. पण गेल्या निवडणुकीत पराभव झाल्यामुळे आघाडीमध्ये हिंगोलीची जागा कॉंग्रेसला सोडण्यात आली आणि त्या नाराज झाल्या. त्यानंतर २०१३ मध्ये सुर्यकांता पाटील यांना राष्ट्रवादीने विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आणि अचानक ती बदलून धनगर समाचे रामराव वडकुते यांना देण्यात आली. त्यामुळे सुर्यकांता पाटील कमालीच्या अस्वस्थ झाल्या.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी पक्षाकडे हिंगोलीतून उमेदवारी मागतिली होती. पण ही जागा कॉंग्रेसकडे असल्याने त्यांना नकारदेण्यात आला. दरम्यान पक्षाकडून आपल्याला डावलले जात असल्याचा आरोप करत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण २०१४ ते १९ च्या काळात त्या राजकाणात फारशा सक्रीय दिसल्या नाही. भाजपने देखील त्यांच्यावर संघटनात्मक अशी कुठलीही जबाबदारी सोपवली नव्हती. त्यामुळे अखेर त्यांनी सोशल मडियाच्या माध्यमातून आपण राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख