राजेश टोपे आईचे दुःख विसरून तीन दिवसांत कामाला लागणार...

पंधरा दिवस शोक न करता सर्व धार्मिक विधी तीन दिवसांत पार पाडून पुन्हा कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी जनतेच्या सेवेत रुजू होण्याचा निर्णय टोपे यांनी घेतला आहे. ट्वीटरच्या माध्यमातून टोपे यांनीच ही माहिती दिली.
rajesh tope news jalna
rajesh tope news jalna

औरंगाबाद ः राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई यांच्या पार्थिवावर काल शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आई जाण्याचे दुःख हे जागातील कुठल्याही दुःखापेक्षा निश्चितच मोठे आहे. पण अशा प्रसंगीही धीर आणि संयम दाखवत राजेश टोपे यांनी अत्यंविधी नंतरचे क्रियाकर्म पंधरा दिवसांऐवजी तीन दिवसांत करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात कोरोनाचे संकट असतांना राज्याच्या जनतेच्या सेवेत पुन्हा रुजू होता यावे, यासाठी टोपे यांनी हा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी अंत्यसंस्काराला गर्दी न करण्याचे आवाहन करत त्यांच्या समर्थकांना शारदाताईंचे अंत्यदर्शन घेता यावे म्हणून अत्यविधीचे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण देखील केले होते. एखाद्या घरात दुःखद घटना घडली, कुणी मरण पावले तर अंत्यसंस्कारानंतर १३ दिवस सुतक पाळण्यचे शास्त्र आहे. मृत व्यक्तीच्या आत्म्याश शांती लाभावी यासाठी हे विधी पार पाडले जातात. राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई यांचे प्रदीर्घ आजाराने शनिवारी निधन झाले.

त्यांच्या मृत्यूचा धक्का टोपे आणि त्यांच्या कुटुंबियांना बसला तसा तो टोपे कुटुंबावर प्रेम करणाऱ्या हजारो चाहत्यांना देखील बसला. कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना, अंकुशनगर येथे शारदाताईंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा सगळ्याच क्षेत्रातील लोक उपस्थित होते.

राजेश टोपे यांच्या पाथरवाला या मुळगावी त्यांच्या सांत्वनासाठी लोकांची गर्दी होत असली तरी पंधरा दिवस शोक न करता सर्व धार्मिक विधी तीन दिवसांत पार पाडून पुन्हा कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी जनतेच्या सेवेत रुजू होण्याचा निर्णय टोपे यांनी घेतला आहे. ट्वीटरच्या माध्यमातून टोपे यांनीच ही माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंधरा दिवसांऐवजी तीन दिवसांचा दुखवटा पाळून सर्व विधी पुर्ण करणार असल्याचे यात टोपे यांनी म्हटले आहे.

राजेश टोपे यांनी आजच्या परिस्थितीत घेतलेला हा निर्णय योग्य आणि त्यांच्या धाडसी वृत्तीचा परिचय करून देणारा असल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. राज्यावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकट काळात आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे यांनी केलेली कामगिरी निश्चितच कौतुकास्पद होती. आई मुंबईच्या बॉम्बे हॉस्पीटलच्या अतिदक्षता विभागात आजाराशी लढा देत असतांना राजेश टोपे यांनी कुटुंब आणि राज्यातील जनतारुपी कुटुंब या दोघांचीही काळजी घेण्याची तारेवरची कसरत पार पाडली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राजेश टोपे यांनी केलेले प्रयत्न संपुर्ण महाराष्ट्राने पाहिले. विधानसभेपासून तर सर्वसामान्य व्यक्तीकडून त्यांच्या या कार्याची दखल घेण्यात आली. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आईची भेट घेऊन टोपे रोज आपल्या दिवसाच्या कामाची सुरूवात करायचे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नेते अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी शारदाताईंना श्रद्धांजली अर्पण करतांना राजेश टोपे यांच्यासारखा कर्तृत्ववान पुत्र या मातीला दिला, अशा भावना व्यक्त केल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com