शिवसेना उपजिल्हाप्रमुखाला शिवसैनिकांकडूनच मारहाण झाल्याचे उघड
Jagtap Beed sena

शिवसेना उपजिल्हाप्रमुखाला शिवसैनिकांकडूनच मारहाण झाल्याचे उघड

तपासाला वेगळे वळण..

बीड : शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख हनुमंत जगताप यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याला वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांसह इतरांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कलमाखाली गुन्हा नोंद झाला होता. मात्र, हल्ला करणारे शिवसेनेचेच असल्याचे समोर आले आहे. दोघांना पिंपळनेर पोलिसांनी अटकही केली आहे.

सरत्या आठवड्यात शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख हनुमंत जगताप यांच्यावर प्राणघातक हल्ला करत त्यांना पुलावरून खाली फेकून देण्याचा प्रकार घडला. रुग्णालयात उपचार घेणाऱ्या श्री. जगताप यांच्या जबाबावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावर गुन्हा नोंद केला होता. मात्र, शिवसेनेच्याच कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुखावर हल्ला केल्याचे आता समोर आले आहे.

श्री.जगताप यांचे बंधू व दोन पुतणे यांच्यावर नुकतीच हद्दपारीची कारवाई झाली. तर, मंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीतील बीडमध्ये बैठकीत हनुमंत जगताप यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचत पक्ष मागे राहत नसल्याची खंत व्यक्त केली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना जिल्हाप्रमुखावर आरोप केला होता. यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे ता. ३० ऑगस्टला त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला.

यानंतर परस्परविरोधी तक्रारीवरून चौदा जणांवर पिंपळनेर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. जगताप यांच्या फिर्यादीवरून राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष नंदु अंकुश कुटेसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. पिंपळनेर ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक बाळासाहेब आघाव, उपनिरीक्षक ज्ञानदेव सानप यांनी तपास करत शुक्रवारी (ता. तीन) दत्ता जाधव व ईश्वर देवकर (रा. दोघेही पेठ बीड) यांना ताब्यात घेतले. पोलिस खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अटक केलेले दोघेही शिवसेनेचे समर्थक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता हल्ला प्रकरण वेगळ्या वळणावर गेले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in