शिवसेना आमदाराने नव्वद लाखांची एफडी मोडली, पण रेमडेसिव्हिर आलेच नाही... - Shiv Sena MLA broke FD of ninety lakhs, but Remedivisher never came | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

शिवसेना आमदाराने नव्वद लाखांची एफडी मोडली, पण रेमडेसिव्हिर आलेच नाही...

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 4 मे 2021

गोरगरिब रुग्णांचे प्राण वाचावे, त्याने वेळेवर उपचार मिळावेत, या उद्दात हेतून बांगर यांनी ९० लाखांची मदत केली. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत देखील झाले.

औरंगाबाद ः कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी मतदारसंघ व हिंगोली जिल्ह्यातील रुग्णांना रेमडेसिव्हिर मिळावे म्हणून स्वतःची नव्वद लाखांची एफडी मोडली. खाजगी वितरकाला ते पैसे दिले, पण दहा आठवडा उलटून गेला तरी रेमडेसिव्हिरचे इंजेक्श्न मात्र अजून आलेच नाही. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, अनेकांना रेमडेसिव्हर इंजेक्शनची गरज असली तरी त्यांना ते मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे.

गेल्या आठवड्यात राज्यभरात आमदार संतोष बांगर यांनी केलेल्या मदतीची राज्यभरात चर्चा झाली व त्यांच्या भूमिकेचे कौतुक देखील झाले. रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी लागणारी सव्वा कोटी रुपयांची रक्कम भरण्यास खाजगी वितरकाने असमर्थता दर्शवली होती. शासनाकडून वेळत पैसे मिळण्याची शाश्वती नसल्याने एवढी रक्कम कशी गुंतवायची, त्याचे व्याज कसे भरायचे? या विचारातून सदर वितरकाने पैसे भरण्यास नकार दिला होता.

बांगर यांना जेव्हा ही माहिती कळाली तेव्हा, त्यांनी बॅंकेतील स्वतःची ९० लाखांची एफडी मोडली आणि वितरकाला रेमडेसिव्हिर मागवण्यासाठी पैसे उपलब्ध करून दिले. शिवाय शासनाकडून जेव्हा मिळतील तेव्हा ते मला परत द्या, असे सांगत वितरकांची चिंता दूर केली. त्यामुळे बांगर यांच्या मतदारसंघासह जिल्ह्यात दोन-तीन दिवसांत रेमडेसिव्हरचा पुरवठा होईल असे सांगण्यात आले होते.

मात्र आठवडा उलटला तरी अद्याप, हिंगोलीला किती रेमडेसिव्हर आले, खाजगी वितरकाने आॅर्डर दिल्यानंतर अद्याप इंजेक्शन का मिळाले नाहीत? या संदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संदर्भात आमदार बांगर यांच्यांशी देखील संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो देखील होऊ शकला नाही.

गोरगरिब रुग्णांचे प्राण वाचावे, त्याने वेळेवर उपचार मिळावेत, या उद्दात हेतून बांगर यांनी ९० लाखांची मदत केली. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत देखील झाले. पण आठवडा उलटून गेला तरी रेमडेसिव्हरचा साठा अद्याप उपलब्ध न झाल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच तत्पर असणारे आमदार बांगर आपल्या आक्रमक स्वाभावासाठी ओळखले जातात.

रुग्णवाहिका जाळण्याची दिली होती धमकी..

जिल्हा परिषद अध्यक्षांना उपचारासाठी औरंगाबादला नेण्यासाठी १०८ रग्णवाहिका फोन करून देखील दोन तास उपलब्ध झाली नाही, तेव्हा त्यांचा रुद्रावतार दिसून आला होता. त्यांनी संबंधित यंत्रणेला वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही, तर जिल्ह्यातील सगळ्या रुग्णवाहिका एका रांगेत उभ्या करून जाळून टाकतो, अशा इशारा दिला होता.

त्यामुळे रेमडेसिव्हिर मागवण्यातील मोठा अडथळा दूर केल्यानंतर देखील जिल्ह्याला इंजेक्शनचा पुरवठा का होत नाही, याचा जाब बांगर संबंधित यंत्रणेला विचारतात का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Jagdish Pansare

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख