अनुदानित दिव्यांग शाळेतील अकरा हजार शिक्षक, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू - Seventh Pay Commission applies to 11,000 teachers and staff of subsidized Divyang schools | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगलीकडे रवाना, पूरग्रस्त भागाची पाहणी करणार

अनुदानित दिव्यांग शाळेतील अकरा हजार शिक्षक, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 23 एप्रिल 2021

अर्थसंकल्पीय अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी दोन महिन्यांच्या आत सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात घोषणा केली होती.

मुंबई : सामाजिक न्याय विभागांतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी 'गुड न्युज' दिली आहे. दिव्यांग शाळेतील ४८९९ शिक्षक व ६१५९ व अन्य कर्मचारी अशा एकूण ११ हजार५८ कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे.  

मागील महिन्यात पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात  मुंडे यांनी याबाबतची घोषणा केली होती. त्यानुसार सामाजिक न्याय विभागाने याबाबतचा शासन निर्णय आज जारी केला आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालयामार्फत स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या शासन मान्य अनुदान प्राप्त दिव्यांग निवासी, अनिवासी, विशेष शाळा, कर्मशाळा व मतिमंद बालगृहे चालविण्यात येतात.

या सर्व शाळांमधील ११ हजार ५८ शिक्षक-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात मागणी करण्यात येत होती. त्याअनुषंगाने धनंजय मुंडे यांनी एक अभ्यासगट नेमून सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात येणाऱ्या त्रुटी दूर करण्याचे निर्देश विभागाला दिले होते. त्याची पूर्तता करत विभागाने आज (दि. 23) याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी दोन महिन्यांच्या आत सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात घोषणा केली होती, त्यानुसार ही घोषणा महिनाभरातच प्रत्यक्षात उतरवून दिव्यांग शाळांतील शिक्षक-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा  अद्यादेश काढण्यात आला. 

दरम्यान ११ हजार कर्मचाऱ्यांचा अनेक वर्षापासूनचा सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न सोडल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

Edited By : Jagdish Pansare
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख