औरंगाबाद ः मी मास्क घालत नाही, तुम्ही घालू नका असा ठाकरीबाणा दाखवणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात औरंगाबादच्या क्रांतीचौक पोलीस ठाण्यात एका वकीलाने तक्रार दिली आहे.
राज ठाकरे यांना फाॅलो करणाऱ्यांची सख्या खूप मोठी आहे. त्यामुळे ते स्वःत मास्क न घालता इतरांनाही मास्क न घालण्याबाबत सांगत आहे. त्यांच्यामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी अॅड. रत्नाकर चौरे यांनी आपल्या तक्रारीत केली आहे.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्क वापरा, सतत हात धुवा, सामाजिक अंतर राखा असे आवाहन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला वारंवार करत आहेत. राज्यात दुसऱ्यांदा कोरोना रुग्ण आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र स्वःत मास्क घालत नाहीत, पण आपल्या पदाधिकाऱ्यांना देखील मास्क न घालण्याच्या सूचना करत आहेत.
नेमंक याच कारणावरून औरंगाबादेत राज ठाकरे यांच्या विरोधात अॅड.रत्नाकर भिमराव चौरे यांनी तक्रार दाखल केली आहे. चौरे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी चहा घेत असतांना माझ्या मोबाईलवर एक व्हिडिओ क्लीप आली. यु ट्यूब क्लीपमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या मुंबई-नाशिक प्रवासात विना मास्क असल्याचे पहायला मिळाले. नाशिक येथे आल्यावर देखील त्यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मास्क न घालण्याच्या सूचना दिल्या. ही गोष्ट मला खटकली.
राज ठाकरे यांचे महाराष्ट्रात लाखो चाहते आहेत, त्यामुळे राज ठाकरे यांच्या मास्क न घालण्याच्या कृतीचे अनुकरण त्यांच्याकडून होऊ शकते. हाच पायंडा जर पडला तर त्याचे परिणाम वाईट होतील. आज औरंगाबाद शहर लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. तसा निर्णय झाल्यास त्यास राज ठाकरे हेच जबाबदार असतील.
त्यांच्या सारख्या सामाजिक व राजकीय बांधिलकी असलेल्या नेत्याने असे वागू नये. त्यांच्यावर साथीचे रोग प्रतिबंधक कायदा १८९७ अंतर्गत कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी देखील या पत्रात करण्यात आली आहे.
Edited By : Jagdish Pansare

