सरपंचांनो तुम्हाला निवडून आणणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संध्याकाळी घेऊन बसा- रावसाहेब दानवे - Sarpanches, take the office bearers and activists who bring you elections in the evening - Raosaheb Danve | Politics Marathi News - Sarkarnama

सरपंचांनो तुम्हाला निवडून आणणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना संध्याकाळी घेऊन बसा- रावसाहेब दानवे

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

सगळ्यांना एकदा संध्याकाळी घेऊन बसा. बसा म्हणजे चहापाणी जेवायला. त्याला श्रमपरिहार म्हणतात. म्हणजे गावातील वातावरण चांगले राहील, असा चिमटाही दानवे यांनी काढला.

औरंगाबाद ः सरपंचांनाे तुम्ही आता गावचे पुढारी झाले आहात, पण ज्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तुम्हाला निवडूण आणलं त्यांना विसरू नका. त्यांना जरा संध्याकाळी घेऊन बसा, चहाला, जेवायला असा सल्ला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सिल्लाेड तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच-उपसरंपचांना दिला. तुमच्यावर विरोधक टपून बसलेले आहेत, तुमचे एक वाकडे पाऊल तुम्हाला अडचणीत आणू शकते, तेव्हा सरळ कारभार करा, असा कानमंत्रही दानवेंनी यावेळी दिला.

सिल्लोड तालुक्यातील नवनिर्वाचित भाजपच्या सरपंच-उपसरंपचांचा सत्कार रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी दानवे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत या सरपंच- उपसरपंच व सदस्यांचा वर्गच घेतला. ग्रामपंचायतीचा कारभारा कसा हाकायचा यापासून तर विरोधकांपासून सावध कसे राहायचे याच्या अनेक टिप्स देखील दानवे यांनी दिल्या.

रावसाहेब दानवे म्हणाले, सिल्लोड तालुक्यात राज्यमंत्र्या सारखा विरोधक असून देखील तुम्ही ५३ ग्रामपंचायती त्यांच्या दाढीतून काढून आणल्या. ही गोष्ट साधी नाही, आपली तालुक्याची टीम चांगली आहे, फक्त एकजूटीने काम करण्याची गरज आहे. तर येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषदेत विरोधकांना एकही जागा मिळणार नाही.

गावच्या निवडूण आलेल्या सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी कामकाज करतांना खबरदारी घेण्याची गरज आहे. विरोधक सध्या खवळलेले असल्याने त्यांचे तुमच्यावर बारकाईने लक्ष असणार आहे. तेव्हा गेल्या निवडणुकीतील खर्च, ग्रामपंचायतीची दर महिन्याला मिटिंग गावांत कोणत्या योजना राबवायच्या याची तयारी लोकांशी चर्चा करून सुरू करा.

हे करत असतांनाच तुम्हाला निवडूण आणण्यासाठी आपल्या ज्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले, कुणी असेही असतील ज्यांचा आपल्या पक्षाशी संबंध नाही, पण त्यांचीही तुम्हाल मदत झाली, अशा सगळ्यांना एकदा संध्याकाळी घेऊन बसा. बसा म्हणजे चहापाणी जेवायला. त्याला श्रमपरिहार म्हणतात. म्हणजे गावातील वातावरण चांगले राहील, असा चिमटाही दानवे यांनी काढला.

पुढाऱ्याशिवाय गावचा विकास करा..

भोकरदन तालुक्यातील राजुर जवळील तपोवन गावाचे उदाहरण रावसाहेब दानवे यांनी उपस्थितांना दिले. या गावाने केवळ सभामंडप, स्माशनभूमीच उभारल्या नाही तर ठिबकच्या योजना, इलेक्ट्रीक मोटारी, शेततळे, शेडनेट अशा केंद्राच्या अनेक योजना गावात आणल्या. विशेष म्हणजे कुठल्याही पुढाऱ्याची मदत न घेताल जवळपास सहा कोटी रुपयांचा निधी या गावाने आणला.

असाच विकास तुम्ही देखील तुमच्या गावाचा करू शकता. तो कसा करायचा याचा एक वेगळा प्रशिक्षण वर्ग मी तुमचा घेणार आहे. तुर्तास तुम्ही ग्रामपंचायीत प्राथमिक कामे सुरू करा, असेही दानवे यांनी सांगितले. ज्यांच्या बायका ग्रामपंचयातीमध्ये निवडूण आल्या आहेत, त्यांना किमान मिटिंगांना तरी बोलवत जा, झेराॅक्स काॅपी सारखे तुम्ही येऊ नका, असा टोला देखील दानवे यांनी उपस्थितांना लगावला.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख