यशस्वी मुख्यमंत्री अन् सक्षम विरोधी पक्षनेता.. - Successful Chief Minister and Leader of Opposition jp75 | Politics Marathi News - Sarkarnama

यशस्वी मुख्यमंत्री अन् सक्षम विरोधी पक्षनेता..

(इद्रीस मुलतानी, भाजप प्रदेश चिटणीस, चेअरमन सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, सिल्लोड, जि. औरंगाबाद)
गुरुवार, 22 जुलै 2021

भारतीय जनता पक्षाने सुरू केलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय विस्तारक अभियानाच्या माध्यमातून गाव, वाडी स्तरावर बूथ पातळीपर्यंत संघटना मजबूत केली. 

औरंगाबाद ः  नागपूर येथील भाजपचे बुथप्रमुख ते राज्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता अशी राजकीय वाटचाल करत केवळ राज्याच्याच नाही तर राष्ट्रीय राजकारणाच्या पटलावर आपली छाप पाडणारे नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब. (Successful Chief Minister and Leader of Opposition Devendra Fadanvis) राजकारणात समाजातील प्रत्येक घटकासाठी झटणारा, कोरोना सारख्या महामारीत, स्वतःला संसर्ग झाल्यानंतरही एखाद्या योध्याप्रमाणे  लढणारा असा हा  'संघर्ष योद्धा' आज उच्चस्थानी आहे. 

स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू वृत्ती, कुशल नेतृत्व, मुरब्बी राजकारणी आणि आर्थिक धोरणांसह विविध विषयांचा व्यासंग असलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची यशस्वी पाच वर्ष पुर्ण केल्यानंतर आता विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत आहेत. (Leader of Opposition Devendra Fadanvis,Maharashtra) नगरसेवक, सर्वात तरूण महापौर, आमदार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेली कामगिरी ही आश्चर्यचकित करणारी ठरली आहे. फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता म्हणून देखील इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी केली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

मुख्यमंत्री पदाच्या काळात त्यांनी केलेली अनेक विकासाची कामे राज्यातील जनतेसमोर आहेत. जी आश्वासनं त्यांनी मुख्यमंत्री म्हणून दिली होती ती सर्व त्यांनी पूर्ण करून दाखवली, जी कामे राहिली ती पुर्ण करण्याचा विश्वास देत त्यांनी जनतेचा कौल मागितला, जनतेनेही त्यांच्यावर दुसऱ्यांदा विश्वास दाखवला आणि भाजपला भरभरून यश विधानसभा निवडणुकीत दिले. पण स्वार्थी राजकारण्यांच्या खेळी जनतेच्या विकासमार्गात अडथळा ठरल्या आणि त्यांच्यावर विरोधी पक्षनेता म्हणून जबाबदारी आली.

मुख्यमंत्रीपदाच्या पाच वर्षात  'जलयुक्त शिवार अभियान, 'मेट्रो'ला  एका जागतिक स्तरावर नेण्याचे काम करत त्यांनी विकासाला गवसणी घातली.  फडणवीस सरकारने सर्वाधिक आर्थिक मदत केली ती या राज्यातील गोरगरीब,कष्टकरी शेतकऱ्यांना.  दर चार-सहा महिन्याला शासनाकडून  शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळायची. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, कृषी यांत्रिकीकरण, जलयुक्त शिवार अभियान, स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम त्यांनी केले. याची आठवण आजही शेतकरी काढतात. 

पारदर्शकतेनेे खऱ्या शेतकऱ्यांना लाभ..

पारदर्शक कारभार आणि योग्य निकष लावल्यामुळे शेतकऱ्यांचा हक्क हिरावून घेणारे लोखो बोगस शेतकरी देखील या निमित्ताने समोर आले. शेतकरी कर्जमाफीचा लाभ देखील याच पारदर्शकपणामुळे खऱ्या शेतकऱ्यांना झाला. बोंडअळीची नुकसान भरपाई असो की पीक विमा, मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांना याआधी याची कधीच माहिती होत नव्हती.  सरकारी योजनेचे पैसे कधीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत नव्हते, पण फडणवीस यांच्या काळात सरकारने खरीप कृषीपिकांवर विमा आणला आणि त्याचा फायदा मराठवाडा, विदर्भातील लाखो शेतकऱ्यांना झाला.

पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होऊ लागले.  राज्य दुष्काळाने होरपळत होते मराठवाडा वाळवंट होण्याच्या मार्गावर, लातूरमध्ये भीषण पाणीटंचाई, असे चित्र असतांना मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी योग्य पद्धतीने ही परिस्थिती हाताळली. लातूर शहरासह आसपासच्या खेड्यांसाठी तर इतिहासात पहिल्यांदा रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरच न थांबता दुष्कळांवर मात करण्यासाठी मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवार सारख्या योजना नियोजनबध्द पद्धतीत ने अंमलात आणून पाणी प्रश्न मिटवण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला.

राजकारण अन् संघटन कार्यही..

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यापासून प्रश्न, अचडणी आणि विरोधकांचे अडथळे फडणवीसांची पाठ सोडत नव्हते. पण त्यांनी न डगमगता यावर मात करत राज्याला विकासाच्या दिशेने नेले. तीन दशकांची मागणी असलेले मराठा आरक्षण फडणवीस यांनीच दिले, पण आताच्या सरकारला ते टिकवता आले नाही. मुंबईतील रस्ते,मेट्रोचे जाळे निर्माण करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने प्रयत्न केला अनेक अडथळे दूर करून मेट्रोची कामे सुरू झाली. दुर्दैवाने फडणवीस सरकार गेले आणि  मुंबई मेट्रोच्या कामात खो घातला गेला.

सत्ता आली की, संघटना कमकुवत होते, असे म्हणतात. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद, चौफेर विषयात अभ्यासूतज्ज्ञ ,प्रामाणिक लोकसेवक अशा भूमिका पार पाडतानाच भारतीय जनता पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले. भारतीय जनता पक्षाने सुरू केलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय विस्तारक अभियानाच्या माध्यमातून गाव, वाडी स्तरावर बूथ पातळीपर्यंत संघटना मजबूत केली. 

त्यामुळेच आयुष्यात एकदाही भेट न झालेले हजारो पक्ष कार्यकर्ते फडणवीस यांना आदर्श मानुन भाजपाचे काम करत आहेत. स्वतःच्या क्षेत्रात इतकं सूक्ष्म, अभ्यासू व प्रामाणिक राहून झोकून देऊन काम करा, की त्या क्षेत्रातील मान्यवरातल्या मान्यवर व्यक्तीच्या तोंडात, डोक्यात अन मनात तुमचे नाव कोरले गेले पाहिजे, असे फडणवीस नेहमी सांगतात.

भल्याभल्यांना धडकी..

राज्यातील सत्तांतरानंतर फडणवीस यांच्यावर विरोधी पक्षनेते पदाची जबादारी आली. ती देखील ते नेटाने आणि उत्तम प्रकारे सांभाळत आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील भ्रष्ट कारभाराचे पुराव्यानिशी सभागृहात वाभाडे काढल्यामुळे सरकारमधील काही मंत्र्यांना घरी जावे लागले. तर काही जाण्याच्या तयारीत आहेत. राज्यातील असे क्षेत्र, विभाग नाही जो विषय त्यांनी हाती घेतला नाही. शेतकरी, कामगार, मजुर, कष्टकरी, विद्यार्थी, औद्योगिक, शिक्षण, अशा सगळ्याच विषयातील समस्या, प्रश्न सोडवण्यासाठी ते पोटतिडकीने सरकारशी भांडतात.

महाराष्ट्रातील जनतेला फडणवीस यांच्या रूपाने एक सक्षम विरोधी पक्षनेता देखील मिळाल्याची त्यांची कामगिरी पाहून स्पष्ट होते. राज्य पातळीवर काम करत असतांनाच केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारची धेय्य, धोरणं राज्याच्या गावागावात पोहचवण्याची जबाबदारी देखील त्यांनी आपल्या समर्थ खांद्यावर घेतली आहे. 

हे ही वाचा ः फडणवीसांच्या जलयुक्तच्या बचावासाठी शेलार सरसावले..

शब्दांकन ः जगदीश पानसरे

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख