लाॅकडाऊनची मानसिक तयारी ठेवा, राजेश टोपे यांचे जनतेला आवाहन - Rajesh Tope's appeal to the people to be mentally prepared for the lockdown | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

लाॅकडाऊनची मानसिक तयारी ठेवा, राजेश टोपे यांचे जनतेला आवाहन

लक्ष्मण सोळुंके
सोमवार, 12 एप्रिल 2021

लाॅकडाऊनमुळे गोर-गरीब व हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होऊ नये याचा विचार प्रामुख्याने करण्यात आला आहे.

जालना ः राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि त्यासाठी पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध व्हावा, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजनचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्लांटमधूनच त्या जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज भागवली जाणार असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यात लवकरच लाॅकडाऊन लावण्यात येणार असून जनतेने त्याची मानसिक तयारी ठेवावी, असे आवाहनही टोपे यांनी केले.

राज्यात लवकरच लाॅकडाऊनची घोषणा होणार असल्याचे संकेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना दिले. वाढते कोरोना रुग्ण पाहता लाॅकडाऊन शिवाय पर्याय नाही यावर राज्य सरकारमधील बहुतांश मंत्र्यांचे एकमत झाले असून येत्या दोन-तीन दिवसांत लाॅकडाऊनची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या पार्श्वभूमीवर राजेश टोपे यांनी प्रसार माध्यमांना महत्वाची माहिती दिली. टोपे म्हणाले, जनतेने आता लाॅकडाऊनची मानसिकता तयार करून ठेवावी. या संदर्भात लवकरच घोषणा केली जाईल. लाॅकडाऊन लागू करण्याआधी लोकांना पुरेसा वेळ देण्यात येणार आहे. राज्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा नाही अशी ओरड केली जाते. काही ठिकाणी असे प्रकार समोर आले आहेत.

परंतु ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून एखादा रुग्ण दगावेल अशी परिस्थिती नाही, भविष्यात देखील ती उद्भवणार नाही याची काळजी राज्य सरकार घेत आहे.या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने त्या जिल्ह्यातील ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आता ऑक्सिजनचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

दररोज सहा लाख कोरोना लस हव्यात..

कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी महाराष्ट्रात लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहे. परंतु केंद्राकडून लसीचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने या मोहिमेला काही प्रमाणात ब्रेक लागला आहे. लसीकरणाचा वेग कायम राहण्यासाठी महाराष्ट्राला केंद्राकडून दररोज सहा लाख लस डोसचा पुरवठा होणे आवश्यक असल्याचे टोपे म्हणाले.

आजच्या बैठकीत प्रत्येक जिल्ह्यात विद्युत शव दाहिनीची व्यवस्था करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला. कोरोनामुळे मरण पावणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सामुहिक अंत्यसंस्कार करावे लागत आहे. ही परिस्थीती टाळण्यासाठी विद्युत शव दाहिनीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

राज्यात रेमडिसीवर इंजेक्शनचा तुटवडा, काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. यामध्ये पारदर्शकता आणून ते प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तातडीने रुग्णांना उपलब्ध व्हावेत, यासाठी आता रेमडिसीवर वाटपाचेे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

या शिवाय विद्यार्थांच्या आरोग्याचा विचार करता दहावी, बारावीच्या परिक्षा पुढे ढकलण्याचा महत्वपुर्ण निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहे.शेवटी विद्यार्थ्यांचा जीव महत्वाचा आहे, त्यामुळे या निर्णयाचे मी स्वागत करतो, असेही टोपे यांनी सांगितले.

लाॅकडाऊनमुळे गोर-गरीब व हातावर पोट असणाऱ्यांचे हाल होऊ नये याचा विचार प्रामुख्याने करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशा गरीब, गरजूंना मदत करण्या संदर्भात लवकरच निर्णय जाहीर करतील. सध्या अनेक जिल्ह्यात बेडची कमतरता असून याबाबतीत प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना बेडस,ऑक्सिजन बेडस वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही टोपी यांनी सांगितले. 

Edited By : Jagdish Pansare

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख