shivsena-mim Meet Muncipal Commissinor news aurangabad
shivsena-mim Meet Muncipal Commissinor news aurangabad

शिवसेना-एमआयएम लागले महापालिका निवडणुकीच्या तयारीला..

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महापालिका प्रशासकांची भेट घेतल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील त्यांची भेट घेतली.

औरंगाबाद ः कोरोना संकटामुळे तब्बल एक वर्ष लांबणीवर पडलेली महापालिकेची निवडणुक कधी होणार हे जरी अजून स्पष्ट झालेले नसले, तरी शिवसेना आणि एमआयएम या दोन पक्षांनी तयारी सुरु केली आहे. महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय हे कोरोनातून बरे झाल्यानंतर गुरूवारी महापापिलकेत आले होते. त्यामुळे शिवसेना आणि त्यापाठोपाठ एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांची भेट घेत शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा केली.

चुकीचे आरक्षण, वाॅर्ड रचना या कारणावरून औरंगाबाद महापालिके विरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल आहे. शिवाय गेल्या वर्षभरापासून राज्यावर कोरोनाचे संकट असल्यामुळे महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली होती.

स्वबळाची भाषा करत सर्वच्या सर्व जागा लढवण्याच्या वल्गनाही झाल्या. पण सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेली याचिका आणि कोरोनाने पुन्हा तोंडवर काढल्याने निवडणुकीच्या तयारीला ब्रेक लागला. दरम्यान सहकारी संस्था, जिल्हा बॅंका आणि नुकचीत पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूकही झाली.

शिवाय महापालिकेच्या विरोधातील याचिकेवर सुनावणी आणि निकाल देखील लवकरच लागेल अशी शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेना आणि विरोधी पक्ष एमआयएमने नागरी प्रश्नांवरून प्रशासकांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले आहे.

शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह सिडको-हडको भागातील माजी नगरसेवकांना घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी घेऊन प्रशासंकाना भेटले. या भेटीत शहरातील विविध प्रश्नांवर चर्चा झाली असली तरी पाणी पुरवठा हा महत्वाचा विषय होता. मध्यंतरी महापालिका निवडणुक डोळ्यासमोर ठेवून अनेक विषय मार्गी लावले गेले, त्यात १६८० कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमीपूजन व गुंठेवारी हा महत्वाचा निर्णय होता.

यासह खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालक्मंत्री सुभाष देसाई यांनी विविध विकासकामांची उद्घाटने आणि भूमीपूजन करत निवडणुकीच फील आणला होता. आता शिवसेनेने पाणी पुरवठ्याचा मुद्दा हाती घेत निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दिसते.

खासदारांनीही घेतली भेट..

शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महापालिका प्रशासकांची भेट घेतल्यानंतर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील त्यांची भेट घेतली. यावेळी शुद्ध आणि स्वच्छ पाणी, स्मार्ट सिटीच्या कामाला वेग, शहरातील रस्त्यांची रखडलेली कामे, सलीम अली सरोवराचे सुशोभिकरण आदी विषयावर इम्तियाज जलील यांनी जोर दिला.

महापालिकेत गेली पाच वर्ष प्रमुख विरोधी पक्ष म्हणून एमआयएमने भूमिका बजावली आहे. लोकसभा निवडणुकीत या पक्षाला अनपेक्षित यश मिळून इम्तियाज जलील हे खासदार झाल्याने एमआयएमची शहर व ग्रामीण भागात ताकद वाढली आहे. या जोरावर सध्या २४ नगरसेवक असलेल्या एमआयएमला ३० ते ३५ पर्यंत झेप घ्यायची आहे.

यात त्यांना यश मिळाले तर आगामी महापालिकेत सत्तेच्या चाव्या त्यांच्या पक्षाकडे जाऊ शकतात. शहरातील शिवसेना, भाजप, एमआयएम, मनसे, वंचित बहुनज आघाडी या प्रमुख पक्ष आणि त्यांच्या इच्छुकांनी निवडणुकीसाठी कधीच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. आता या सगळ्याचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागले आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com