जलसंपदा मंत्र्यांच्या एकाच भेटीत सत्तारांनी सिंचनाचे अनेक प्रकल्प लावले मार्गी - In a single visit of the Water Resources Minister, set up several irrigation projects | Politics Marathi News - Sarkarnama

जलसंपदा मंत्र्यांच्या एकाच भेटीत सत्तारांनी सिंचनाचे अनेक प्रकल्प लावले मार्गी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 6 मे 2021

भराडी प्रकल्पामुळे सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळणार असून सिंचन क्षेत्रातही वाढ होणार.

सिल्लोड : सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदार संघातील पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करीत आहेत. ( State Minister Abdul Sattar Meet Jayint Patil For Water Projects) त्यांच्या या  प्रयत्नांना आज यश आले असून भराडी प्रकल्पाच्या सर्वेक्षणास, गोदावरी खोऱ्यातील पाणी पुनर्नियोजनास आणि तोंडापूर मध्यम प्रकल्पातील पाणी आरक्षणास जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी  मंजुरी दिली आहे.

सत्तार यांच्या मतदारसंघातील बराचसा भाग हा दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. या भागातील पाण्याचे दुर्भिक्ष कायमचे मिटवण्याच्या दृष्टीने या प्रकल्पांना मिळालेली मंजुरी महत्वाची समजली जात आहे.

भराडी प्रकल्पात उपलब्ध असणारे ६.७९५ दलघमी पाणी पूर्णा नदीत वळवून त्यात ठराविक अंतरांवर पाच ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यास मान्यता मिळाली आहे. (Bhradi Water Project Servey Saction Now) ८ मार्च २०१८ रोजी नियामक मंडळाच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आल्याची बाब राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जलसंपदा मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

भराडी प्रकल्पामुळे सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ मिळणार असून सिंचन क्षेत्रातही वाढ होणार असल्याचे राज्यमंत्री सत्तार यांनी या भेटीत सांगितले. त्यानंतर पाटील यांनी या प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी मंजुरी दिली.

गोदावरी उपखोऱ्यातूनही पाणी मिळणार 

पाणी लवादाने मंजूर केलेल्या गोदावरी खोऱ्यातील १०२ टीएमसी पाण्यापैकी ७३ टीएमसी पाण्याचा संचय विविध प्रकल्पाच्या माध्यमातून उपखोऱ्यात झालेला आहे. शासनामार्फत नदीजोड प्रकल्पाद्वारे समन्यायी पद्धतीने पुनर्नियोजन करून पाणी वाटप बाबत कार्यवाही सुरू आहे.

पूर्णा उपखोऱ्यातील सिद्धेश्वर धरणात अंदाजे ५.६ टीएमसी पाण्याचे नियोजन केल्यास त्याचा सिल्लोड सोयगाव मतदार संघात मोठ्या प्रमाणात लाभ होईल असेही अब्दुल सत्तार यांनी पाटील यांच्या लक्षात आणून दिले. ( More Benifit For people And Farmer in This Area) तसेच सिद्धेश्वर धरणाच्या वरच्या बाजूला अंदाजे ८.५ टीएमसी पाणी नियोजन आधारे गोदावरी खोऱ्यात उपलब्ध होऊ शकते.या मागणीला देखील जलसंपदा मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पाणी पुनर्नियोजनाचे आदेश संचालकांना दिले.

या शिवाय तोंडापूर मध्यम प्रकल्पातून अजिंठा लेणी पाणी पुरवठा योजनेसाठी ०.८५५ दलघमी पाणी साठा आरक्षित आहे. मात्र या पाणीसाठ्याचा पूर्ण वापर होत नाही. त्यामुळे अजिंठा लेणी पाणीपुरवठा योजनेचे पाणी आरक्षण कमी करून उर्वरित पाणी साठ्या पैकी ०. ४८ दलघमी  इतका पाणीसाठा फर्दापूर पाणी पुरवठा योजनेसाठी आरक्षित करण्याच्या मागणीचा प्रस्ताव देखील सत्तार यांनी यावेळी दिला. तो देखील तातडीने मंजूर करण्याचे आदेश पाटील यांनी दिले.

ही बातमी देखील वाचा ः भुजबळ, पाडवी, सत्तार, गुलाबराव हे कमकुवत मंत्री

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख