औरंगाबाद ः टीकटाॅक स्टार पुजा चव्हाण हिच्या आत्महत्येवरून राज्यातील राजकीय वातवरण तापलेले आहे. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात असतांनाच आता राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख बलात्कार प्रकरणातील पिडितेने पाच दिवसांत आपल्याला न्याय मिळाला नाही, तर आत्महत्या करेन, अशी जाहीर धमकी दिली आहे. भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांच्याकडे पिडितेने न्यायासाठी धाव घेतली असून त्यांच्या सोबतच्या पत्रकार परिषदेतच पिडितेने आत्महत्येची धमकी दिली.
राज्यातील काही मंत्री, नेत्यांवर महिला अत्याचाराचे आरोप आणि गुन्हे दाखल झाले आहेत. विशेषतः महाविकास आघाडीतील सत्ताधारी राष्ट्रवादी व शिवसेनेच्या मंत्री व राज्यस्तरावरील पदाधिकाऱ्यांवर अशा प्रकारचे आरोप झाले आहेत. धनंजय मुंडे यांचे प्रकरण शांत होत नाही तोच शिवसेनेचे विदर्भातील मोठे नेते व राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे देखील पुण्यातील पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येमुळे अडचणीत आले आहेत. सत्ताधारी पक्ष आपल्याने मंत्र्यांना वाचवत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
यातच आता औरंगाबादेत २६ डिसेंबर २०२० रोजी राष्ट्रवादी काॅंग्रसेचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्यातील पिडितेने थेट आत्महत्या करण्याचीच धमकी दिली आहे. तृप्ती देसाई यांच्या सोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपल्याला न्याय मिळत नाही, माझ्यावर बलात्कार करणारा मेहबूब शेख गुन्हा दाखल असूनही राजेरोसपणे गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत फिरतांना दिसतो आहे.
औरंगाबादेत माझ्या तक्रारीनंतर मेहबूब शेख वर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सुरूवातीला पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घातले, पण आरोपी राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचा प्रदेशाध्यक्ष असल्याचे समजताच पोलिसांची भूमिका बदलली. त्यांनी उलट मला व माझ्या कुटुंबियांना त्रास देण्यास सुरूवात केली. मला न्याय मिळूवन द्यायचा सोडून मी राहात असलेल्या भागात येऊन माझेच चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला. मला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांना देखील पोलिसांनी त्रास दिला.त्यामुुळे आज कुणीही माझ्या मदतीला येत नाही.
मेहबूब शेख व त्याच्या राष्ट्रवादी पक्षाने हे प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांवर देखील दबाव आणला. घडलेला सगळा प्रकार, अत्याचार झाल्याचे पुरावे पोलिसांना देऊन आणि गुन्हा दाखल होऊन देखील मेहबूब शेख गेल्या दीड महिन्यांपासून मोकाट फिरतोय. राष्ट्रवादी पक्ष अशा माणसाला पाठीशी कसा घालू शकतो, त्याला ताबडतोब पक्षातून हाकलून दिले पाहिजे, अशी मागणी देखील पिडितेने केली.
सरकारला किती आत्महत्या हव्यायं..
बलात्कार झालेली पिडिता न्याय मिळवा म्हणून माझ्याकडे आली. या प्रकरणात गुन्हा दाखल असून देखील आरोपीला अटक होत नाही, राष्ट्रवादीचे मंत्री त्याला सोबत घेऊन फिरतात. न्याय मिळत नाही म्हणून पिडिता आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहचली आहे. महिला, मुलींना या राज्यात न्याय मिळणार आहे की नाही? असा सवाल भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
औरंगाबादेत पिडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला असतांना अटकेची कारवाई का होत नाही? धनंजय मुंडे प्रकरणात देखील हेच घडले. जिवंतपणी पिडितांना न्याय मिळणारच नाही का? सरकारला आणखी किती आत्महत्या हव्या आहेत, असे म्हणत मेहबूब शेख प्रकरणातील पिडितेने आत्महत्या केली तर त्याला मेहबूब शेख, राष्ट्रवादी पक्ष व संबंधित पोलिस यंत्रणा जबाबदार असेल, असा इशारा देखील देसाई यांनी यावेळी दिला.
Edited By : Jagdish Pansare

