महापालिकेत रेमडेसिव्हिरचा काळाबाजार करणारे रॅकेट!

२३ एप्रिलला एक बॉक्स डॉक्टरांनी फोडला असता, त्यात रेमडेसिव्हर ऐवजी एमपीएस इंजेक्शन आढळले. ही बाब कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. वैशाली मुदगलकर यांना सांगितली.
Aurangabad Municipal Corporation News
Aurangabad Municipal Corporation News

औरंगाबादः  महापालिकेच्या मेल्ट्रॉन येथील कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल गंभीर रुग्णांसाठी देण्यात आलेल्या रेमडेसिव्हर इंजेक्शनच्या २६ पैकी एका बॉक्समधील ४८ इंजेक्शन गायब करून त्यात एमपीएस इंजेक्शन भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे महापालिकेतदेखील रेमडेसिव्हिरचा काळाबाजार करणारे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी भांडार विभागाच्या प्रमुखासह पाच जणांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचे आदेश दिले आहेत.

चोवीस तासात खुलासा करण्याचे यात नमूद असून, त्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. महापालिकेतर्फे चालविल्या जाणाऱ्या मेल्ट्रॉन कोविड हॉस्पिटलमध्ये ३०० पेक्षा जास्त रुग्ण उपचार घेत आहेत. यातील गंभीर रुग्णांना रेमडेसिव्हिर दिले जाते. महापालिकेने १० हजार इंजेक्शनची खरेदी करून ठेवली होती. त्यातील ४८ इंजेक्शन चोरीला गेल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात नेमाने व महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. निता पाडळकर यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले,  २० एप्रिलला आरोग्य विभागाच्या भवानीनगर येथील भांडारातून रेमडेसिव्हिरचे २६ बॉक्स देण्यात आले होते. एका बॉक्समध्ये ४८ इंजेक्शन होते. रुग्णांना आवश्‍यकतेनुसार इंजेक्शन देताना संमतिपत्र, इंजेक्शनचे रेकॉर्ड ठेवण्यात यावे. बॉक्स सीसीसीटीव्ही समोर फोडण्यात यावा, अशा सूचना डॉक्टरांना आहेत.

२३ एप्रिलला एक बॉक्स डॉक्टरांनी फोडला असता, त्यात रेमडेसिव्हर ऐवजी एमपीएस इंजेक्शन आढळले. ही बाब कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. वैशाली मुदगलकर यांना सांगितली. त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर प्राथमिक चौकशी करून भांडार विभागप्रमुख आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळकृष्ण राठोडकर, मुख्य फार्मासिस्ट बी. डी. रगडे, साहाय्यक फार्मासिस्ट प्रणाली कोल्हे, दीपाली साने व अनंत देवगिरीकर अशा पाच जणांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

भांडार विभागात चलाखी

महापालिकेतर्फे केलेल्या प्राथमिक चौकशीत भांडार विभागात चलाखी झाल्याचा संशय आहे. मेल्ट्रॉनमध्ये प्रत्येक बॉक्स सीसीटीव्हीसमोर येऊन फोडला जात आहे. पण भांडार विभागात सीसीटीव्ही लावलेले नाहीत. दोन महिन्यांपूर्वी भवानीनगर येथे हे भांडार हालविण्यात आले आहे. त्या बॉक्समध्ये आढळलेले एमपीएस इंजेक्शन कोरोना रुग्णांसाठी वापरले जाते आणि ते महापालिकेने मागविलेल्या बॅचमधील आहेत. त्यानुसार भांडार विभागाच्या पाच जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

शहरात रेमडेसिव्हिरचा काळाबाजार करणारे रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे. यापूर्वी घाटी व मिनी घाटी रुग्णालयातून रेमडेसिव्हिर चोरीला गेले होते. पोलिसांनी चौकशी करून चोरट्यांना अटक केली. महापालिकेत २३ एप्रिलला घटना घटलेली असताना पाच दिवस प्रशासनाने चालढकल केली. अंतर्गत चौकशीचा फार्स केला. पाच जणांना नोटिसा बजावण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी बुधवारी दुपारपर्यंत संबंधित नोटिसांवर प्रशासक पांडेय यांची सही झालेली नव्हती.

कंपनीकडेही चौकशी

रेमडेसिव्हिरचे हे बॉक्स जेट विमानाने शहरात आले होते. कंपनीकडून चुकून एमपीएस इंजेक्शनचा बॉक्स आला का? याबाबत इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या मायलॉन या कंपनीशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी एमपीएस इंजेक्शन व आमचा काही संबंध नाही. आमच्याकडून असे होणे शक्य नाही. तरीही तुम्ही तक्रार दाखल करा, आम्ही देखील चौकशी करू, असे सांगितल्याचे डॉ. निता पाडळकर यांनी स्पष्ट केले. 

Edited By : Jagdish Pansare
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com