औरंगाबादेतही रेमडेसिव्हिरचा काळाबाजार, तिघांवर गुन्हा दाखल - Ramdesivir black market in Aurangabad too, case filed against three | Politics Marathi News - Sarkarnama

औरंगाबादेतही रेमडेसिव्हिरचा काळाबाजार, तिघांवर गुन्हा दाखल

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

राज्यात ठिकठिकाणी रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचे दिसते.

औरंगाबाद ः राज्यात कोरोना प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो आहे, आॅक्सिजन, बेड्स, रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशाही परिस्थितीत मेडिकल चालकाला हाताशी धरून रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या शासकीय रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींकडून दुचाकी आणि मोबाइल जप्त करण्यात आला असून यात आणखी कोण सहभागी आहेत, याचा पोलिस कसून शोध घेत आहेत.

राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मागणीही वाढत आहे. अशावेळी राज्यात ठिकठिकाणी रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचे दिसते. औरंगाबादमध्येही रेमडेसिव्हिर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करणाऱ्या मेडिकल चालकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे.

रेमडेसिव्हिरचा काळाबाजार करणाऱ्या मंदार भालेराव, अभिजीत तौर,(मेडिकल मालक), अनिल ओमप्रकाश बोहते या शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यावरपुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करोनाचा प्रादर्भाव आणि रुग्णांची संख्या वाढत असताना स्वतःच्या फायद्यासाठी मेडिकल चालकाने दोघांसोबत संगनमत करून हा काळाबाजार केल्याचे स्पष्ट झाले आहे.

बिल नसताना आणि अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रिस्किप्शन नसताना, रुग्णांची व त्यांच्या नातेवाइकांची अडवणूक सदर तीन आरोपींनी केली. कंपनीने ठरवून दिलेल्या किंमतीपेक्षा रेमडेसिव्हिरची जास्त दराने विक्री करण्यात आल्याचे समोर आले आहे.

रेमडेसेव्हिर वाटपाचे संपुर्ण अधिकार राज्य सरकारने आता संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवले आहेत. त्यानंतरही शहरात रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख