पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण दुर्दैवी, पण चौकशी शिवाय कुणाचे नाव जोडणे अयोग्य.. - Puja Chavan suicide case is unfortunate, Minister Eknath Shinde said. | Politics Marathi News - Sarkarnama

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण दुर्दैवी, पण चौकशी शिवाय कुणाचे नाव जोडणे अयोग्य..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021

महापालिकेने आपल्या उत्पन्नात वाढ करून शासनाच्या विविध योजनेतील हिस्सा टाकावा, अशा सूचनाही त्यांनी महापालिका आयुक्तांना केल्या.

औरंगाबाद : कोरोना संसर्गामुळे शिवजयंती उत्सव साजरा करताना नागरिकांसाठी नियमावली ठरवून देण्यात आली आहे. त्यात बदल करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य तो निर्णय घेतील असे, नगर विकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी महापालिकेत विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शिवजयंती उत्सवावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे शिवप्रेमींंमधून संताप व्यक्त केला जात असुन, हे निर्बंध मागे घेण्यात यावे, अशी मागणी सुरू आहे.

या संदर्भात राज्यशासन विचार करणार आहे का? असा प्रश्न केला असता ते म्हणाले, कोरोना संसर्गामुळे शिवजयंती उत्सवासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यात बदल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेऊ शकतात.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर भूमिका स्पष्ट करतांना हे प्रकरण अत्यंत संवेदनशील व दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणात चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणाचे नाव जोडणे व अधिक बोलणे योग्य होणार नाही.

महापालिकेत झालेल्या आढावा बैठकीत आजी-माजी पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी महापालिकेचा नोकर भरती संदर्भातील आकृतीबंध मंजूर करावा अशी गळ एकनाथ शिंदे यांना घातली. त्यावर सोमवारी या संदर्भात आदेश निघतील अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. महापालिकेने आपल्या उत्पन्नात वाढ करून शासनाच्या विविध योजनेतील हिस्सा टाकावा, अशा सूचनाही त्यांनी महापालिका आयुक्तांना केल्या.

Edited By : Jagdish Pansare

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख