सत्तार-भुमरे-दानवे त्रिमुर्तींमुळे जिल्हा बॅंकेत शिवसेनेची सरशी

आता शिवसेनेचे जिल्हा बॅंकेत तब्बल ११ संचालक झाले आहेत. सहकार क्षेत्रात लिंबूटिंबू समजल्या जाणाऱ्या शिवसेनेला सत्तार-भुमरे-दानवे या त्रिमुर्तींनी घवघवीत यश मिळवून देत आपला ठसा उमटवला.
Aurangabad District Bank Election News
Aurangabad District Bank Election News

औरंगाबाद ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत आतापर्यंत काॅंग्रेसच फ्रंट सीटवर असल्याचे पहायला मिळाले. संचालक मंडळात इतर पक्षाचे दोन किंवा तीन सदस्य असयायचे. पण बॅंकेच्या तिजोरीच्या चाव्या कायम काॅंग्रेसच्याच हाती असायच्या. जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष दिवगंत सुरेश पाटील यांनी सर्वाधिक काळ अध्यक्ष म्हणून काम केले. परंतु त्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत सत्ता केंद्र आता काॅंग्रेसेत्तर पक्षाकडे गेल्याचे दिसून आले.

शिवसेनेला जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळात एक किंवा दोन यापेक्षा जास्त जागा कधी मिळाल्या नाही. पण राज्याच्या सत्तेत आल्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी केलेल्या राजकीय खेळीने चित्रच पालटले. आज २० पैकी तब्बल ११ संचालक शिवसेनेचे आहेत. एका अर्थाने जिल्हा बॅंकच आता शिवसेनेच्या ताब्यात आली म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

जिल्हा बॅंकेत संचालक म्हणून काम करण्याचा शिवसेनेचे विद्यमान मंत्री संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांना दांडगा अनुभव. या दोन्ही नेत्यांनी त्या त्या वेळच्या अध्यक्षांशी जुळवून घेत आपापल्या मतदारसंघात जिल्हा बॅंकेचा पुरेपूर वापर करून घेतला. त्यामुळे भुमरे पाचवेळा तर सत्तार तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडूण गेले.

कधी काळी संकटात सापडलेली जिल्हा बॅंक सर्वाधिक काळ अध्यक्ष राहिलेल्या सुरेश पाटील यांनी पुन्हा नफ्यात आणली. दीड-दोन वर्षापुर्वी सुरेश पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे चिरंजीव नितीन पाटील यांच्या हाती बॅंकेचा कारभार आला. सुरेश पाटील यांनी अनेक वर्ष अध्यक्ष म्हणून केलेले काम याची सहानुभूती नितीन पाटलांच्या पाठीशी भक्कमपणे होती.

संचालकमंडळाची मदुत संपल्यामुळे गेल्यावर्षीच जिल्हा बॅंकेची निवडणूक होणे अपेक्षित होते. पण कोरोनाने ती तब्बल वर्षभर लांबणीवर पडली. या दरम्यान जिल्ह्यात आणि राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. त्याचा परिणाम जिल्हा बॅंकेच्या राजकारणावर देखील झाला. कधी काळी काॅंग्ेसमध्ये असलेले अब्दुल सत्तार आता शिवसेनेते मंत्री आहेत.

काॅंग्रेसमध्ये असतांना सत्तार यांना सुरेश पाटील यांनी जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून नेहमीच झुकते माप दिले होते. तीच परंपरा आता त्यांचे चिरंजीव नितीन पाटील देखील पुढे सुरू ठेवतील हे त्यांच्या कालच्या शिवसेना प्रवेशावरून स्पष्ट झाले आहे. नव्हे सत्तार यांनीच हा योग जुळवून आणला असे म्हणावे लागेल.

जिल्हा बॅंक शिवसेनेच्या पर्यायाने आपल्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न अब्दुल सत्तार यांनी खूप आधीपासूनच सुरू केले होते. सत्तार यांची महत्वाकांक्षा मग ती विधानस, लोकसभा असो की मग मंत्रीपदाची शर्यंत नेहमीच दिसून आली आहे. अनेकदा त्यासाठी ते आक्रमक भूमिका देखील घेतात.

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या वेळी याचा अनुभव आला. जिल्हा बॅंकेच्या कारभाराचा अनुभव आणि त्याचे राजकीय फायदे माहित असल्याने सत्तार यांनी यावेळी निवडणुकीत केवळ रसच दाखवला नाही तर संपुर्ण सुत्रेंच आपल्या हाती घेतली होती.

भुमरे- दानवेंची साथ, तर बागडेंचा वापर..

जिल्हा बॅंकेत काय रणनिती वापरायची याचा संपुर्ण आराखडा सत्तार यांच्या डोक्यात फिट होता. यासाठी त्यांनी रोहयो मंत्री संदीपान भुमरे व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांना विश्वासत घेत पावले टाकली. विशेष म्हणजे शिवसेनेचा राज्यातील शत्रू नंबर वन असलेल्या भाजपला सोबत घेत शेतकरी विकास पॅनल तयार केले. बॅंकेच्या संचालक मंडळातील सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी असलेल्या बागडे यांच्या माध्यमातून शिवसेना- राष्ट्रवादी व भाजप असे पॅनल तयार केले.

निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा २० पैकी १४ जागा या पॅनलने जिंकल्या होत्या. तर विरोधी पॅनलला ६ जागांवर समाधान मानावे लागले. सत्तार यांच्या प्लानिंग प्रमाणे सगळे घडले, अगदी बागडे यांचा पराभव करण्याची खेळी देखील यशस्वी झाली. बागडेंच्या पराभवाने भाजपची जिल्हा बॅंकेतील शक्ती शीन करण्यात सत्तार यांना यश आले आणि इथेच शिवसेनेने बाजी मारली.

नितीन पाटलांचीही शिकार..

नितीन पाटील यांच्याबद्दल निवडूण आलेल्या बहुतांश संचालकांची सहानुभूती अजूनही असल्याची जाणीव सत्तार व शिवसेनेच्या मंडळीला होती. त्यामुळे अगदी पॅनलची घोषणा करण्यापासून बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटीलच असतील हे शिवसेनेचे नेते ठासून सांगत होते. पण निकाल लागल्यानंतर सत्तार यांनी नितीन पाटलांवर देखील दबाव वाढवण्याची खेळी केली. माझी इच्छा तेच अध्यक्ष व्हावेत अशी आहे, पण संचालक मंडळ घेईल तो अंतिम निर्णय असेल अशी गुगलीही टाकली.

सत्तार यांचे हे दबावतंत्र नितीन पाटील यांच्यावर लागू पडले. भाजपमध्ये राहून आपल्याला शिवसेना सहजासहजी अध्यक्ष करणार नाही हे त्यांच्या लक्षात आले. तर दुसरीकडे शिवसेनेने त्यांनी पक्षात प्रवेश करावा, यासाठी दबाव वाढवला. अखेर नितीन पाटलांनी शिवबंधन बांधून घेण्याची तयारी दर्शवली आणि काल हा प्रवेश सोहळा मुंबईत वर्षा बंगल्यावर पार पडला. शिवसेनेचे असलेले पण संचालक मंडळाची निवडणूक काॅंग्ेच्या पॅनलकडून लढलेले डोणगांवकर पती, पत्नी देखील या निमित्ताने पुन्हा शिवसेनेते आले. हा देखील सत्तार यांच्याच खेळीचा भाग होता.

त्यामुळे आता शिवसेनेचे जिल्हा बॅंकेत तब्बल ११ संचालक झाले आहेत. सहकार क्षेत्रात लिंबूटिंबू समजल्या जाणाऱ्या शिवसेनेला सत्तार-भुमरे-दानवे या त्रिमुर्तींनी घवघवीत यश मिळवून देत आपला ठसा उमटवला आहे. हे करत असतांना जिल्हा बॅंक ताब्यात घेण्याच्या मोहिमत अडसर ठरणाऱ्या शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना या घडामोडींपासून दूर ठेवण्यात देखील या तिकडीला यश आले.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com