कोरोना रोखण्यात यश, बाधितांची संख्या घटली; बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले.. - Success in preventing corona, reduced number of victims; The rate of recovery also increased. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

कोरोना रोखण्यात यश, बाधितांची संख्या घटली; बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढले..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 3 मे 2021

ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे काम सीएसआर मधून चालू  करण्यात आले असून या प्रकल्पातून एकूण ११ केएल इतक्या ऑक्सीजन सिलेंडरची निर्मिती होणार.

औरंगाबाद : जिल्ह्यातील काही दिवसांपासून वाढत असलेली कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यात सर्वांच्या प्रयत्नांना यश आले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. यापुढेही कोविड- १९ प्रतिबंधक कामातील सर्व अधिकाऱ्यांनी अतिशय दक्ष राहून काम करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांच्या लोकप्रतिनिधीं सोबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून कोरोना बाधितांची संख्या देखील नियंत्रणात आणण्यात आली आहे. यात प्रशासनासह सर्व नागरिकांचा, लोकप्रतिनिधींचा मोलाटा वाटा आहे. यापुढील काळातही अशीच शिस्त कायम ठेवल्यास नक्कीच कोरोनासारख्या गंभीर परिस्थितीशी आपण सामना करु शकू.

जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ऑक्सीजन साठा उपलब्ध आहे. तो सुरळीत ठेवण्याच्या दृष्टीने खाजगी रुग्णालयांनी स्वत:चे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरु केले आहेत तसेच घाटी, जिल्हा रुग्णालय, मेल्ट्रॉन या ठिकाणी ऑक्सीजन साठा वाढविण्यात येत असून ऑक्सीजन उपलब्धता सक्षम ठेवण्याच्या दृष्टीने गंगापूर, वैजापूर, कन्नड, सोयगाव, पैठण आदी ग्रामीण भागात ही ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. 

या प्रकल्पासाठी ६ कोटी ६० लाख इतक्या निधीला मान्यता देखील मिळाली आहे. ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे काम सीएसआर मधून चालू  करण्यात आले असून या प्रकल्पातून एकूण ११ केएल इतक्या ऑक्सीजन सिलेंडरची निर्मिती होणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

दररोज पाच हजार चाचण्या

मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी शहरातील कोरोना परिस्थितीची माहिती देतांना रोज पाच हजार जणांच्या टेस्टींग होत असल्याचे सांगितले. शिवाय कॉन्टेक्ट ट्रेसींग देखील नियमित केले जात आहे. भविष्यातील तिसऱ्या लाटेकरीता प्रशासन तयारीत असून त्याचाच एक भाग म्हणून मनपा डॉक्टरांना आयसीयु मध्ये वापरात येणाऱ्या विविध यंत्राचा वापर कसा करावा याकरिता घाटीमध्ये प्रशिक्षणाकरीता पाठवण्याचे नियोजन असल्याचे पांड्येय म्हणाले. 

बैठकीस खासदार डॉ. भागवत कराड, इम्तियाज जलील, जिल्हा परिषद अध्यक्षा मिना शेळके, आमदार अंबादास दानवे, संजय शिरसाट, अतुल सावे, उदयसिंह राजपूत, हरीभाऊ बागडे यांच्यासह महानगर पालिक आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, घाटीच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, मनपा आरोगय अधिकारी डॉ. नीता पाडळकर आदी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख