शरद पवार ‘सारथी’च्या विद्यार्थ्यांच्या फेलोशिपचा प्रश्न मार्गी लावणार

सारथीने पहिल्या टप्यात मराठा, कुणबी समाजातील एम.फिल. व पीएच.डी करणाऱ्या ५०२ संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर केली होती. मात्र यातील बहुतांश विद्यार्थ्यांना अद्यापही फेलोशिप मिळालेली नसल्याचे सतीश चव्हाण यांनी शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिले.
mla satish chavan meet shrad pawar news
mla satish chavan meet shrad pawar news

औरंगाबाद- छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या(सारथी) विद्यार्थ्यांच्या रखडलेला फेलोशिपच्या संदर्भात शरद पवार स्वत: लक्ष घालणार आहेत. सारथीला त्वरीत निधी उपलब्ध करून विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या फलोशिपचा प्रश्न त्वरीत मार्गी लावावा, यासाठी शरद पवार हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. लवकरच हा प्रश्न मार्गी लागले, अशी माहिती मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी दिली आहे.

सारथीच्या विद्यार्थ्यांच्या रखडलेल्या फेलोशिप संदर्भात सतीश चव्हाण यांनी आज मुंबई येथे राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सारथी या संस्थेची स्थापना करण्यात आली. मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना एम.फिल., पीएच.डी. सारखे संशोधन तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून फेलोशिप देण्यात येते.

सारथीने पहिल्या टप्यात मराठा, कुणबी समाजातील एम.फिल. व पीएच.डी करणाऱ्या ५०२ संशोधक विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर केली होती. मात्र यातील बहुतांश विद्यार्थ्यांना अद्यापही फेलोशिप मिळालेली नसल्याचे सतीश चव्हाण यांनी शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिले.

यासंदर्भात मार्च २०२० मध्ये झालेल्या अधिवेशनात लक्षवेधी उपस्थित केली असता सारथी अंतर्गत विद्यार्थ्यांचे फेलोशिपचे रखडलेले पैसे १५ दिवसांत विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा केले जातील, अशी घोषणा बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात केली होती.

मात्र अजुनही यासंदर्भात कुठलीच कार्यवाही झाली नसल्याने पात्रताधारक अनेक विद्यार्थ्यांना फेलोशिप न मिळाल्याने त्यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत असल्याचे चव्हाण यांनी शरद पवार यांना सांगितले. सारथीची फेलोशिप मंजुर झालेल्या विद्यार्थ्यांना नियमानुसार दुसरीकडे कुठेच नोकरी करता येत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी हातातील नोकरी सोडली. 

त्यात राज्यात कोरोनाचा वाढत जाणारा प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन असल्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. सारथी अंतर्गत ज्या विद्यार्थ्यांची फेलोशिप रखडली आहे, अशा विद्यार्थ्यांना तात्काळ फेलोशिप मंजूर करून त्यांना कोरोनाच्या संकट काळात दिलासा द्यावा, अशी मागणी आपण शरद पवारांकडे केली असून त्यांनी यावर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले, असेही सतीश चव्‍हाण यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com