राजकारणापलीकडचे नाते: खासदार प्रीतम मुंडेनी बांधली खोतकरांना राखी..

ताई, मी सदैव आपल्या पाठीशी राहील, अशी ग्वाही 'भाऊ' म्हणून खोतकरांनी प्रीतम मुंडे यांना दिली.
राजकारणापलीकडचे नाते: खासदार प्रीतम मुंडेनी बांधली खोतकरांना राखी..
Mp Dr.Pritam Munde- Arjun Khotkar- Rakshabandhan News Jalna

जालना ः केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर राज्यात शिवसेना विरुध्द भाजप असा संघर्ष भडकलेला असतांना दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना सुखावणारी एक गोष्ट जालन्यात घडली आहे. बीडच्या भाजप खासदार डाॅ. प्रीतम मुंडे यांनी शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जून खोतकर यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन राखी बांधली. (Relationship beyond politics: MP Pritam Munde built Rakhi for Khotkars) राजकारणापलीकडचे नाते जपत या खोतकर-मुंडे यांच्या कुटुंबातील हा ऋणानुबंध निश्चितच सुखावणारा आहे.

गेली ३०-४० वर्ष एकत्र राज्यात सत्ता आणि राजकारण केलेल्या शिवसेना-भाजप या पारंपारिक मित्र पक्षांमध्ये आता कमालीचे शत्रुत्व निर्माण झाले आहे. (Bjp Mp Dr. Pritam Munde, Beed) राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून तर ही कटुता अधिकच वाढली. मोदी मंत्रीमंडळात शिवसेनेचे कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नारायण राणे यांचा समावेश करत भाजपने सेनेला आणखीणच डिवचले.

त्यात राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल वादग्रस्त विधान करत या दोन पक्षातील दरीच वाढवली नाही, तर ताणलेले संबंध तोडण्याची भूमिका बजावली. (Shivsena Leader Arjun Khotkar Jalna) ठाकरे सरकारने राणे यांना अटक करत हम भी किसी से कम नही हे दाखवून दिले. पण या कुरघोडीच्या राजकारणात दोन्ही पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांची मात्र डोकी फुटली. समाज माध्यमांवर देखील एकमेकांवर दोन्ही बाजूंनी चिखलफेक सुरू असतांना आज जालन्यात एक सुखद प्रसंग अनुभवायला मिळाला.

बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना राखी बांधण्यासाठी त्यांच्या दर्शना या निवासस्थानी आल्या होत्या. खोतकरांना राक्षी बांधत त्यांनी औक्षणही केले.  'भाऊं'ना सुख-समृद्धी, निरोगी आयुष्य आणि सुयश चिंतत त्यांनी राजकारणापलिकडले नाते जपत एक चांगला पायंडा पाडल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.  खोतकर आणि मुंडे कुटुंबातील ऋणानुबंधास यावेळी दोघांनीही उजाळा दिला.  

दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीने अर्जुन खोतकर यांना देखील यावेळी गहिवरून आले.  ताई, मी सदैव आपल्या पाठीशी राहील, अशी ग्वाही 'भाऊ' म्हणून खोतकरांनी प्रीतम मुंडे यांना दिली. तर एक बहीण म्हणून मी कधीच खोतकर परिवाराला अंतर देणार नाही, असा विश्वास प्रीतम मुंडे यांनी देखील खोतकरांना दिला.

मुंडे आणि खोतकर परिवारातील नाते रक्षा बंधनाच्या निमित्ताने दृढ झाल्याचे पहायला मिळाले. या कौटुंबिक सोहळ्याच्या वेळी खोतकरांच्या पत्नी सीमा खोतकर, मुलगा, अभिमन्यू खोतकर व संपुर्ण कुटुंब उपस्थित होते.

Edited By : Jagdish Pansare
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in