मराठवाड्यातील शिवसेना पस्तीशीत पोहचली...

काही निवडक तरुण कार्यकर्त्यांना सोबत घेत शिवसेनेची पहिली शाखा औरंगाबादेत सुरू झाली. पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका, मुंबईतून शिवसेनेच्या नेत्यांची शहरात उठबस, आंदोलनाची दिशा, कोणते मुद्दे घ्यायचे याचे नियोजन केले जायचे. सर्वात आधी शहरातील लोकांच्या मनातील भिती घालवून तुमच्या संरक्षणासाठी कुणी तरी आहे, हा विश्‍वास प्रत्येक नागरिकांच्या मनात निर्माण करण्याचे काम शिवसेनेने यशस्वीपणे केले.
marathwada shivsena now thirty five news
marathwada shivsena now thirty five news

औरंगाबादः मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या महानगरात शिवसेने बस्तान बसवल्यानंतर या पक्षाने आपले पंख दुष्काळी मराठवाड्याकडे पसरले. निजामी राजवटीतील अन्याय अत्याचार आणि त्या विरोधात लढा उभारत मराठवाडा मुक्त करणाऱ्या लढवय्या स्वातंत्र्यसैनिकांचा हा प्रदेश. निजाम गेला पण समाज विघातक शक्तींचा उपद्रव मराठवाडा विशेषतः औरंगाबादेत कमी झालेला नव्हता. मतांच्या राजकारणामुळे तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी देखील येथे होणाऱ्या सर्वसामान्यांवरील अत्याचार खपवून घेतला. अगदी ग्रामीण भागातून आपला शेतीमाल विकण्यासाठी शहरात आलेल्या शेतकऱ्यांची लुटूमार, महिलांना त्रास या प्रकारांमुळे शहर आणि जिल्हा नेहमीच दहशतीच्या छायेखाली असायचा. 

मुंबईत १९६६ साली शिवसेनाचा जन्म झाला आणि या संघटनेला औरंगाबाद म्हणजेच मराठवाड्याच्या राजधानीत यायला तब्बल १९ वर्ष लागली. हिंदुत्वाचा पुरस्कार आणि त्यांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरणारी संघटना म्हणून शिवसेना ओळखली जात होती.

बाळासाहेब ठाकरे नावाचे गारूड येथील हिंदुत्ववादी लोकांच्या मनावर अधिराज्य करायला लागलं होतं. येथील राजकीय, सामाजिक परिस्थतीचा योग्य अभ्यास आणि त्यातून शिवसेनेची गरज लक्षात घेता बाळासाहेब ठाकरेंनी औरंगाबादकडे लक्ष केंद्रीत केलं आणि ८ जून १९८५ रोजी मराठवाड्यातील शिवसेनेचे पहिली शाखा आजपासून ३५ वर्षापुर्वी औरंगाबादेत सुरू झाली.

बाळासाहेब ठाकरे मुंबईतील विलास भानुशाली, मधुकर सरपोतदार, प्रमोद नवलकर यांच्यासह अन्य नेत्यांना वारंवार औरंगाबादेत पाठवत आणि शिवसेनेचा विस्तार कसा करता येईल यावर बारकाईने लक्ष देत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित झालेले हजारो तरुण शिवसेनेत येण्यासाठी आतुर होते.

सुरुवातीला काही निवडक तरुण कार्यकर्त्यांना सोबत घेत शिवसेनेची पहिली शाखा औरंगाबादेत सुरू झाली. पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका, मुंबईतून शिवसेनेच्या नेत्यांची शहरात उठबस, आंदोलनाची दिशा, कोणते मुद्दे घ्यायचे याचे नियोजन केले जायचे. सर्वात आधी शहरातील लोकांच्या मनातील भिती घालवून तुमच्या संरक्षणासाठी कुणी तरी आहे, हा विश्‍वास प्रत्येक नागरिकांच्या मनात निर्माण करण्याचे काम शिवसेनेने यशस्वीपणे केले.

नव्या दमाचे तरुण पदाधिकारी झाल्यानंतर शहराच्या विविध भागात शिवसेनेच्या शाखा सुरू झाल्या. या शाखांच्या माध्यमातून शिवसैनिकांच्या भेटीगाठी होऊन शहरातील बारीक-सारीक घडमोडींवर लक्ष ठेवून अरे ला कारे म्हणणाऱ्यांची संख्या संघटनेत वाढली. ग्रामीण भागातून शहरात येणारा शेतकरी, गरीब, कष्टकरी मजुर आणि महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत शिवसेने आपल्या कामाचा धडाका सुरू केला. लोकांनाही शिवसेनेची गरज भासू लागली आणि पाहता पाहता काही भागात मर्यादित असलेली शिवसेना जिल्ह्यातील गाव, वस्त्या, तांड्यावर पोहचली. जीवमुठीत घेऊन फिरणाऱ्या नागरिकांनी मोकळा श्वास घ्यायला सुरूवात केली. कुठे काही घडले की शिवसैनिक तातडीने तिकडे धाव घेऊ लागले.

गल्ली ते दिल्ली यशाने झोळी भरली..

शिवसेनेचा जम औरंगाबाद शहर व जिल्ह्यात बसल्यानंतर मुंबईतील नेत्यांनी पक्षाच्या विस्तारासाठी कंबर कसली. शेजारचा जालना, परभणी, उस्मानाबाद, बीड, नांदेड करत पक्षाने सगळ्या मराठवाड्यात आपली पाळेमुळे रुजवली. तरुणांची शक्ती हीच शिवसेनेची खरी ताकद होती. त्यामुळे मराठवाड्यात शिवसेनेचा विस्तार झपाट्याने व्हायला लागला. संघटना बांधणीचे काम मराठवाड्यात सुरू असले तरी मराठवाड्याचा केंद्रबिंदु म्हणून औरंगाबादकडेच पाहिले जायचे.

८५ ते ८८ दरम्यान, शिवसेनेने शहरातील अनेक संवेदनशील विषयांना हात घातला. कत्तलखाना, जुगारचे अड्डे, शहरातील गुंडगिरीपासून ते थेट राष्ट्रीय पातळीवरच्या समान नागरी कायद्याचे मुद्दे घेऊन शिवसेना रस्त्यावर उतरली. यासाठी एक मोर्चा देखील शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला. पण या मोर्चावर दगडफेक झाली, शहरात दंगल उसळली अनेकांची डोकी फुटली, शेकडो शिवसैनिकांना तुरूंगात जावे लागले.

पण या दंगलीनेच पुढे शिवसेनेला राजकारणात मोठे यश मिळवून दिले. १९८८ च्या महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच निवडणुक लढवत असलेल्या शिवसेनेचे २७ नगरसेवक निवडूण आले. त्यानंतर शिवसेनेने मागे वळूनच पाहिले नाही, महापौर, उपमहापौर, आमदार, मंत्री, खासदार अशी अनेक पद औरंगाबादच्या जनतेने पाहिली.

लोक शिवसेनेच्या झोळीत भरभरून मतांचे दान टाकत होते, तिकडे मुंबईच्या नेत्यांनी देखील याची परतफेड जिल्ह्याला अनेक पद देत केली. स्वातंत्र्य काळापासून कॉंग्रेसचा प्रभाव असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेचा शिरकाव झाला आणि कॉंग्रेसच्या पतनाला सुरूवात झाली. लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा गल्ली ते दिल्लीपर्यंत शिवसेनेला प्रतिनिधित्व मिळत गेले.

१९९५, २०१४ च्या युती सरकारमध्ये औरंगाबाद आणि मराठवाड्यातील इतर भागाला मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. या शहराने शिवसेनेच्या वाट्याला गेल्या पस्तीस वर्षात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाचा अपवाद सोडला तरा मोठा पराभव कधी येऊ दिला नाही. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी देखील या शहारावरची आपली माया शेवटपर्यंत कायम ठेवली. पुढे उद्धव ठाकरे यांनी देखील महाराष्ट्राच्या राजकारणात औरंगाबादचे महत्व कमी होऊ दिले नाही.

संकटात अग्रेसर..

शिवसेनेने किती वर्ष सत्ता उपभोगली, किती विकासकामे केले हा वादाचा मुद्दा असला तरी संकटात धावून जाण्यात शिवसेने इतका अग्रेसर दुसरा कुठलाच पक्ष नसेल. शेतकरी आत्महत्या असो, की नैसर्गीक संकट सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जातांना शिवसेना सातत्याने दिसते. सत्ता असो की नसो, समाजकारणात शिवसेनेने कधी हात आखडता नाही घेतला हे देखील मान्य करावेच लागेल.

भूकंप, दुष्काळ, महामारी असो की आताचे कोरोनाचे संकट. शिवसेना झोकून देऊन काम करतांना दिसते. आत्महत्याग्रस्त कुटुंबाना आर्थिक मदत, शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह लावून देत त्यांचे संसार उभारणे असेल, आणि आता कोरोनाच्या संकटात गोरगरीब, कष्टकरी, मजुर आणि गरजूंना अन्नधान्य, जेवण, औषधी, आर्थिक मदत करण्यात देखील शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व शेकडो शिवसैनिक झटतांना दिसत आहे.
 
सत्तेमुळे मरगळ, कुरघोडीचे राजकारण..

रस्त्यावर उतरणारी शिवसेना जेव्हा सर्वप्रथम ९५ मध्ये राज्याच्या सत्तेवर आरूढ झाली, त्यांनतर मराठवाड्यातील अनेकांना लाल दिव्याच्या गाडीत बसण्याचा योग आला. पण ज्या शिवसैनिकांच्या जोरावर, मेहनतीमुळे हे शक्य झाले त्या शेकडो शिवसैनिकांच्या पदरी मात्र उपेक्षाच आली. ज्यांनी अंगावर केसेस घेतल्या त्यापैकी कितीतरी शिवसैनिक आजही कोर्टाच्या खेट्या घालत आहेत.

तर सत्तेच्या काळात पक्षात आलेल्यांना मात्र फळ चाखायला मिळाल्याची खंत आजही जुने शिवसैनिक बोलून दाखवतात. पाच वर्ष सत्ता उपभोगल्यानंतर शिवसेनेला पुन्हा तब्बल पंधरा वर्ष सत्तेपासून दूर राहावे लागले. त्यामुळे संघटनेच्या  कामात काहीशी मरगळ आणि कुरघोडीच्या राजकारणाचाही शिरकाव झाला. २०१४ मध्ये पुन्हा राज्यात युतीची सत्ता आली, तेच ते चेहरे पुन्हा सत्तेच्या खुर्चीत दिसले, त्यामळे शिवसेनेमध्ये अंतर्गत गटबाजीला देखील मोठ्या प्रमाणात उधाण आले.

सेवा, सुरक्षा आणि विकास हा अजेंडा घेऊन नेहमीच लोकांसमोर गेलेल्या शिवसेनेला कधीही विकासाच्या नावावर नाही तर सुरक्षेला प्राधान्य देत जनतेने निवडूण दिले. पंचवीस वर्ष महापालिकेची सत्ता आणि जिल्ह्यात आमदारा, खासदार असूनही ‘लोक काय विकास झाला‘? असा प्रश्न विचारतात यावरूनच परिस्थितीचा अंदाज येतो.

पक्षांतर्गत गटबाजी, कुरघोडीच्या राजकारणाचा फटका शिवसेनेला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बसला. वीस वर्ष सलग विजय मिळाल्यानंतर शिवसेनेला पाचव्यांदा पराभवाचे तोंड पहावे लागले. अर्थात शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चारही उमेदवार निवडूण आणत ही कसर भरून काढली. आज जिल्ह्याला दोन मंत्रीपद आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com