Congress Leader Nana Patole- Bjp Leader Sudhir Mungantiwar- Mumbai News
Congress Leader Nana Patole- Bjp Leader Sudhir Mungantiwar- Mumbai News

वृक्ष लागवडीची चौकशी निघताच मुनगंटीवारांकडून राष्ट्रपती राजवटीची मागणी

राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून विरोधीपक्ष सरकारवर टीका करत आहे. पण कुणाच्याही सरकारच्या काळातील परिस्थिती असो, ती सुधारण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्रित काम केले पाहिजे.

मुंबई : माझे मित्र सुधीर मुनगंटीवार यांनी अचानक राष्ट्रपती राजवटीची मागणी केली, ही मागणी अचनाक आली कुठून याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. तेव्हा असे लक्षात आले की मुनगंटीवार मंत्री असतांना त्यांच्या काळात झालेल्या वृक्ष लागवडीची चौकशी लागताच त्यांच्याकडून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी सुरू झाली, असा टोला काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात लगावला.

सभागृहातील २९३ अन्वयेच्या चर्चेवर बोलतांना नाना पटोले यांनी कायदा व सुव्यवस्थेवरून विरोधकांकडून उपस्थित केल्या गेलेल्या अनेक मुद्यावर भाष्य केले. एवढेच नाही तर फडणवीस सरकारच्या काळातील मेगाभरती आॅनलाईन घोटाळा, भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपींना राष्ट्रभक्त ठरवण्यात आल्याचा उल्लेख, तसेच भाजपचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली, या प्रकरणात कोण आहेत याची चौकशी करण्याची मागणी केली.

नाना पटोले म्हणाले, राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून विरोधीपक्ष सरकारवर टीका करत आहे. पण कुणाच्याही सरकारच्या काळातील परिस्थिती असो, ती सुधारण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्रित काम केले पाहिजे. राज्यात जेव्हा भाजपची सत्ता होती, तेव्हा कामगार कल्याण मंडळाचा अध्यक्ष असलेल्या मुन्ना यादववर अनेक गुन्हे दाखल असतांना तो पोलिसांच्या तावडीत सापडला नाही.

वीस-वीस दिवस त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात नव्हते, तेव्हा कुणाचा दबाव होता. नागपूरमध्ये तोतवाणी, यादव कुणाच्या आशिर्वादाने गुन्हे करतायेत, असा सवाल करत गुन्ह्याला जात-पात पक्ष नसतो. तेव्हा याबद्दलची माहिती देखील गृहमंत्र्यांनी सभागृहात द्यावी, अशी मागणी पटोले यांनी केली. मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर जिलेटीनने भरलेली गाडी सापडली. हे प्रकरण खूप गंभीर आहे, अंबानी मोठी व्यक्ती आहे, त्यांच्या सुरक्षेची संपुर्ण काळजी घेतली गेलीच पाहिजे.

मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत असतांना विरोधी पक्षनेत्यांनी तपास एनआयएकडे देण्याची मागणी केली. खरतर ही मागणी करण्याची गरज नव्हती. एनआयएए ही केंद्राची तपासणी यंत्रणा आहे, त्यांना हा तपास स्वःताकडे घेण्याचा अधिकार आहे. पण भीमा कोरेगावच्या घटनेचा तपास करण्यासाठी राज्यातील सत्तांतरानंतर जेव्हा शरद पवारांनी एसआयटी स्थापन केली, तर मग हा तपास एनआयएने आपल्याकडे का घेतला हे देखील कळाले पाहिजे, असा चिमटा पटोले यांनी काढला.

सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून राष्ट्रपती राजवटीची अचनाक केली गेलेली मागणी यावरून देखील पटोले यांनी भाजपला टोला लगावला. मध्यप्रदेशात व्यापम घोटाळा झाला तेव्हा यातील अनेक लोक जिवंत देखील राहिले नाहीत. महाराष्ट्रात देखील मागील काळात व्यापम पेक्षा मोठा घोटाळा मेगाभरतीच्या माध्यमातून झाला. मेरिटच्या विद्यार्थ्यांना डावलून पैसे घेऊन अनेकांची भरती करण्यात आल्याचा आरोप पटोले यांनी केला.

चीनचा पुळका कशासाठी?

मुंबई एकदिवस काळोखात बुडाली तेव्हा चीनने सायबर हॅटक करून आपली यंत्रना हॅक केली होती, असे बोलले जाते. गृहमंत्र्यांनी देखील या संदर्भात सभागृहात निवेदन केले. त्यानंतर लगेच केंद्राने याचे खंडण करून हा सायबर अटॅक नव्हता असे स्पष्ट केले. चीनमुळे भारतात आणि जगात कोरोना आला हे कुणी नाकारू शकते का? पण चीनने सायबर अटॅक केला असे म्हणताच केंद्राकडून स्पष्टीकरण दिले जाते. विरोधकांना चीनचा एवढा पुळका का? त्यांची बाजू घेण्याची काय गरज? असा सवाल देखील पटोले यांनी उपस्थित केला.

सातवेळा खासदार राहिलेले मोहन डेलकर महाराष्ट्रात, मुंबईत येऊन आत्महत्या करतात, त्यांच्या पंधरा पानी सुसाईड नोटमध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. असे असतांना अद्याप या प्रकरणात गुन्हे दाखल का करण्यात आले नाहीत? अशी विचारणा देखील पटोले यांनी केली. डेलकर यांना कसा त्रास झाला याची सगळी माहिती त्यांनी आपल्या नोटमध्ये दिली आहे.

देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री यांना भेटून आपल्यावरील अत्याचाराची माहिती डेलकरांनी दिली होती. पण त्यांना न्याय मिळाला नाही. महाराष्ट्र सरकारकडून न्याय मिळेल या अपेक्षेनेच त्यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली. आता त्यांनी लिहलेली सुसाईड नोट देखील जाहीर करा, अशी मागणी पटोले यांनी सभागृहात केली.

Edited  By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com