शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांना साखर आयुक्तांचा दणका; कारखाना जप्तीचे आदेश

सहकार आयुक्तांच्या आदेशानूसार गळीत हंगाम - २०२०-२१ मधील (२८ फेब्रुवारी २०२१ अखेर) शेतकऱ्यांचे १७ कोटी ४९ लाख ५९ हजार रुपयांची रक्कम थकली आहे.
Shivsena Minister Sandipan Bhumre- Suger Factory News Aurangabad
Shivsena Minister Sandipan Bhumre- Suger Factory News Aurangabad

पैठण : विहामांडवा येथील शरद सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने यंदाच्या केलेल्या उसाच्या गळीत हंगामातील शेतकऱ्यांना १७ कोटी ४९ लाख ५९ हजार रुपये न दिल्यामुळे  कारखान्याच्या  मालमत्तेची जप्ती करावी, असे आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड पुणे यांनी जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांना दिले आहेत. या साखर कारखान्याचे अध्यक्ष  रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे हे असुन कॅबिनेट मंत्र्याच्या साखर कारखान्याला जप्तीचा दणका साखर आयुक्तांनी दिल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या ताब्यात असलेल्या रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. साखर आयुक्तांच्या आदेशानंतर औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात कारखाना व्यवस्थापनाला नोटीस बजावली आहे. या हंगामात कारखान्यात १ लाख २२ हजार ८३२ मेट्रिक टन एवढ्या ऊसाचे गाळप झाले आहे. तर निव्वळ (एफआरपी) १९६१.७५ रुपये प्रति मे.टन इतकी आहे.

सहकार आयुक्तांच्या आदेशानूसार गळीत हंगाम - २०२०-२१ मधील (२८ फेब्रुवारी २०२१ अखेर) शेतकऱ्यांचे १७ कोटी ४९ लाख ५९ हजार रुपयांची रक्कम थकली आहे. ऊसाचे पैसे १४ दिवसात देणे बंधनकारक आहे. ही अट पुर्ण न केल्यास १५ टक्के व्याज आकारण्याची तरतुद आहे. सदर सुचना व कायदेशीर बाबींची जाणिव करुन दिल्यानंतरही कारखाना व्यवस्थापनाने शेतकऱ्यांची रक्कम थकीत ठेवुन ऊस नियंत्रण १९६६ मधील तरतुदीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे.

साखर आयुक्त यांनी १७ कोटी ४९ लाख ५९ हजार रुपये जमीन महसुलची थकबाकी समजुन कारखान्याने उत्पादित केलेली साखर, मोलेसिस आणि बगॅस इत्यादी उत्पादनाची विक्री करुन त्यातुन ही रक्कम वसुल करण्यात यावी तसेच आवश्यकते नुसार कारखान्याची जंगम व स्थावर मालमत्तेची जप्ती करुन ऊस नियंत्रण तरतुदीनुसार शेतकऱ्यांना १५ टक्के व्याजासह देण्याचे आदेश १० मार्च २०२१ रोजी जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईकडे लक्ष

दरम्यान, शरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष संदीपान भुमरे हे शिवसेनेचे आमदार असुन राज्यमंत्री मंडळात कॅबिनेट मंत्री आहेत. त्यांच्या या साखर कारखान्यावर जप्तीचे आदेश शासनाने काढल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण साखर आयुक्तांच्या आदेशानुसार कॅबिनेट मंत्र्याच्या साखर कारखान्याच्या मालमत्तेची जप्ती कधी करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

यंदाच्या गळीत हंगामासाठी एकुण किती ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊस घातला त्या शेतकऱ्यांची प्रमाणित यादी व कारखान्याच्या जंगम व स्थावर मालमत्तेची माहीती विहित नमुन्यातील विवरण पत्रात कारखान्याचे कार्यकारी संचालक यांच्या सही व शिक्यासह प्रादेशिक सहसंचालक (साखर) व विशेष लेखा परीक्षक वर्ग सहकारी संस्था औरंगाबाद यांनी जिल्हाधिकारी यांना तातडीने सादर करण्याचे आदेश देखील साखर आयुक्तांनी दिले आहेत. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com