जालन्यातील त्या शिवसैनिकाचा खून सख्ख्या भावानेच सुपारी देऊन केला? - Shiv Sainik was killed by Jalna's brother-in-law by giving betel nut | Politics Marathi News - Sarkarnama

जालन्यातील त्या शिवसैनिकाचा खून सख्ख्या भावानेच सुपारी देऊन केला?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 10 फेब्रुवारी 2021

वडीलोपार्जित जमीनीच्या वादात रमेश शेळके यांच्या रामप्रसाद शेळके या सख्ख्या भावाने व त्यांच्या मुलानेच सुपारी देऊन केल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणातील अर्जुन दंडाईत या आरोपीने खूनाची कबुली दिली आहे.

जालना ः जिल्ह्यातील नागापूर शिवरात एका शिवसैनिकाचा खून करून त्याला कारसह जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना ८ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली होती. अशा क्रुरपणे शिवसैनिकाचा खून झाल्यामुळे जालन्यात एकच खबळबळ उडाली होती. रमेश शेळके या शिवसैनिकाच्या खून प्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली आहे. विशेष म्हणजे शेळके यांच्या सख्ख्या भावाने आणि त्याच्या मुलानेच सुपारी देऊन हा खून केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी या दोंघासह एकूण नऊ जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. यापैकी पाच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

जिल्ह्यातील पाहेगांवचे माजी सरपंच रमेश शेळके यांचा खून ८ फेब्रुवारी रोजी नागापूर शिवारात करण्यात आला होता. एका दरीत जळलेल्या अवस्थेतील कार आढळून आल्यानंतर हे खून प्रकरण समोर आले होते. ज्या गाडीत शेळके यांचा मृतदेह जाळण्यात आला होता, त्या गाडी जवळच रक्ताने माखलेला रुमाल आणि दगड सापडला होता. त्यामुळे आधी खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी कारमध्ये शेळके यांचा मृतदेह टाकून ती जाळण्यात आल्याचा पोलिसांना संशय होता. कुटुंबियांनी शेळके दोन दिवसांपासून गायब असल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी शोधाशोध केली तेव्हा शेळके यांचा मृतदेह दरीत पडलेल्या कारमध्ये आढळून आला होता.

या प्रकरणाचा तपास लावून काही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली असून वडीलोपार्जित जमीनीच्या वादात रमेश शेळके यांच्या रामप्रसाद शेळके या सख्ख्या भावाने व त्यांच्या मुलानेच सुपारी देऊन खून केल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणातील अर्जुन दंडाईत या आरोपीने खूनाची कबुली दिली आहे. २०१८ पासून या दोघा भावांमध्ये जमीनीचा वाद सुरू होता. प्रकरण कोर्टात असतांना देखील या भावांमध्ये अनेकदा खटके उडत होते.

दरम्यान, पोलिसांनी संशयावरून काही काॅल डिटेल्स तपासले होते, त्या आधारे पोलिसांनी तपास करून या खून प्रकरणात ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून पाच आरोपींना अटक केली आहे. रामप्रसाद शेळके व त्याच्या मुलास पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले असता या दोघांना ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. चार फरार आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. शिवसैनिकाचा खून झाल्याने या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी देखील केली होती.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख