सरकारला सद्बुध्दी मिळो म्हणत, निलंगेकरांनी केली वीज बिलांची होळी.. - Saying that the government should get sanity, Nilangekar celebrated the Holi of electricity bills. | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

सरकारला सद्बुध्दी मिळो म्हणत, निलंगेकरांनी केली वीज बिलांची होळी..

राम काळगे
सोमवार, 29 मार्च 2021

हे सरकार महावसूली सरकार असल्याची टीका देखील भाजपकडून यावेळी करण्यात आली.

निलंगा : राज्याचे सरकार हे महावसूली सरकार असून नागरिकांना विजकंपनी कडून अव्वाच्या सव्वा बील आकारणी केली जात आहे. नागरिक कोरोना सारख्या भयंकर संकटात असताना वीज बिलांची सक्तीने वसुली केली जात असल्याचा निषेध म्हणून भाजपचे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी वीज बिलांची होळी केली. शिवाय यावेळी राज्य सरकारच्या विरोधात बोंबा देखील मारण्यात आल्या.

संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून नागरिकांना वीज बीलांची होळी करत राज्य सरकारच्या विरोधात बोंबा मारण्याचे आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. निलंगा येथे स्वतः निलगेंकरांनी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत महावितरणाच निषेध म्हणून वीज बिलांची होळी केली. तसेच राज्य सरकारच्या विरोधात बोंबा मारत आंदोनल केले.

कोविड-१९ च्या काळात अनेक महिने दुकाने व व्यवसाय बंद होते. त्यामुळे अनेकांची रोजीरोटी बंद पडली. मात्र या काळातील विजबीलात सवलत देवू म्हणून राज्य सरकारने शेतकरी, व्यापारी, घरगुती ग्राहक यांची निराशा केली. महावितरणने भरमसाठ बिले दिल्यामुळे अनेकांचे कंबरडे मोडले असून बिल भरणे शक्य नाही.

साध्या केस कर्तनालयासारख्या दुकानदारांना लाखोंची बिले आली आहेत. काही ठिकाणी वीज जोडणी देण्यापूर्वीच वीज बिले पाठविली आहेत. यामुळे सामान्य नागरिक संकटात असल्याने या सरकारच्या विरोधात विज बीलाची होळी करण्यात आली. निलंगा येथील निवासस्थाना समोर संभाजी पाटील व भाजपच्या कार्यकर्त्यांनी वीज बिलांची सामुहिक होळी केली. या सरकारला चांगली बुध्दी दे असे साकडे देखील यावेळी घालण्यात आले. 

हे सरकार महावसूली सरकार असल्याची टीका देखील भाजपकडून यावेळी करण्यात आली. सध्या मार्च अखेर असल्याने विज कंपनीकडून पाणीपूरवठा, पथदिवे, शेतीपंप, विंधन बोअरचे कनेक्शन कापले जात आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. १५ दिवसात विजबील दुरूस्ती करून द्या, अन्याथा यापेक्षा तिव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही निलंगेकर यांनी यावेळी महावितरण व सरकारला दिला. 

Edited By : Jagidsh Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख