..या शिवसेनेच्या नाही, तर सत्तारांच्या शाखा; आमिषाला बळी पडू नका!

एकमेकांवर टीका करणारे एकत्र येऊन गळ्यात गळे घालतात, स्तुतीसुमनं उधळतात, हे देखील आता मतदारसंघातील जनतेला नवे नाही.
raosaheb danve -Abdul Sattar news Aurangabad
raosaheb danve -Abdul Sattar news Aurangabad

औरंगाबाद ः केंद्रात रेल्वे राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर रावसाहेब दानवे पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात आले. फुलंब्रीत सत्कार स्वीकारल्यानंतर ते शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार आमदार असलेल्या सिल्लोडमध्ये गेले आणि तिथे भाजपच्या वतीने सत्कार स्वीकारला. (Raosaheb Danve said, this is not a branch of Shiv Sena, but a branch of the Abdul Sattar) दानवे सत्तार यांच्यावर काय टीका करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असतांनाच त्यांनी निशाणा साधला.

शिवसंपर्क मोहिमेच्या माध्यमातून अब्दुल सत्तार यांनी गाव तिथे शिवसेना शाखा अभियान राबवले आहे. (Central Railway State Minister Raosaheb Danve) त्यामुळे गावागावांत शिवसेनेच्या शाखा दिसू लागल्या आहेत. सत्तार हे सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचे आमदार असले तरी हा भाग रावसाहेब दानवे यांच्या जालना लोकसभा मतदारसंघात येतो, त्यामुळे दानवे यांना हे चांगलेच खटकले. (State Minister Abdul Sattar) रेल्वे, कोळसा व खाण मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर तब्बल एक महिना दहा दिवसांनी दानवे मतदारसंघात आले.

सत्तार यांनी शिवसंपर्क मोहिमे दरम्यान, भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांना आमिष दाखवून त्यांना शिवसेनेत घेण्याचे प्रयत्न सुरू केल्याची कुणकुण दानवे यांना लागली होती. त्यामुळे सिल्लोडमध्ये दाखल होताच त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सत्तार यांच्या आमिषाला बळी पडू नका, गावागावात स्थापन होत आहेत, त्या शिवसेनेच्या नाही तर सत्तार यांच्या शाखा असल्याची टीका दानवे यांनी केली.

सत्तार हे गावागावांत जाऊन फुटाणे वाटल्या सारखी आश्वासने देत आहेत, मी एवढ्या कोटींचा निधी आणला असे सांगत आहेत. पण ते फारफार तर ६०-७० कोटींचा निधी आणू शकतील, पण मी २४०० कोटींचा एकच रस्ता केला आहे. अजिंठा ते बुलडाणा, देऊळगांवराजा मार्गे असे अनेक रस्ते केले. त्यामुळे सत्तार यांनी स्पर्धा करायची असेल तर माझ्या निधीशी करावी, असा टोला देखील दानवे यांनी लगावला.

सिल्लोड जिल्हा करून दाखवा..

सत्तार गावागावत आपल्या सरपंचाना, पदाधिकाऱ्यांना आमिष दाखवतो आहे, त्याच्या आमिषाला बळी पडू नका, सत्तार सिल्लोडला जिल्हा करू शकतो का? जिल्हा करणार असेल तर आम्ही त्याच्या पाठीशी राहू, असे खुले आव्हान देखील दानवे यांनी केले. संपुर्ण राज्यात आपला मतदारसंघच असा आहे, जिथे सर्वात कमी पक्षांतर असल्याचा दावा देखील दानवे यांनी केला.

बऱ्याच दिवसांनी मतदारसंघात आलेल्या दानवे यांनी सत्तार यांच्यावर तोंडसुख घेतले असले, तरी त्यांची ही छुटपुटची लढाई असते हे आता दोघांच्याही कार्यकर्त्यांना कळून चुकले आहे. एकमेकांवर टीका करणारे एकत्र येऊन गळ्यात गळे घालतात, स्तुतीसुमनं उधळतात, हे देखील आता मतदारसंघातील जनतेला नवे नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक दानवे-सत्तार यांच्या भाषणाकडे करमणूक म्हणून पाहतात.

निवडणूकीत मात्र दोघेही निवडून येतात हा आतापर्यंतचा इतिहास राहिलेला आहे. त्यामुळे दानवे यांनी सत्तार यांच्यावर केलेली टीका किती गंभीरपणे केली? व राज्यमंत्री अब्दुल सत्तार त्याला किती गंभीरतेने घेतात हे पाहणे आता मह्त्वाचे ठरणार आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in