परभणीवर आभाळ फाटले; हजारो हेक्टरवरील पिकं पाण्यात...

जिल्ह्यात सर्वाधिक पेरा हा सोयाबीन व त्यानंतर कपाशीचा आहे. नेमके हेच नगदी पिक पावसाच्या माऱ्याने वाहून गेल्याने शेतकऱ्यांसमोर परत आर्थिक संकट उभे राहिले आहे.
Parbhani Heavy Rain News
Parbhani Heavy Rain News

परभणी :  गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात तीन वेळा अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके हातची गेल्याच्या संकटाबरोबरच शेतकऱ्यांचे पशुधन दगावल्याचे दुःखही सहन करावे लागत आहे. (The sky fell on Parbhani; Thousands of hectares of crops were damaged and animals were also slaughtered.) मराठवाड्याच्या मध्यभागी असलेल्या परभणी जिल्ह्यावर अक्षरशः आभाळ कोसळले आहे.

विकासापासून कोसोदुर असलेल्या या जिल्ह्यातील रहिवाशांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन शेतीच आहे. परंतू या व्यवसायात सातत्याने संकटांचा सामना करावा लागत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. ( Heavy Rain In Parbhani District) जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने सर्वांची झोप उडाली आहे.  ११ ते १३ जुलै असे सलग तीन दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. ११ जुलै रोजी तर ढगफुटीचा अनुभव परभणीकरांनी घेतला.

खरेतर हा पाऊस परभणी व पालम तालुक्यातील पिकांचे नुकसान करणारा ठरला आहे. त्यानंतर कमी अधिक स्वरुपात पाऊस सुरुच राहीला. २१ जुलै रोजी जिल्ह्यात सर्वदुर झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. बुधवारी (ता.२१) झालेल्या पावसाने जिल्हयातून वाहणाऱ्या दुधना व गोदावरी नदीला मोठा पुर आलेला आहे.

त्यात निम्न दुधना प्रकल्पाचे १२ दरवाजे उघडून दुधना नदीत पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला. त्यामुळे दुधना नदीला आलेल्या पुराचे पाणी अनेक घरात शिरले. त्यात जिल्ह्यातील ९०० घरांचे मोठे नुकसान झाले आहे. नऊ घराची अंशंत: पडझड झाली आहे.

३४ हजार  हेक्टरवरील पिके गेली..

शेतीचे मोठे नुकसान पावसामुळे झाले आहे.  ३३ हजार ९२७ हेक्टर शेतजमीनीवरील पिकांचे नुकसान झाले असून ती उध्दवस्त झाली आहेत.  जिल्ह्यात सर्वाधिक पेरा हा सोयाबीन व त्यानंतर कपाशीचा आहे. नेमके हेच नगदी पिक पावसाच्या माऱ्याने वाहून गेल्याने शेतकऱ्यांसमोर परत आर्थिक संकट उभे राहिले आहे.  यात ३३ हजार २३७ हेक्टरवरील जिरायती, ६०० हेक्टरवरील बागायती व ९० हेक्टरवरील फळ पिकांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात आली.

जिंतूर तालुक्यात कोरवाडी येथील शेततळे फुटून कोरवाडी गावातील ५० टक्के शेतीवर पाणी फिरले आहे. सेलू तालुक्यातील भोसी येथील बंधारा फुटल्याने १०० हेक्टरपेक्षा जास्त पिके पाण्याखाली गेली आहेत. शेती प्रमाणेच जिल्हयात पावसाचा फटका पशुधनालाही बसला आहे. जिल्हयात गुरुवार (ता.२२) पर्यंत पावसाने ३१३ पशुधन दगावल्याची नोंद प्रशासकीय स्तरावर झालेली आहे. बुधवारी झालेल्या अतिवृष्टीचा जिल्ह्यातील २४२ गावांना फटका बसला आहे.

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com