नवाब मलिक, आमदार बाजोरिया यांना शोधून देणाऱ्यास बक्षिस;परभणीत भाजपची पोस्टरबाजी

या दोघांनाही शोधून परभणीत आणून सोडणाऱ्यांना योग्य बक्षीस दिले जाईल.
Parbhani Bjp Youth Wing publish Poster Against Nawab Malik, Bajoria News
Parbhani Bjp Youth Wing publish Poster Against Nawab Malik, Bajoria News

परभणी : राज्यात व मराठवाड्यात सध्या कोरोनाचे थैमान सुरू आहे. दररोज हजारो रुग्णांची वाढ आणि शेकडो बाधितांचे प्राण या महामारीमुळे जात आहेत. कोरोना संसर्ग वाढत असतांना आॅक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन, बेड व इतर आरोग्य सुविधांच्या बाबतीत देखील प्रचंड ओरड सुरू आहे. अशावेळी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी किंवा मंत्री सर्वसामान्यांसाठी काय करतात याकडे लोकांचे आणि विशेषतः विरोधी पक्षाचे बारकाईने लक्ष असते.

परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक व स्थानिक स्वराज्य संस्थेचे शिवसेना आमदार विप्लव बाजोरिया यांनी परभणी व हिंगोली जिल्ह्याकडे केलेल्या दुर्लक्षामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने तर पालकमंत्री मलिक, आमदार बाजोरिया दाखवा अ्न बक्षिस मिळवा, अशी बॅनरबाजी सुरू करण्यात आली आहे.

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर परभणीचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. परंतु गेल्या वर्षभरापासून कोरोनाचे संकट राज्यावर  असल्यामुळे नवाब मलिक हे जिल्ह्यात शासकीय झेंडावंदन आणि काही जिल्हा नियोजन समितीच्या बैठका सोडल्या तर फारसे दिसले नाही.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढलेला असतांना आरोग्य उपाययोजनाचा बोजवारा उडालेला असतांना पालकमंत्री म्हणून त्यांनी जिल्ह्यात ठाण मांडून बसायला हवे, रुग्णांच्या अडचणी सोडवायला हव्यात अशी अपेक्षा. पण राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्यामुळे ते मुंबईतच अडकून पडले. त्यामुळे त्यांच्या जिल्ह्यातील अनुपस्थितीवरून सहाजिकच प्रश्न उपस्थित केले जाणार.

दुसरे म्हणजे हिंगोली-परभणी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून गेलेले मुळचे अकोल्याचे असलेले विप्लव बाजोरिया हे तर निवडून आल्यापासून आपल्या मतदारसंघात फिरकलेच नाही. शिवसेनेने जेव्हा त्यांची उमेदवारी जाहीर केली होती, तेव्हा देखील बाहेरचा उमेदवार म्हणून त्यांना विरोध झाला होता.

आता ज्या मतदारसंघाचे ते विधान परिषदेत प्रतिनिधित्व करतात, तो मतदारसंघ व तेथील नागरिक अडचणीत असतांना बाजोरिया यांनी एखादा दौरा किंवा साधी विचारपूस देखील करू नये, याबद्दल आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे. भाजयुमोने या संतापाला वाट करून दिली आहे.

पालकमंत्री नवाब मलिक,स्थानीक स्वराज संस्थेचे आमदार बाजोरिया दाखवा बक्षीस मिळवा, अशी पोस्टर बाजी भाजयुमोचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्याकडून सुरू करण्यात आली आहे.  या दोघांनाही शोधून परभणीत आणून सोडणाऱ्यांना  योग्य बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा या पोस्टरबाजीतून सुरू आहे. 

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com