Soaking in the rain brings success, I got wet too .. | Sarkarnama

पावसांत भिजल्याने यश मिळते, मी ही भिजलो..

जगदीश पानसरे
शुक्रवार, 31 जुलै 2020

पावसांत भिजल्यावर यश मिळतं असे संकेत आहे, म्हणून मी भाषण न थांबवता तुमच्या समोर उभा आहे. भविष्यात आम्हालाही यश मिळेल, अशी अपेक्षा आहे. दानवे यांच्या या विधानावर उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

औरंगाबाद ः पावसांत भिजल्याने राजकारणांत यश मिळतं म्हणतात, आज माझ्या भाषणाच्या वेळीही पाऊस आला. म्हणून मी भाषण न थांबवता बोलतो आहे, आता नाही पण भविष्यात संधी मिळेल अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही, अशा शब्दांत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना त्यांचे नाव न घेता चिमटा काढला. औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण आज दानवे यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या वेळी भर पावसात केलेले भाषण ऐतिहासिक ठरले होते. त्यांच्या भाषणाने साताऱ्यातील नव्हे तर संपुर्ण राज्यातील वातावरण बदलले आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला सातारा लोकसभेसह विधानसभा निवडणुकीत यश मिळाले.

आजही सोशल मिडियावर भर पावसात भाषण करतांनाचे पवारांचे फोटो आणि व्हिडिओ तुफान चालतात. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ‘पावसांत भिजण्याचा आमचा अनुभव कमी पडला‘ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर आता दानवेंनी देखील या संदर्भात वक्तव्य केले.

रावसाहेब दानवे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करून भाषणाला उभे राहिले आणि जोरादार पावासाला सुरूवात झाली. यावेळी भाषणाच्या सुरूवातीलाच त्यांनी शरद पवारांच्या त्या पावसात भिजलेल्या भाषणाचा मिश्किलपणे उल्लेख केला.

दानवे म्हणाले, पावसांत भिजल्यावर यश मिळतं असे संकेत आहे, म्हणून मी भाषण न थांबवता तुमच्या समोर उभा आहे. भविष्यात आम्हालाही यश मिळेल, अशी अपेक्षा आहे. दानवे यांच्या या विधानावर उपस्थितांनी भरभरून दाद दिली. महापुरुषांचे पुतळे उभारण्या मागे त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी हा हेतू असतो. संसदेच्या आवारात देखील देशातील सगळ्या महापुरुषांचे पुतळे उभारण्यात आले आहेत. जेणेकरून या महापुरुषांचा आदर डोळ्यासमोर ठेवून आपण जनतेच्या हिताचे काम करू शकू.

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उभारण्यात आलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील इथे येणाऱ्या प्रत्येकाला प्रेरणा देईल, यात शंका नाही. भविष्यात या कृषी उत्पन्न बाजार समितीला अधिक महत्व येणार आहे.

कारण आपल्याकडे जालन्याला आता ड्रायपोर्ट झाला आहे, समृध्दी महामार्ग, डीएमआयसी झाली आहे. त्यामुळे केवळ जिल्हा, मराठवाडाच नाही, तर खान्देश, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातून देखील शेतकरी आपला शेतीमाल घेऊन इथे येतील. त्या प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याकडून नश्चितच प्रेरणा मिळेल, असा विश्वास देखील रावासाहेब दानवे यांनी यावेळी व्यक्त केला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख