सत्तारांच्या आदेशांचा अभ्यास करून निर्णय घेत जा, दानवेंचा जिल्हाधिकाऱ्यांना सल्ला - Study the orders of the Minister Sattar and make a decision | Politics Marathi News - Sarkarnama

सत्तारांच्या आदेशांचा अभ्यास करून निर्णय घेत जा, दानवेंचा जिल्हाधिकाऱ्यांना सल्ला

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 एप्रिल 2021

सत्तार यांना असे फर्मान काढण्याची आणि प्रशासनाला आदेश देण्याची सवयच आहे. ते असे आदेश नेहमीच देत असतात.

औरंगाबाद ः शिवसनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ब्रेक द चेन च्या पार्श्वभूमीवरील बैठकीत सहभाग घेतला. तेव्हा कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांना दंड आकारा, कुणालाही सोडू नका असे फर्मान काढले. यावर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना एक सल्ला दिल्ला आहे. अब्दुल सत्तार असे फर्मान अनेकदा देत असतात, तेव्हा त्यांच्या आदेशांचा अभ्यास करूनच निर्णय घेत चला, असे दानवे यांनी म्हटले आहे. दानवेच्यां या सल्ल्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

औरंगाबाद-जालना जिल्ह्यातील राजकारणात वरवर एकमेकांचे शत्रू असल्याचे भासवणारे शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे तसे पाहिले तर पडद्यामगाचे मित्रच. निवडणुका आल्या की हे दोन्ही नेते एकमेकांवर तुटून पडतात, आरोप-प्रत्यारोप करतात, पण विधानसभा, लोकसभेला मात्र छुपी मदत करून आपला स्वार्थ साधतात हे अनेक निवडणुकांमध्ये दिसून आले आहे.

रावसाहेब दानवे यांना पराभूत केल्याशिवाय डोक्यावरची टोपी काढणार नाही, टोपीचा मुक्काम वाढला असे अनेक विधान सत्तार यांच्याकडून वारंवार केली जातात. तर दानवे सत्तार यांच्यावर कधीतरीच टीका करतातपण योगायोगाने जर हे दोघे एका व्यासपाठीवर आले, तर मग मात्र आम्ही कसे एकमेकांचे मित्र आहोत हे सांगण्यासाठी त्यांच्यात स्पर्धाच लागते. दानवे यांनी नुकतेच जालना येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना सत्तार यांच्या संदर्भात एक विधान केले आहे.

सत्तार हे कसे लहरी आहेत, आणि या लहरीपणात ते अनेकदा चुकीचे फर्मान, आदेश प्रशासनाला देत असतात असेच दानवे यांचा सुचवायचे होते. दानवे म्हणाले, सत्तार यांनी औरंगाबाद येथे कोरोना संदर्भातील बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांना नियम न पाळणाऱ्या सगळ्यांवर कठोर कारवाई करा, दंड वसुल करा, कुणाचाही मुलाहिजा बाळगू नका असे, फर्मान सोडले होते.

परंतु जे लोक कारण नसतांना घराबाहेर पडले त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, पण कुणी घरातील आजारी व्यक्तीला औषध आणण्यासाठी जात असेल, कुणी तातडीचे काम म्हणून, किराणा आणायला जात असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे चुकीचे ठरेल. सत्तार यांना असे फर्मान काढण्याची आणि प्रशासनाला आदेश देण्याची सवयच आहे. ते असे आदेश नेहमीच देत असतात. पण औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सत्तार यांच्या आदेशाचा अभ्यास करून मगच योग्य तो निर्णय घ्यावा, असा सल्ला दिला आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख