आमदार दानवे यांच्यातील शिवसैनिक जागा झाला, बेशिस्त रिक्षाचलाकाला फटकावले.. - Shiv Sainik took place between MLA Danve and hit the unruly rickshaw puller. | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार दानवे यांच्यातील शिवसैनिक जागा झाला, बेशिस्त रिक्षाचलाकाला फटकावले..

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 28 जून 2021

चौकापासूनच काही अंतरावर संपर्क कार्यालय असलेले आमदार अंबादास दानवे आपल्या शिवसैनिकांसह क्रांतीचौकात पोलिसांच्या मदतीला धावून गेले.

औरंगाबाद ः वाहतूकीची प्रंचड झालेली कोंडी फोडण्यासाठी पोलिसांसह मी व शिवसैनिक प्रयत्न करत होतो. एकीकडची वाहन रोखून धरत दुसऱ्या बाजूने मार्ग मोकळा करून देत असतांनाच एक बेशिस्त रिक्षाचालक मध्येच घुसला. त्यामुळे त्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. (Shiv Sainik took place between MLA Danve and hit the unruly rickshaw puller.) मी आमदार असलो तरी आधी शिवसैनिक आहे, आणि त्या रिक्षाचालकाचा बेशिस्तपणा पाहून माझ्यातला शिवसैनिक जागा झाला होता, अशा शब्दांत शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी रिक्षाचालकाला फटकावल्याच्या प्रकाराचे समर्थन केले.

राज्यात कोरोनाची तिसरी लाट व कोरोनाचा नवीन विषाणू डेल्टाचा प्रादुर्भाव या पार्श्वभूमीवर आजपासून पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. (Shivsena Mla Ambadas Danve) राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे.  त्यामुळे औरंगाबादेती नागरिकांमध्ये देखील संभ्रमाचे वातावरण होते. आपल्याकडेही आजपासूनच हे निर्बंध लागू झालेत की काय, म्हणून लोकांनी चारच्या आधी घरी परतण्यासाठी धावपळ सुरू केली.

त्यामुळे शहरातील प्रमुख चौक असलेल्या क्रांतीचौकात वाहनांची एकच गर्दी झाली. चारचाकी, दुचाकी व मोठ्या वाहनांची चारही बाजूंनी गर्दी झाल्यामुळे या चौकात चांगला गोंधळ उडाला. सगळी वाहने रस्त्याच्या मधोमध आल्याने कुणाला पुढे जाता येईना. वाहतूक पोलिसांचे प्रयत्नही अपुरे पडले. तेव्हा या चौकापासूनच काही अंतरावर संपर्क कार्यालय असलेले आमदार अंबादास दानवे आपल्या शिवसैनिकांसह क्रांतीचौकात पोलिसांच्या मदतीला धावून गेले.

दानवे स्वतः रस्त्यावर उतरले आणि त्यांनी ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहनांना वाट करून देण्याचा प्रयत्न केला. हे करत असतानाच अचानक एक रिक्षाचालक भरधाव वेगाने समोर आला. हे पाहून दानवेंचा पारा चांगलाच वाढला आणि त्यांनी त्या रिक्षाचालकाला दोन-तीन ठेवून दिल्या. दानवे संतापलेले पाहून शिवसैनिकही तिकडे धावले आणि त्या रिक्षाचालकाला तेथून काढून दिले.

दरम्यान, दानवे यांनी अर्धा तास क्रांतीचौकात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलिसांची मदत केली. बऱ्याच प्रयत्नानंतर येथील वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, रिक्षाचालकाला का फटकावले? असे विचारले तेव्हा, तो बेशिस्तपणे समोर आला होता, पोलिस, शिवसैनिक चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न करत होते. लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी धडपडत होते. मुळात लोकांमध्ये चार वाजता संचारबंदी लागणार, या भितीमुळे गोंधळ उडाला होता. त्यामुळे जो तो घर गाठण्यासाठी घाईत होता.

आम्ही पोलिसांच्या मदतीला धावून गेलो. वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असतांनाच हा रिक्षाचालक मध्येच घुसला. त्यामुळे माझा संताप अनावर झाला.  मी आमदार असलो तरी आधी शिवसैनिक आहे, लोकांची गैरसोय होते तिथे हा शिवसैनिक जागा होतो. आजही तेच झाले, तो रिक्षाचालक ओळखीचाच होता, असेही दानवे यांनी सांगितले. दरम्यान, दानवे यांनी रस्त्यावर उतरून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी केलेले प्रयत्न आणि बेशिस्त रिक्षाचलाकाला दिलेला प्रसाद यांची शहरात चांगलीच चर्चा झाली. 

हे ही वाचा ः पालकमंत्र्यांकडू चंद्रकांत खैरे यांचे कौतुक, विरोधकांच्या भुवया उंचावल्या..

Edited By : jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख