गरिबांची भूक भागवणे, जनतेचा जीव वाचवणे हीच शिवरायांची शिकवण - Shivaraya's teaching is to satisfy the hunger of the poor, to save the lives of the people | Politics Marathi News - Sarkarnama

गरिबांची भूक भागवणे, जनतेचा जीव वाचवणे हीच शिवरायांची शिकवण

सरकारनामा ब्युरो
रविवार, 2 मे 2021

रेमडीसीविर वितरण प्रक्रिया सुस्पष्ट करण्यासह योग्य गरजूंना ऑक्सिजन पुरवठा व आवश्यकतेनुसारच व्हेंटिलेटरचा वापर व्हावा याबाबतचे नियंत्रण आता जिल्हा परिषदेचे सीईओ स्वतः करतील.

बीड ः कोरोना सारख्या संकटात गरिबांची भूक भागवणे, जनतेचे प्राण वाचवणे, त्यासाठी जीव ओतून काम करणे हीच आम्हाला छत्रपती शिवरायांची शिकवण आहे. ती आत्मसात करण्याची गरज असल्याचे मत राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले आहे. अशा संकटाच्या काळाता आपला पुर्ण अनुभव पणाला लावून काम करण्याची गरज असल्याचे आवाहन देखील मुंडे यांनी केले. महाराष्ट्र दिना निमित्त ध्वजारोहण समारंभ आणि तत्पुर्वी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

मुंडे म्हणाले. जनतेचे जीव वाचवणे व गरिबांची भूक भागवणे यासाठी जीव ओतून काम केले पाहिजे, आम्हाला ही छत्रपती शिवरायांची शिकवण आज आत्मसात करायची गरज आहे. या परिस्थितीत आपला पूर्ण अनुभव पणाला लावण्याची आज गरज आहे.
जिल्ह्यात एकूण ऍक्टिव्ह रुग्ण, उपलब्ध बेड ही सर्व माहिती डिजिटल पद्धतीने दररोज अद्ययावत करण्यात येईल.

रेमडीसीविर वितरण प्रक्रिया सुस्पष्ट करण्यासह योग्य गरजूंना ऑक्सिजन पुरवठा व आवश्यकतेनुसारच व्हेंटिलेटरचा वापर व्हावा याबाबतचे नियंत्रण आता जिल्हा परिषदेचे सीईओ स्वतः करतील. जिल्ह्याला आवश्यक २७ केएल ऑक्सिजन पुरवठा नियमित व विनाव्यत्यय व्हावा, याबाबत एफडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. ऑक्सिजन पुरवठ्यात कोणतीही बाधा आता येणार नाही.

बोहरून बंद आतून सुरू चालणार नाही..

जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी कार्यारंभ आदेश आज जारी होतील. जिल्ह्यात व विशेषतः बीड शहरात लॉकडाऊनचे स्वरूप बाहेरून शटर बंद व आतून सगळं सुरू असे चित्र आहे. वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी नागरिकांनी कडक निर्बंधांचे पालन करणे अनिवार्य आहे.यासह रुग्णालयांमध्ये नातेवाईकांची वाढती गर्दी नियंत्रित करण्याबाबत पोलीस अधीक्षकांना निर्देश दिले असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी लसींच्या उपलब्धीनुसार व गर्दीचा अंदाज घेऊन  नागरिकांना वेळ ठरवून देण्यात येईल. तसेच या धोरणाची नियोजनबद्ध अंमलबजावणी करण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशा सूचना दिल्या आहेत.

बीड व अंबाजोगाई येथील विद्युतदाहिनी व रुग्णवाहिकेचा प्रश्न आज मार्गी लागला.अंबाजोगाईत २२ रुग्णांना एकत्र वाहून नेण्यात आलेल्या घटनेची सखोल चौकशी जिल्हाधिकारी करत असून यापुढे असे प्रकार होणार नाहीत यासाठी स्वाराती व लोखंडी कोविड केअर सेंटरचे नियंत्रण स्थानिक उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आल्याचेही मुंडे म्हणाले. 

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख