म्हणून झाला कॉंग्रेसच्या राजेश राठोडांना उमेदवारी अर्ज भरायला उशीर...

विधान परिषदेतील कॉंग्रेसच्या एका जागेसाठी राज्यभरातून १६७ इच्छुकांनी आपली नावे दिली होती. जालन्यातून राजेश राठोड आणि सत्संग मुंडे यांनीही पक्षाकडे इच्छा व्यक्त केली होती. कदाचित स्पर्धा मोठी असल्यामुळे संधी मिळेल की नाही? असे वाटत असतांना प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी फोनवरून उमेदवारी मिळाल्याचे सांगितले.
rajesh ratohd congress news
rajesh ratohd congress news

औरंगाबादः बाळासाहेब थोरात यांनी राजेश राठोड यांना फोन करून विधान परिषदेची उमेदवारी तुम्हाला देण्यात आली आहे, कागदपत्रे तयार करा असा निरोप दिला. कोरोना संकटामुळे सुरू असलेला लॉकडाऊन आणि मुलीच्या शैक्षणिक कामासाठी मी स्वतः पुण्यात असल्यामुळे कागपत्रे जमा करण्यापासून ते उमेदवारी अर्ज दाखल करण्यापर्यंत बरीच धावपळ करावी लागली. आणि म्हणून माझा उमेदवारी अर्ज दुपारी भरला गेल्याचे कॉंग्रेस उमेदवार राजेश राठोड यांनी `सरकारनामा`शी बोलतांना सांगितले.

विधान परिषदेतील माजी आमदार धाेंडीराम राठोड यांचे पुत्र व प्रदेश काॅंग्रेस समितीचे सदस्य असलेले राजेश राठोड यांचे विधान परिषदेसाठी कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून शनिवारी नाव जाहीर झाले. कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे पत्र प्राप्त होताच प्रसार माध्यमांवर राठोड यांची उमेदवारी जाहीर झाली. विशेष म्हणजे राठोड यांना उमेदवारी मिळाल्याचा तोपर्यंत जालना जिल्ह्यातील काॅंग्रेस पदाधिकाऱ्यांना थांगपत्ता देखील नव्हता.

विधान परिषदेतील कॉंग्रेसच्या एका जागेसाठी राज्यभरातून १६७ इच्छुकांनी आपली नावे दिली होती. जालन्यातून राजेश राठोड आणि सत्संग मुंडे यांनीही पक्षाकडे इच्छा व्यक्त केली होती. कदाचित स्पर्धा मोठी असल्यामुळे संधी मिळेल की नाही? असे वाटत असतांना प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी फोनवरून उमेदवारी मिळाल्याचे सांगितले. उमेदवारीची घोषणा ते उमेदवारी दाखल करण्याचा प्रवास अत्यंत धावपळीचा ठरला.

या संदर्भात `सरकारनामा` शी बोलतांना राजेश राठोड म्हणाले, मी पुण्यात मुलीच्या शैक्षणिक कामासाठी आलेलो होतो. शनिवारी सायंकाळी मला बाळासाहेब थोरात यांनी उमेदवारी जाहीर झाल्याचे सांगत कागदपत्रे गोळा करून मुंबईला सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येण्याचा  निरोप दिला. क्षणभर मला उमेदवारी मिळाली यावर विश्वासच बसला नाही, पण मग वेळ कमी, आणि मी स्वतः पुण्यात असल्यामुळे वेळेत उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची कागदपत्रे मंठा तालुक्यातून मिळवणे गरजेचे होते.

मी तातडीने मंठा येथे फोन करून आमच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सर्वात आधी पोलिसांची परवानगी, परवाना घेण्यास सांगतिले. परवाना मिळेपर्यंत कुणीही बाहेर पडू नका असे सांगितले. पोलिस अधिकाऱ्यांना फोन करून सहकार्य करण्याची विनंती केल्यानंतर रविवारी दिवसभर कागदपत्रांची जमवाजमव केली. ती घेऊन ज्यांना पोलिसांनी लॉकडाऊनमध्ये प्रवास करण्याचा परवाना दिला आहे, त्या मोजक्या पदाधिकाऱ्यांनी पुणे गाठले. पुण्यातूनच आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरला.

 त्यांनतर सोबत जोडावे लागणारे शपथपत्र याचा कच्चा मसुदा पुण्यातच तयार करून घेतला. रात्रभर कागदपत्रांची फाईल आणि शपथपत्राचा मसुदा तयार करण्याचे काम सुरू होते. त्यानंतर सकाळीच पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी निघालो. साधारणतः दहाच्या सुमारास मुंबईत पोहचलो. लॉकडाऊनमुळे  शपथपत्र व इतर कागदपत्रे तयार करण्याठी कार्यालय सुरू होण्याची प्रतिक्षा करावी लागली. अखेर दुपारी साडेबारा- एकच्या सुमारास सगळी कागदपतत्रे तयार करून ती तपासून घेतली. आणि दीडच्या सुमारास उमेदवारी अर्जासह सादर केली.

पक्षाने मला व समाजाला न्याय दिला..

कॉंग्रेस पक्षात एकनिष्ठतेचे फळ मिळतेच हे पुन्हा एकदा दिसून आले. मी पक्षात प्रदेश समिती, युवक कॉंग्रेसमध्ये गेली अनेक वर्ष काम करत होतो. विधानसभा निवडणुकीत परतूर मतदारसंघातून उमेदवारी मागितली होती, पण काही कारणास्तव तेव्हा मला संधी मिळाली नाही. पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, नेते राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, खासदार राजीव सातव यांनी मला, पर्यायाने बंजारा समाजाला न्याय दिल्याची भावना या निमित्ताने राज्यातील समस्त समाज बांधवामध्ये असल्याचेही राजेश राठोड यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com